‘भारत बंद’चा जळगावात फज्जा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018
Total Views |

मोदी समर्थकांच्या घोषणाबाजीनंतर आंदोलकांचा फुले मार्केटमधून काढता पाय

 
जळगाव, १० सप्टेंबर
देशात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व सहकारी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’चा जळगाव शहरात पुरता फज्जा उडाला. सेंट्रल फुले मार्केटमध्ये मोदी समर्थकांच्या जोरदार घोषणाबाजीनंतर काढता पाय घेण्याची वेळ आंदोलकांवर आली.
 
 
इंधन दरवाढीमुळे महागाईची झळ सर्वसामान्यांना सहन करावी लागत असल्याचा दावा करीत केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधातील राजकीय पक्षांनी सोमवारी भारत बंदची हाक दिली होती.
 
 
हा बंद यशस्वी करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी, मनसे आदी राजकीय पक्ष जळगावात एकत्र आले होते. गोलाणी मार्केटमध्ये सकाळी आंदोलक शिरले. त्यांना पाहून पटापट व्यावसायिकांनी दुकाने बंद केली, पण तेवढ्यापुरतीच. आंदोलक निघून जाताच सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. टॉवर चौकात ठिय्या देण्यात आला.
 
 
सेंट्रल फुले मार्केटमध्ये आंदोलकांनी वरच्या मजल्यावर उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परंतु त्यांना अनपेक्षितपणे तळमजल्यावरील जमावाकडून मोदींचा जयजयकार करणार्‍या घोषणांच्या रूपात प्रत्युत्तर मिळाले. त्यामुळे वरच्या मजल्यावरील जमाव क्षणभर चकित झाला. मोदी सरकारच्या समर्थनार्थ आवाज अधिकच वाढत असल्याचे पाहून बंद समर्थकांनी मार्केटमधून काढता पाय घेणे पसंत केले. यानंतर दिवसभर शहरात सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू होते.
@@AUTHORINFO_V1@@