मुंबई मेट्रोचा विस्तार होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018
Total Views |
 

 
 
वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार
 
 
मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ९ चा दहिसर ते मीरा-भाईंदर आणि मेट्रो मार्ग ७ अ चा अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो प्रकल्पांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास मंजुरी देण्यात आली. या मेट्रो प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
 

मुंबई मेट्रोच्या दोन्ही मार्गांची एकूण लांबी १३.५८ किमी असून त्यासाठी अंदाजे ६ हजार ६०७ कोटींचा खर्च येणार आहे. तर मेट्रो मार्ग ९ हा एकूण १०.४१ किलोमीटर लांबीचा असून पूर्णत: उन्नत स्वरुपाचा आहे. मेट्रो मार्ग ७ अ हा एकूण ३.१७ किलोमीटर लांबीचा असून यामध्ये काही मार्ग हा उन्नत स्वरूपाचा तर काही मार्ग हा भुयारी असणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून १ हजार ६३१ कोटी २४ लाखांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून द्विपक्षीय,बहुपक्षीय, आंतरराष्ट्रीय, आंतरदेशीय, एलआयसी, बॉण्डस् अशा विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपातून पैसा उभारण्यात येणार आहे.

 

बाधितांचे पुनर्वसन होणार

 

या प्रकल्पासाठी शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडील जमिनी कायम अथवा तात्पुरत्या स्वरूपात नाममात्र दराने घेण्यात येणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेची सहमती घेऊन मुंबई नागरी परिवहन प्रकल्प पुनर्वसन व पुनर्वसाहत धोरणानुसार प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

 

किती असेल भाडे ?

 

०-३ किमी अंतरासाठी १० रुपये, ३-१२ किमीसाठी २० रुपये, १२-१८ किमीसाठी ३० रुपये, १८-२४ किमीसाठी ४० रुपये, २४-३० किमीसाठी ५० रुपये, ३०-३६ किमीसाठी ६० रुपये,३६-४२ किमीसाठी ७० रुपये आणि ४२ किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी ८० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. दरम्यान, सुरूवातीच्या काळासाठी हा दर आकारण्यात येणार आहे.

 

वाहतुकीवरील ताण कमी होणार

 

मेट्रोच्या विस्तारामुळे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. कार्यालयीन वेळात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जाणारे आणि मीरा-भाईंदरच्या दिशेने येणा-या चाकरमान्यांची, वाहन चालकांची संख्या अधिक असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर ताण येऊन वाहतुककोंडी निर्माण होते. परंतु या मार्गिकेच्या पूर्णत्वानंतर वाहतुककोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे. मीरा-भाईंदर आणि मुंबई उपनगरांना जोडणाऱ्या या मार्गामुळे प्रवासाच्या कालावधीमध्ये अर्ध्या ते पाऊण तासाची बचत होणार असून हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ८ लाख ४७ हजार प्रवासी या मार्गाचा वापर करणार असल्याचा अंदाजही बांधण्यात आला आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@