देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मूळ निवासींचे भरीव योगदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2018
Total Views |

क्रांतीची बीजं मूळ निवासींनी रोवली

 
 
जळगाव :
पहिल्या महायुद्धानंतर ग्रामीण भागात दारिद्रय होते. सरकार गाडून टाकण्यासाठी चिरनेर गावाजवळ अक्कादेवी ठिकाणी सत्याग्रह करण्याचे ठरले. टाळ मृदुंगाच्या गजरात वंदे मातरम्च्या घोषणा हातात कोयते, कुर्‍हाडी घेऊन लोक अक्कादेवीकडे निघाले. माळरानावर ५००० वनवासी जमले. कायदेभंग करून लोक जंगलात घुसले. चिरनेरच्या एका तुकडीचे नेतेपद नाग्याकडे होते. इंग्रजांनी सत्याग्रहींना बेड्या घातल्या, दोर बांधले अशा स्थितीतही लोक पळून जाऊ लागले. पोलिसांचा गोळीबार झाला. चिरनेरच्या वाटेवर जमावाने पोलिसांवर हल्ला केला. या गोळीबारात नाग्या जखमी झाला. १२ ऑक्टोबर १९३० रोजी नाग्यास पकडले.गोळीची जखम सडत जाऊन त्याचा प्राण गेला.
 
 
गोंड राणी दुर्गावती
मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील मदन महाल पहाडीतील गोंड राजा दलपतसिंह यांचा किल्ला होता.त्यांची पत्नी दुर्गावती युध्दशास्त्रात निपूण होती. मोघलांचा सेनापती आसफ खान याने राजासमोर तह करण्याचा प्रस्ताव ठेवला, त्यांनी तो नाकारला. परिणामी युध्द झाले. मोघलांनी चलाखीने दलपतसिंह यास पकडून तोफेच्या तोंडी दिले. पण राणी दुर्गावतीने युध्द सुरु ठेवले. लढता लढता राणीनेही बलिदान दिले.
 
भागोजी नाईक
नाशिक जिल्ह्यातील नांदुर शिंगोटे गावातील रहिवासी सातमळ्याच्या जंगलात भिल्ल वीरांसह राहत असे, इंग्रजसेवेत असताना शिस्तभंगाचा आरोप ठेवून त्यास कैद केले. तुरुंगातून सुटताच विखुरलेल्या वनवासी भिल्ल समाजाला संघटित केले. सैनिकी तुकड्या निर्माण केल्या. भागोजी व इंग्रज यांची आंबापाणी येथे समोरासमोर भेट झाली. यात इंग्रजांना माघार घ्यावी लागली. या संघर्षानंतर फितुराच्या सहाय्याने कपटाने भागोजीस ठार केले.
 
 
क्रांतिवीर खाज्या नाईक
खाज्या नाईक यांनी १८३१- १८५१ या कालखंडात इंग्रजांची चाकरी केली. इंग्रज आणि सावकार मूळ निवासींचे शोषण करतात, हे पाहून त्यांना राग आला. त्यांनी इंग्रजांविरुध्द बंड केले. त्यांना भीमा नायक, मोवाश्या नाईक, अकाप्पीचा कालुबाबा, रुमाल्या नाईक, दौलू नायक, आनंद नाईक हे क्रांतिकारी मिळाले.श्रीमंतांची लूट करुन गरिबांमध्ये ते वाटत असत. १८५७ साली सेंधवा घाटात इंदूर येथून मुंबईला घेऊन जात असलेल्या ७ लाखांच्या खजिन्याची त्यांनी लूट केली. १८६० मध्ये कपटाने झोपलेल्या खाज्या नाईकला पकडून त्यांचे शीर कापून जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे निंबाच्या झाडाला आठवडाभर टांगून ठेवण्यात आले होते.
 
