अमेरिकेतील अनुशासन पर्व?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018   
Total Views |

 

 

बॉब वुडवर्ड या ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वरिष्ठ शोधपत्रकाराचे दि. ११ सप्टेंबर रोजी ‘फिअर- ट्रम्प इन द व्हाईट हाऊस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. वुडवर्ड यांनी ट्रम्प यांच्या वर्तुळातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बोलते केले आहे. त्यातून ट्रम्प यांचे ‘व्हाईट हाऊस’मधील उच्चाधिकाऱ्यांचे अन्यत्र असलेले हितसंबंध, त्यांच्यातील वैरभाव अशा अनेक गोष्टी समोर येतात.

 
 
आणीबाणी... जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीला काळिमा फासणारा कालखंड. आज ४३ वर्षं उलटून गेल्यानंतरही आणीबाणीच्या आठवणी ताज्या आहेत. किंबहुना, त्या कोणीही आणि कधीही विसरता कामा नयेत. काँग्रेस आणि इंदिरा गांधींच्या समर्थकांकडून आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ असे म्हटले जाते. त्यांच्याकडून असे ठसविण्याचा प्रयत्न केला जातो की, लोकशाहीची गळचेपी करणं चुकीचं असलं तरी विशिष्ट परिस्थितीत, देशाला अराजकतेपासून वाचवण्यासाठी आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी असं करणं आवश्यक ठरतं. आणीबाणी लागू करण्यासाठी निमित्त म्हणून ते लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी विराट सभेत पोलीस, सैनिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना उद्देशून केलेल्या, सरकारचे अनैतिक आणि बेकायदेशीर हुकूम मानू नका, या आवाहनाकडे बोट दाखवतात. सरकारी कर्मचाऱ्यांनीच जर सरकारच्या आज्ञा आपल्या सोयीनुसार पाळल्या तर अराजकता माजेल, या त्यांच्या म्हणण्यात तथ्य असले तरी त्याने इंदिरा गांधी सरकारवरील डाग पुसले जात नाहीत. १९७५ चा भारत आणि २०१८ ची अमेरिका यांच्यात तुलना करता येत नसली तरी सध्या अमेरिकेत जून १९७५ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाशी इमान महत्त्वाचे का सरकारशी, हा प्रश्न तेथे उपस्थित केला जात आहे. निमित्त आहे, बॉब वुडवर्ड या ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वरिष्ठ शोधपत्रकाराच्या ११ सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या ‘फिअर- ट्रम्प इन द व्हाईट हाऊस’ या पुस्तकाचे. वुडवर्ड यांनी ट्रम्प यांच्या वर्तुळातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बोलते केले आहे. त्यातून ट्रम्प यांच्या डोक्यावर रशियाच्या निवडणुकीतील ढवळाढवळीबद्दल चौकशीचे सावट, ट्रम्प यांचे महत्त्वाच्या जागतिक विषयांबद्दलचे अज्ञान तसेच ते सोडवण्यात त्यांना नसलेला रस, त्यांचे ढळलेले मानसिक संतुलन, त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांकडूनच त्यांची ‘मूर्ख’ अशी केली जाणारी संभावना, ‘व्हाईट हाऊस’मधील उच्चाधिकाऱ्यांचे अन्यत्र असलेले हितसंबंध, त्यांच्यातील वैरभाव अशा अनेक गोष्टी समोर येतात. ट्रम्प यांच्या एककल्ली आणि हडेलहप्पी वागण्यामुळे त्यांच्या विरोधकांनाच नाही, तर रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यातील काही लोकांनी आपल्या नेत्यापेक्षा देशाचे हित महत्त्वाचे मानून ‘व्हाईट हाऊस’मध्ये काम करताना राष्ट्राध्यक्षांचे नेतृत्त्व अमान्य करून त्यांच्या आदेशांपैकी आपल्या दृष्टीने ज्या देशहिताच्या गोष्टी आहेत तेवढ्याच करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील महत्त्वाच्या दोन म्हणजे, ट्रम्प यांच्या टेबलावर त्यांच्या स्वाक्षरीसाठी गेलेले सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांची हत्या करण्याचा तसेच दक्षिण कोरियाशी मुक्त व्यापार कराराचा अंत करण्याबाबत अध्यादेशाचा मसुदा, त्यांना कल्पना न देता ‘व्हाईट हाऊस’मधील अधिकाऱ्यांनी बाजूला काढून ठेवला. या दोन्ही अध्यादेशांवर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असत्या, तर त्याची अमेरिकेसह संपूर्ण जगाला खूप मोठी किंमत चुकवावी लागली असती.
 

