पिंपुटकर सुभेदारांचा वाडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018
Total Views |




 

रायगड जिल्ह्यातील कर्जत म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं अगदी टुमदार गाव! सह्याद्रीच्या या घेऱ्यात या गावाच्या पूर्व-पश्चिम गडकिल्ले, तर दक्षिणोत्तर बाजूला लेणी आहेत. प्रसिद्ध ज्योतिर्लिंग भीमाशंकरला जशी इथून जाणारी पायवाट आहे तशी त्याच परिसरातून अगदी सातवाहनांच्या काळात इथे उतरणाऱ्या व्यापारी घाटवाटा व यात्रेकरूंच्या वाटा सुद्धा आहेत, हा झाला प्राचीन इतिहास! परंतु, मध्ययुगात साधारणतः मराठेशाहीत कर्जत तालुक्यातील दहिवली या गावात इ. स. १७२० च्या अगोदर म्हणजे इतिहासात मानाचे सुवर्णपान असलेल्या बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या काळापूर्वी पिंपुटकर या सुभेदारांचा वाडा इथे उभा राहिला. या वाड्याची ऐतिहासिक माहिती आपल्याला प्रस्तुत लेखात घ्यायची आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

आज असलेला कर्जत व खालापूर तालुका त्याकाळी या सुभेदारांचा सुभा होता. पेशव्यांना यातून ते सारा वसूल करून देत असत, तसेच विविध घाटांखालचे असलेले हे कर्जत गाव कर, जत आणि जकात गोळा करण्याचे महत्त्वाचे ठिकाण होते. या कर्जतमधून दुडूदुडू धावणारी उल्हास नदी या गावाचे दोन भाग करते, नदीच्या अल्याड कर्जत, तर पल्याड सुभेदारांनी वसवलेले दहिवली गाव. उमाजी नाईकांनी केलेल्या हल्ल्यात ‘अतिथी देवो भवो:’ या संस्कारात त्यांना सुभेदारांनी दहीभात दिले आणि गावाला ‘दहिवली’ नाव पडले, अशी आख्यायिका सांगण्यात येते. या वाड्याला भेट देण्याचा माझा योग जुळून आला आणि तिथे भावलेल्या ऐतिहासिक गोष्टी सर्वांसमोर यायला हव्यात म्हणून हा लेख प्रपंच करायचे मी ठरवले. चला पाहूया कसा होता हा वाडा!

 

 
 
