शाळांकडून शिक्षणाधिकार्‍यांचे आदेश पायदळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018
Total Views |

प्रशिक्षक वीणा लोकुर यांची नाराजी, स्थानिक रंगकर्मींचीही पाठ 

 
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
जळगाव, १० सप्टेंबर
बाल राज्य नाट्य स्पर्धेसाठी शिक्षकांचे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शिक्षणाधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव आणि बाल रंगभूमी अभियान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व.वा. वाचनालय येथे १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ३ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील शाळांचा सहभाग वाढून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा मानस या कार्यशाळेचा होता. मात्र, या कार्यशाळेला ७ शाळांचे केवळ ११ शिक्षक उपस्थित असल्याने पुन्हा एकदा शाळांची उदासीनता समोर आली आहे.
 
 
जिल्ह्यातील विविध शाळांना माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी एकदिवसीय नाट्य कार्यशाळेसाठी प्रस्ताव पाठवूनही त्यांच्या आदेशाला शाळांनी पायदळी तुडवल्याचा प्रकार घडला. यामुळे प्रशिक्षण देणार्‍या मुंबईतील कलाकारांसमोरही जळगाव शिक्षण विभागाची शोभा झाल्याचे कळले. एवढेच नाही तर या कार्यशाळेला स्थानिक रंगकर्मींकडूनही पाठ दाखवण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. केवळ बोटावर मोजण्याइतक्या रंगकर्मींनी या कार्यशाळेला धावती भेट देऊन शाळांच्या उदासीनतेत भर टाकली. शिक्षकांची तुरळक उपस्थिती पाहून मुंबईच्या प्रशिक्षक वीणा लोकुर यांनी थेट शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांना फोन करून संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी सांगितले की, अनेक गावी आम्ही कार्यशाळा घेतली परंतु, एवढी उदासीनता कुठेच पाहिली नाही.
यावेळी साने गुरुजी नूतन माध्य. अमळनेर, सार्व. विद्यालय आसोदा, अहिल्यादेवी कन्या शाळा भुसावळ, महाराणा प्रताप भुसावळ, आर.आर. विद्यालय जळगाव, बारी समाज माध्य. विद्यालय शिरसोली आणि का.ऊ. कोल्हे या सात शाळांचा या कार्यशाळेत सहभाग असल्याचे समजले.
 
 
यावेळी शाळांच्या शिक्षकांनी विचारलेल्या शंकांचे वीणा लोकुर यांनी निरसन केले. यावेळी जनता बँकेचे पुंडलिक पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, पीयूष रावळ, राजेंद्र देशमुख, रमेश भोळे, मोरेश्‍वर सोनार, आकाश बाविस्कर, हनुमान सुरवसे, सचिन महाजन, सुदर्शन पाटील उपस्थित होते.
 
 
स्पर्धेत चुकीचे परीक्षक
 
शाळांनी आपला प्रेक्षक विद्यार्थी असून त्यानुषंगाने आपल्या नाटकाचा विषय निवडायला हवा, जो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा असेल. विद्यार्थ्यांवर योग्य असे संस्कार होतील, अशीच नाटके स्पर्धेत असायला हवी. गेल्या ४ वर्षांपासून आम्ही बाल रंगभूमी अभियानाच्या माध्यमातून कार्य करीत आहोत. शासनाकडून स्पर्धेत चुकीचे परीक्षक पाठवले जात असल्याने यावर उपाययोजना करून परीक्षकांचेही शिबीर घेण्याची गरज आहे.
वीणा लोकुर, बाल रंगभूमी अभियान, मुंबई
 
वणवा नक्कीच पेटेल
 
आज भारत बंद असल्याने बर्‍याच शिक्षकांचे येणे नाही झाले. शाळांकडून योग्य असा प्रतिसाद जरी नाही मिळाला तरी ही सुरुवात आहे. एका रात्रीत परिवर्तन कधीच होत नाही, त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. आता काडी पेटली आहे, वणवा नक्कीच पेटेल. ही एकप्रकारे नांदीच आहे. आज जेवढे शिक्षक आले, ते नक्कीच नाट्य तंत्र आणि अनुभव शिकून जातील, यात शंका नाही.
 
 
विनोद ढगे, समन्वयक बाल राज्य नाट्य स्पर्धा
 
https://www.facebook.com/Tarunbharatjal/ 
 
@@AUTHORINFO_V1@@