पुस्तकाच्या प्रकाशनाच्या एक आठवडा आधी ५ सप्टेंबर रोजी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये, “ट्रम्प प्रशासनातील असहकार चळवळीत मी सहभागी आहे,” या शीर्षकाचा लेख, ‘व्हाईट हाऊस’मधील उच्चपदस्थाने स्वतःचे नाव प्रसिद्ध न करता प्रकाशित केला. अग्रलेख वगळता अन्य वैचारिक लेख नावाशिवाय छापले जात नाहीत, पण ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने विशेष बाब म्हणून ही प्रथा मोडली. आम्ही डाव्या विचारांचे नाही. ट्रम्प यांच्या अनेक धोरणांना आमचा पाठिंबा आहे, पण स्वतः ट्रम्प यांनी आपल्याला निवडून देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या अनेक ध्येयधोरणांना सोडचिठ्ठी दिली असून त्यांचे वागणे अनैतिक आहे. त्यांनी देशातील लोकतांत्रिक संस्थांना कमकुवत करण्याचा चंग बांधला असून आम्ही त्यांचे प्रयत्न हाणून पाडत आहोत,” असा या लेखाचा सूर होता. या लेखामुळे ट्रम्प यांच्या संतापाचा उद्रेक झाला. अमेरिकेतील सगळ्या डाव्या-उदारमतवादी माध्यमांवर जोरदार टीका करताना ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत कशाप्रकारे अमेरिकेची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे, बेरोजगारी कमी होत आहे, हिस्पॅनिक आणि कृष्णवर्णीय लोकांमधील रोजगाराचे प्रमाण वाढत आहे, याचे रसभरित वर्णन केले. एवढ्यावरच न थांबता ट्रम्प यांनी महाधिवक्ता जेफ सेशन्स यांना ‘टाइम्स’मधील लेख कोणी लिहिला याची चौकशी करण्याचे आदेश दिले. वुडवर्ड यांचे पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे ट्रम्प यांच्या नेतृत्त्वक्षमतेविषयी चर्चेला उधाण येणार आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये काँग्रेसच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४३५, सिनेटच्या १०० पैकी ३५ तसेच ३९ राज्यांच्या आणि प्रदेशांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. ट्रम्प यांचा विजय पचवू न शकलेले उदारमतवादी आणि डाव्या विचारवंतांनी या निवडणुकीत त्यांना हरवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी कुठल्याही थराला जायची त्यांची तयारी आहे. ट्रम्प यांची लोकप्रियता कमी झाली असली तरी त्यांना मानणाराही मोठा वर्ग आहे. अर्थव्यवस्था, व्यापार, डॉलरचा भाव, रोजगार, शेअर बाजाराचा निर्देशांक याबाबतीत अमेरिकेची स्थिती सुधारली आहे. ती ट्रम्प यांच्यामुळे सुधारली का ओबामांनी त्यांच्या अध्यक्षकाळात हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांमुळे, हा वादाचा मुद्दा असला तरी बदललेल्या परिस्थितीचे श्रेय ट्रम्प यांना मिळणार आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची सरशी झाली तर ट्रम्प यांचे स्थान अधिक मजबूत होणार आहे. याउलट जर डेमॉक्रॅटिक पक्षाचा विजय झाला तर त्यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षातील ट्रम्पविरोधी गटालाही नवीन हुरूप येणार आहे. अमेरिकेतील २५व्या घटनादुरुस्तीनुसार जर अध्यक्षांचे मानसिक संतुलन ढळले असेल तर त्यांचे मंत्रिमंडळ आणि उपाध्यक्ष याबाबत ठराव करून त्यांना पदावरून हटवू शकतात. अशा परिस्थितीत अमेरिकेचे उपाध्यक्ष, अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतात. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रकाशित झालेला लेख उपाध्यक्ष माइक पेन्स यांनीच लिहिला असावा, अशी खमंग चर्चा सुरू झाल्यानंतर पेन्स यांना आपला त्यात सहभाग नव्हता, असं जाहीर करावं लागलं. त्यासाठी असत्य प्रतिपादन चाचणीला सामोरं जायलाही आपली तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. जगातील सगळ्यात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष वुडवर्ड यांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे वागत असतील किंवा त्यांचे अधिकारी आणि सहकारी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची कागदपत्रं त्यांच्या हातापर्यंत पोहोचू नये म्हणून ती वेगळी काढत असतील तर ही संपूर्ण जगाला काळजीत टाकणारी गोष्ट आहे. वरकरणी सदर अधिकाऱ्यांचे वर्तन नैतिक आणि देशहिताचं वाटत असलं तरी त्यातून चुकीचा संदेश जातो. अध्यक्षांचा कुठला निर्णय देशहिताचा आणि कुठला नाही हे कोण ठरवणार? देशाची जनता का अधिकाऱ्यांची सद्सद्विवेकबुद्धी? त्यामुळे लेख लिहिताना नाव गुप्त ठेवायची अट घालणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपल्या कृत्याची कबुली द्यायला हवी आणि होईल त्या कारवाईला सामोरे जायची तयारी दाखवायला हवी. अमेरिकेतील अभिमताचा आणि मोठ्या प्रमाणावर जनमताचा कौलही ट्रम्प यांच्या विरोधात असल्यामुळे या अधिकाऱ्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली तरी जनमानसात त्यांची प्रतिमा उजळून निघेल. सामान्य लोकांच्या नजरेत ते नायक ठरतील. त्यांनी असे न केल्यास भविष्यात सरकारच्या निर्णयामुळे रागावलेला कोणीही अशा कृत्याची पुनरावृत्ती करून नैतिकतेचा टेंभा मिरवेल. फक्त अमेरिकेतीलच नाही तर जगभरातील लोकशाही देशांसाठी हा विश्वासार्हतेचा प्रश्न आहे.

 

पेट्रोलचे वाढते दर, महत्त्वाच्या चलनांचे डॉलरच्या तुलनेत घसरणारे दर, व्यापार युद्धं ते दोन वेळा पुढे ढकलली गेल्यानंतर पार पडलेली भारत-अमेरिका २+२ बैठक, या सगळ्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रभाव आहे. अमेरिकेतील गोंधळाची परिस्थिती नोव्हेंबरमध्ये निवडणुकांपर्यंत कायम राहणार असून त्यामुळे भारतासह जगभरातील अनेक देश भरडून निघणार आहेत.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

@@AUTHORINFO_V1@@