विहिरीजवळील एका दगडात कोरलेला दगडी चौरंग
 
 
तीन मजली ऐसपैस असलेल्या या वाड्यात पिंपुटकर सुभेदार राहत असत. त्या वाड्याची असलेली श्रीमंती आजही उपलब्ध स्थापत्यावरून पाहता येते. वाड्याची व्यवस्था तेव्हा वैभवशाली असणार हे पाहताक्षणी जाणवते. परंतु, आज बरोबर उलट स्थितीत तो उभा आहे. या वाड्याचे असलेले प्रवेशद्वार त्याची बलाढ्यता दर्शवते. संपूर्ण लाकडात असलेल्या या द्वारचौकटीवर वेलबुट्टीची शाखा असून वर मधोमध द्वारललाटबिंबमध्ये गणपती बाप्पा आहेत. आतमध्ये व्हरांडा असून लाकडी बाकं त्यावेळची आठवण करून देतात. व्हरांड्यातून वरच्या मजल्यावर जायला जिना असून आज मात्र तो बंद करून ठेवलेला आहे. एकेकाळी तीन मजली असलेला हा चौपाखी वाडा अवघा एक मजली उरलेला आहे. संपूर्ण लाकडी छत पाहताना ती भली मोठी आडवी लाकडं कशी टाकली असतील हे कोडं सुटत नाही. वाड्याच्या मध्यभागी तुळशी वृंदावन असून चहू बाजूंनी तिथे वाड्याची द्वारं होती, आज मात्र दोन बाजू शाबूत आहेत. तुळशी वृंदावनाला दगडी तोड्यांचा प्रदक्षिणापथ असून आजही तो पाहता येतो. आता वाडा म्हटले की, वैभव आलेच आणि वैभवाचा सूर्य तळपतो तो संपत्तीच्या किरणांनी! ही संपत्ती सुरक्षित असावी म्हणून प्रत्येक वाड्यात चोरकप्पे असतात. त्याच दृष्टिकोनातून प्रचंड असे तळघर या वाड्यात होते. काळाच्या ओघात वापर झाला नसल्यामुळे ते बुजत गेले आणि नंतरच्या पिढीत अडगळीत गेलेल्या या तळघरामुळे दुर्घटना होऊ नये म्हणून वीट बांधकाम करून ते बंद करण्यात आले. पण, त्याच्या आख्यायिका मात्र गमतीशीर आहेत. कोणी म्हणत असे की, ते भुयार आहे जे थेट पुण्याच्या शनिवारवाड्यात निघते. कोणी म्हणत असे की, हे भुयार टेकडीवर जाते, तर काही लोक हे जवळचं असलेल्या विठ्ठल मंदिरात निघते, असे सांगतात. खरे तर ते तळघर आहे जेणे करून संपत्ती सुरक्षित राहावी म्हणून प्रत्येक वाड्यात ते असे. पुढे परसात या वाड्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी अफलातून स्थापत्यात रचलेली प्रचंड खोल अशी दगडी तोड्यांमधील विहीर आहे, सगळ्यात भन्नाट म्हणजे विहिरीच्या बाजूला असलेला दगडी चौरंग! संपूर्ण एका दगडात असलेला हा चौरंग हवा तसा कुठेही नेता येऊ शकतो. तसा विचार केला तर न्हाणीघरातील हा चौरंग त्यावेळचे वैभव दाखवतो. बऱ्याच जीर्ण दगडगोष्टी इथे लक्ष वेधून घेतात त्यात दगडी जातं, दगडी उखळ, विहिरीवरचे थारोळं आणि तांत्रिकविधींचे शिवलिंग खासचं! बाकी वाड्याच्या कलाकुसरीत नटलेले परंतु अस्ताव्यस्त पडलेले दगडी तोडे आज मात्र अखेरची घटका मोजत आहेत. एकेकाळी काष्ठशिल्पात हा वाडा खुलून दिसत होता, असे आताचे सातवे वंशज श्री मुकुंद पिंपुटकर सांगतात. परंतु, आगीच्या भक्ष्यस्थानी हा वाडा पडला आणि होत्याचे नव्हते झाले. तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी आज जपून ठेवलेल्या आहेत. त्यात सुभेदारांची यज्ञपळी पाहणे म्हणजे खासंच! जवळ जवळ दहा फूट लांब असलेली ही एकसंध लाकडी पळी यज्ञात लांबून तेल टाकण्यासाठी वापरत असत. पिंपुटकरांची आताची तरुणपिढी म्हणजे आठवे वंशज गिरीश पिंपुटकर अगदी आवर्जून या गोष्टी आपल्याला दाखवतात.
 
 

 

 

