तळ्यात-मळ्यात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018
Total Views |



 

आपल्या मुलांना हळूहळू जास्त सशक्त अशा ‘स्व’ निर्मितीकडे वाटचाल करायला शिकवणे, आपल्या मुलांचे लहानपणापासून निरीक्षण करत असल्याने त्यांचे मूड्स, अबोला, अस्वस्थता याचे संकेत अश्या अनेक लहान मुलांच्या वाढत्या वयामध्ये होणाऱ्या मानसिक परिणामांचा लेखाजोखा डॉ. गुंजन कुलकर्णी यांनी मांडला आहे...


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

  

वयाच्या 28व्या वर्षी इंटरनेटवर ‘बेन-टेन’ नावाच्या कार्टूनची माहिती वाचत मी रात्री उशीरापर्यंत डोळे ताणून बसेन असे मला कधी वाटले नव्हते. पण, समुपदेशनाच्या चौथ्या सत्राच्या शेवटी ‘बेन-टेन’ या जादुई शब्दांनी अकरा वर्षाच्या त्या अबोल मुलाच्या मनात शिरण्याचा मार्ग मला सापडला होता. त्याच्याबरोबरच्या पाचव्या सत्राची तयार करताना ‘बेन-टेन’च्या करामतींचा अभ्यास करणे माझ्यासाठी आवश्यक होते. जॉर्ज (नाव बदलले आहे) सहा महिन्यांपूर्वी आई आणि धाकट्या बहिणीबरोबर आयर्लंडहून लंडनला स्थलांतरित झाला होता. जागेचा बदल, बदललेली शाळा-मित्रमंडळी, अल्परिचित नातेवाईकांकडे राहावे लागणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आईवडिलांचे विभक्त होणे, या सगळ्याचा परिणाम म्हणून मुळात हसरा-खेळकर असणारा जॉर्ज खूप अबोल झाला होता. दैनंदिन कर्मे अतिशय यांत्रिकपणे पार पाडणाऱ्या, शून्यात नजर लावून बसणाऱ्या, प्रश्नांना एका शब्दात उत्तरे देणाऱ्या आपल्या मुलाची तगमग सहन न होऊन जॉर्जची आई त्याला माझ्याकडे घेऊन आली होती. सत्रांना काहीही तक्रार न करता जॉर्ज येऊन बसत होता. पण, आमच्यात तीन-चार वाक्यांपेक्षा जास्त संवाद होत नव्हता. वरवर पाहता निर्विकार दिसणाऱ्या चेहऱ्यावरचे त्याचे गंभीर, मध्येच भीतीची झलक दाखवणारे डोळे मला अस्वस्थ करत होते. आईपुढे, तिचे म्हणून अनेक प्रश्न होते. राहण्याची जागा, जेवणाची व्यवस्था, शाळेची फी अशा अगदीच प्राथमिक प्रश्नांशी ती झगडत होती. ती जॉर्जकडून अकाली प्रौढत्वाची अपेक्षा करतेय हे तिलाही कळत होते. पण, जॉर्जच्या जास्त नाजूक भावनिक प्रश्नांसाठी तिच्याकडे ना पुरेसा वेळ होता ना पुरेशी उर्जा. धाकटी सारा (नाव बदलले आहे) तिचा बालसुलभ अल्लडपणा टिकवून होती. त्या तुलनेत जॉर्जचा घुमेपणा आईला जास्तच त्रास देत होता. अशा या जॉर्जशी ‘बेन-टेन’च्या चित्रांच्या-गोष्टींच्या माध्यमातून संवाद साधता यायला लागल्यावर मला मनापासून आनंद झाला. पुढच्या दहा-बारा सत्रांमध्ये हळूहळू आम्हाला नवा, जास्त प्रगल्भ आणि आईला लढायला बळ देऊ शकणारा जॉर्ज सापडत गेला.

 

साधारण नवव्या-दहाव्या वर्षानंतर ते अडनिडे वय सुरु होते; जिथे मुलांना ना लहान गणले जाते, ना मोठे मानले जाते. पालक-मुलांमधला संवाद बदलत जातो. मुलगे आणि मुली यांच्यात होणाऱ्या बदलांचा वेग, दिशा भिन्न होत जातात. कालपर्यंत पालकांचे तुलनेने विनासायास ऐकणारी, त्यांना बऱ्याच अंशी आदर्श मानणारी मुले आता वारंवार, ‘का?’ ‘मीच का?’ असे प्रश्न विचारायला लागतात. ‘मी सांगतो/सांगते म्हणून’ हे पालकांचे उत्तर आता त्यांच्या प्रश्नांना अपुरे पडायला लागते. एकाच घटनेला जॉर्ज आणि सारा यांनी दिलेल्या पूर्णत: भिन्न प्रतिक्रियांमध्ये दोघांचे मूळ स्वभाव हे कारण तर आहेच. परंतु, जॉर्जचे पौगंडावस्थेच्या पायरीवर उभे असणे हेदेखील फार महत्त्वाचे कारण आहे. या वयात मुलांची शारीरिक वाढ जास्त वेगाने होत असते. परंतु, त्यांच्या मेंदूचा विकास, सारासार विचार करण्याचे कौशल्य आणि भावनिक वाढ मात्र व्यक्ती-व्यक्तीप्रमाणे कमी-जास्त वेगाने होत असते. त्यामुळे या वयाच्या मुलांचे बाह्यरूप आणि त्यांचे अंतरंग प्रगल्भतेच्या वेगवेगळ्या पातळीवर असू शकतात. परिणामतः साधारण आठ ते बारा या वयोगटातील मुलांना अनेकदा संभ्रमावस्थेला सामोरे जावे लागते. शारीरिक-मानसिक बदलांचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा भावनिक परिणाम तर होत असतो, पण त्याची तार्किक कारणमीमांसा करण्याइतका बुद्धीचा विकास झालेला नसतो.

 

या वयाचे नाजुकपण जाणून आपल्या मुलांना हळूहळू जास्त सशक्त अशा ‘स्व’ निर्मितीकडे वाटचाल करायला शिकवणे ही पालकांची कसरतच म्हणावी लागेल. अर्थात इथेही मनमोकळा संवाद मदतीला येतो. आपल्या मुलांचे लहानपणापासून निरीक्षण करत असल्याने त्यांचे मूड्स, अबोला, अस्वस्थता याचे संकेत आपण टिपू शकतो. त्याप्रमाणे आपल्या संवादाचा सूरही आपल्याला बदलता येतो. या अडनिड्या वयात मुलांना ‘लहान’ समजले जाण्यापेक्षा शक्य त्या ठिकाणी ‘मोठे’ मानले जाणे जास्त आवडते. त्यामुळे त्यांना त्यांच्या समजेनुसार वेगवेगळ्या प्रसंगात जबाबदाऱ्या व हक्क दोन्हीही देत राहणे हे त्यांच्या सुदृढ मानसिक, भावनिक वाढीसाठी फायद्याचे ठरते.
 
 

- गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब

मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

7775092277

[email protected]

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@