शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते रक्षा अभियानाचा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018
Total Views |

 


 
 
मुंबई : बालकांच्या पालकत्वाची भूमिका समाजातील सर्व घटकांनी घ्यायला हवी, असे आवाहन बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी केले. मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी, बाल हक्क आयोगाच्या सचिव सीमा व्यास आणि राज्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यपक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
 

सर्व बालकांचे संरक्षण व्हावे यासाठी रक्षा अभियान सुरु करण्यात आले आहे. बालकांच्या पालकत्वाची भूमिका समाजातील सर्व घटकांनी घेणे आवश्यक असल्याचे मत प्रवीण घुगे यांनी दै. मुंबई तरूण भारतशी बोलताना व्यक्त केले. तसेच हे अभियान राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार असून यासाठी शाळांमधील शिक्षकांनादेखील प्रशिक्षित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी निवडण्यात येणा-या शिक्षकांची निवड हे शाळांमध्ये असलेले बाल रक्षकच करणार आहेत. शालेय शिक्षण, गृह, महिला व बाल विकास विभाग व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून रक्षा अभियान राबविण्यात येणार असून भावी पिढी ही शारीरिक, भावनिक, मानसिक दृष्ट्या सुदृढ व्हावी याकरिता आयोगाने हे पाऊल उचलले असल्याचे ते म्हणाले.

 

शिक्षकांनी पॉक्सोची माहिती द्यावी : तावडे

मुलांच्या रक्षणासाठी चिराग ॲप व पोक्सो ई बॉक्स तयार करण्यात आले आहेत. त्याची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यामुळे बालकांचे शोषण आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले. चंढीगडमध्ये यापूर्वी एक घटना घडली होती. त्यानंतर सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले. परंतु तो एक पुरावा म्हणून वापरता येऊ शकतो, पण प्रिव्हेंशन म्हणून वापरता येऊ शकत नाही. शिक्षकांना कामाचा व्याप असतो परंतु त्यातून थोडा वेळ काढून त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि पॉक्सोसारख्या कायद्याविषयी विद्यार्थ्यांनाही माहिती दिली पाहिजे, असेही ते म्हणाले. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही देणार असल्याचे ते म्हणाले.

बालहक्काची जपणूक होते की नाही हे पहावे

 

बालहक्काची जपणूक होते किंवा नाही हे शाळांनी पाहणे आवश्यक आहे. बालहक्क आयोगानेही त्याची दखल घेत त्या धर्तीवर शाळांचे रँकिंग करावे, जेणेकरून आदर्श शिक्षक पुरस्कार देताना संबंधित शिक्षक त्या शाळेतील असतील तर त्यांना त्याविषयी अतिरिक्त गुण मिळतील, असे तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@