जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018
Total Views |

 

मुंबई : देशातील युवकांना जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण देण्यासाठी देशात अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक आणि खाजगी संस्थांबरोबरच नवीन खासगी संस्थांमधून जागतिक दर्जाच्या २० संस्थांना इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यात स्थापन होणा-या जागतिक दर्जाच्या इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीज स्थापन करण्यासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.  

 

सार्वजनिक क्षेत्रातील १० आणि खाजगी क्षेत्रातील १० उच्च शिक्षण संस्थांना जागतिक दर्जाच्या शिक्षण व संशोधन संस्थांप्रमाणे सक्षम बनविण्यासाठी आवश्यक विनिमय यंत्रणा उभी करण्यात येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना देशातच जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध होऊ शकणार आहे. अशा प्रकारच्या संस्था महाराष्ट्रात निर्माण होण्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंजूर प्रादेशिक योजनेखाली या संस्था कोणत्याही जमिनीवर स्थापन करता येणार असून त्यांना ग्रॉस प्लॉट एरियावर एक इतका चटई क्षेत्र निर्देशांक मिळणार आहे. मात्र, चटई क्षेत्राबाबतच्या निकषांची ठराविक कालावधीत पूर्तता न केल्यास वाढीव वापरलेल्या चटई क्षेत्र निर्देशांकावर बाजारमूल्य आकारणी व दंड आकारण्यात येईल. कृषी जमीन धारण करण्यासाठी असलेल्या कमाल मर्यादेतून या संस्थांना सूट देण्यात येईल. तसेच मंजूर अभिन्यासांतर्गत जमिनींचे मानीव अकृषिक रुपांतरण होईल आणि त्यासाठी वेगळ्या अकृषिक परवानगीची आवश्यकता राहणार नाही.

 

विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी शेतजमीन खरेदी करण्यास विद्यापीठाच्या प्रवर्तकांना मुभा राहील, मात्र ही जमीन कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमानुसार अधिसूचित करून घेणे आवश्यक राहील. या संस्थांना कोणत्याही प्रकारच्या मुद्रांक शुल्क माफीची सवलत मिळणार नाही. या संस्थांचा इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीज हा दर्जा रद्द झाल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा रद्द करण्यात येणार आहे.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@