वाड्याचे प्रवेशद्वार
 
 
पेशव्यांच्या काळात सुभेदारांना मान होता हे त्या काळात वसवलेल्या दहिवली गावावरून वाटते. कारण, प्राचीन मंदिर व मंदिर पंचायतनची व्यवस्था सुभेदारांकडे असे व त्यासाठी ब्राह्मण हवेतच साहजिकच इथे ब्राह्मण वस्ती वसवली. ज्याला आज ‘ब्राह्मण आळी’ म्हणतात. याच मंदिराच्या साफसफाईसाठी गुरव समाज हवा म्हणून इथे गुरव कुटुंब वसवले. कालांतराने व्यास वाढला आणि आज त्या भागाला ‘गुरव आळी’ म्हणतात. कोकणात सतत पडणारा ओला दुष्काळ व पोर्तुगीजांच्या धर्मांतराच्या टांगत्या तलवारीतून सुटका करण्यासाठी तिथून बऱ्याच कुटुंबांचे स्थलांतर झाले. सुभेदारांनी मानाने त्यांना वाड्याच्या परिसरात वसवले, जी आज ‘कोकण आळी’ नाव धारण करून आहे. सुभेदारांकडे तेव्हा सोन्याचे तारण व्यवहार चालत असत, तसेच घरातील महिलांना सोन्याचे दागिने दुरुस्ती व नवीन घडवण्यासाठी सोनार हवेतच म्हणून वाड्याच्या अगदी बाजूला सोनारांची वस्ती वसवली, ज्याला आज ‘सोनार आळी’ म्हणतात. सुभेदारांना पालखीचा मान होता म्हणून अगदी हाकेच्या अंतरावर ‘भोई आळी’ आहे. आजही काही घरं तिथे पाहता येतात. जसे चहू बाजूंनी झाडाला आळं करतात आणि मध्ये झाड उभे राहते अगदी तसाच सुभेदारांचा वाडा आहे. चहू बाजूंनी इथे आज स्थानिकांच्या म्हणजे त्या काळातील समाजाच्या वस्तींच्या आळ्या आहेत. या टुमदार गावाचे दमदार नगरात सुभेदारांनी रूपांतर केले.
 

 

 

सुभेदारांची लाकडी यज्ञपळी 
 
 
कोकणातील होळी म्हणजे प्रमुख सण! हो आणि आजही समस्त कोकणी मंडळी या सणानिमित्त कोकणांत धाव घेतात. इथे मात्र सुभेदारांचा खास असा होळीचा माळ आहे, गावाची होळी तिथे लागत असे आणि सुभेदारांच्या हस्ते मानाने पूजन करून ही होळी लावली जात असे. आजही ती प्रथा व्यवस्थितरित्या अव्याहतपणे सुरु आहे. फक्त होळीची जागा बदललेली असली तरी गावाची होळी सुभेदारांचे वंशज मुकुंद पिंपुटकरच लावतातआता ‘सुभेदारांचा वाडा’ म्हटले की, सुभ्यांमधील लोक गार्‍हाणी घेऊन येणारच. त्यामुळे तिथे सतत राबता असायचा, त्यात एखादे तंट्याच्या न्यायनिवाड्याचे काम सुरु असेल तर ओसरीवर गर्दी असे म्हणजे नवीन येणाऱ्या मंडळीला विसावण्यासाठी जागा हवी म्हणून अगदी जवळच प्रचंड विस्ताराचे असलेल्या झाडाला सुभेदारांनी पार बांधला, जो आज गुरव आळीत आहे. तो पार पाहताना ते दगडी तोडे थेट त्या काळात घेऊन जातात. यावर पथारी टाकून गोरगरीब विश्रांती घेत असत. तो काळ हा पार जगला आहे. याच पारावर तांदळा स्वरूपातील मुंजोबाचे मंदिर आहे आणि हा मुंजोबा या गावाचे रक्षण करतो म्हणून लोकांची श्रद्धा आहे. त्या काळातील या गोष्टी आणि ती श्रद्धा आजही कमी झालेली नाही. कारण, गावातील प्रत्येकाच्या लग्नाचा पहिला नारळ यालाच वाढवला जातो. याच पाराच्या सावलीत ग्रामदेवता महालक्ष्मीचेसुद्धा मंदिर आहे. सुभेदारांचा वाडा आणि त्यांनी बांधलेलं पार एकदा तरी पाहावेत असे...
 
 

 

 

वाड्यातील तुळशी वृंदावन
 
 
तर असे हे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक कर्जत शहर आणि त्याच्या खुणा ऐतिहासिक नजरेतून पाहाल तर नक्कीच जाणवतात. दुर्दैवाने ‘फार्महाऊस सिटी’ आणि ‘पावसाळी धबधब्यांचे शहर’ अशी कर्जतची जेव्हा काही जण ओळख करून देतात, तेव्हा मात्र थोडे वाईट वाटते. कारण, कर्जतची खरी ओळख कुठेतरी पुसली जात आहे, याचे दुःख आहे आणि त्यासाठीच हा लेखप्रपंच !
 
- सागर सुर्वे 

+ 91 7718891448

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@