मुंबई : गोरेगाव मधील पी दक्षिण विभागात मोठ्याप्रमाणावर अवैधपणे चिकन व मटणची विक्री करण्यात येत असून त्यामुळे या परिसरात अनारोग्य परिस्थिती निर्माण झाली असून अवैधपणे चिकन व मटणची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी पी दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष संदीप पटेल यांनी अन्न व प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांच्याकडे केली. पटेल यांनी आज पल्लवी दराडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यावेळी नगरसेविका श्रीकला पिल्लई उपस्थित होत्या.
याबाबत संदीप पटेल म्हणाले कि, मी प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रभाग क्र ५८ मध्ये भगतसिंग नगर क्र १ आणि २ लक्ष्मीनगर झोपडपट्टी विभागात चिकन व मटण दुकानदारांचा उपद्रव सुरु आहे. या दुकानदारांकडे गुमास्ता परवाना नसूनही ते मटण आणि चिकनची विक्री करत आहेत. तर उरलेलं चिकन आणि मटण गटारात फेकतात त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच मटण आणि चिकनची विक्री करताना ते स्वछता ठेवत नाही त्यामुळे अनारोग्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पी दक्षिण विभागात अवैधपणे चिकन व मटणची विक्री करणाऱ्या दुकानदारांची संख्या जास्त असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या दुकानदारांवर या तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्न व प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांच्याकडे असल्याचे ते म्हणाले.