 
क्रांतिवीर भीमा नायक
क्रांतिवीर भीमा नायक यांचा जन्म मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात मुडन गावात झाला. सन १८१८ मध्ये मराठ्यांचा पराभव झाला. खान्देश आणि पश्चिम निमाडवर इंग्रजांनी कब्जा केला. मूळ निवासी आणि ग्रामस्थांनी इंग्रजांची गुलामगिरी नाकारली. सावकार आणि जमीनदारांनी अत्याचार सुरु केले. लोकांनी केलेल्या विद्रोहाचे नेतृत्व भीमा नायक यांनी केले. सन १८५७ ला भीमा नायकच्या तुकडीने तीरकमानच्या सहाय्याने इंग्रजांना जेरीस आणले. तात्या टोपे यांना आश्रय दिला. भीमाच्या डोक्यावर इंग्रजांनी रोख बक्षीस ठेवले. दरम्यान भीमा, खाज्या आणि अन्य साथीदारांच्या मदतीने शिरपूरजवळ गौरी नदीकिनारी इंग्रजांवर हल्ला करुन २०० इंग्रजांना ठार केले. १० वर्षे त्यांनी संघर्ष केला. कपटाने त्यांना पकडण्यात आले. जन्मठेपेची शिक्षा होऊन अंदमान- निकोबार येथे काळ्या पाण्यासाठी पाठवण्यात आले. तेथे ९ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर २९ डिसेंबर १९७६ ला ते शहीद झाले.
 
 
हल्दीबाई भील (राजस्थान)
मेवाडवर १५५९ साली मुघलांनी आक्रमण केले. इतिहासातील प्रसिध्द महाराणा प्रताव व मुघलांदरम्यान लढाई हल्दीघाट येथे झाली. या युध्दात सर्वप्रथम वीर मरण प्राप्त झाले, ती महिला आदिवासी भील युवती हल्दीबाई. तिच्या बलिदानावरुन या घाटास हल्दीघाट असे नाव पडले.
 
 
राणा पुंजा भील
राणा पुंजा भील हे उदयपूर जिल्ह्यातील पुनखा गावातील रहिवासी होते. १६व्या शतकात अकबराने राजस्थानमधील मेवाड, उदयपूर व चित्तोड येथे हल्ला केला. मूळ निवासी राणा पुंजाने आपल्या १० हजार सैन्यासह हल्दीघाट देबारी येथे अकबराच्या सैन्यास रोखून ठेवले. गुरीला युध्द प्रणालीचा वापर राणा पुंजा भील यांनी केला. हल्दी घाटाच्या युध्दात महाराणा प्रताप यांचा जीव त्यांनी वाचवला. म्हणून महाराणा प्रताप यांच्या आईंनी पुंजा भील यास दुसरा मुलगा मानून त्यांच्या नावापुढे राणा ही उपाधी देऊन गौरव केला. मेवाडच्या राजचिन्हावर एकाबाजूस महाराणा प्रताप व दुसर्‍या बाजूस राणा पुंजा भील यांची प्रतिमा निर्मित करुन गौरव केला.
 
 
झाशीची वीरांगणा झलकारी देवी
वीरांगणा झलकारी देवीचा जन्म झांशीच्या बुंदेलखंडच्या मूळ निवासी कुटुंबात झाला. बालपणापासून त्या साहसी होत्या. जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेल्या असता वाघ आला, त्यांच्या सोबतचे लोक पळून गेले. पण झलकारी यांनी कुर्‍हाडीने वाघाचा खात्मा केला. अशाप्रकारे लुटारुंच्या एका टोळीस त्यांनी पळवून लावले होेते. वीरांगणा झलकारी देवी या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या सैन्यात महिला सेनेच्या सेनापती होत्या.
 
 
१८५७च्या उठावात निर्णायक क्षणी समयसुचकतेचा परिचय त्यांनी दिला. राणी लक्ष्मीबाई यांना घेराव पडल्यानंतर त्या स्वत: राणी लक्ष्मीबाई बनून खर्‍या राणी लक्ष्मीबाईंना त्यांनी झाशीच्या सीमेबाहेर काढले. त्यांचा चेहरा राणी लक्ष्मीबाईंशी मिळता जुळता होता. ४ एप्रिल १८५७ रोजी इंग्रजांशी लढताना त्यांना वीरमरण आले. वीरांगणा झलकारी देवीच्या स्मरणार्थ २००१ साली भारत सरकारने पोस्टाचे तिकीट जारी केले.
 
 
गोंड राजे शंकरशहा - रघुनाथ शहा
भारतात गोंड नावाची जनजाती आहे. नरहर शहाच्या मृत्यूनंतर बाल वयातच शंकरशहा हे गडमंडला येथील राजघराण्याचे नरेश झाले. त्यांनी गोटीया सेनेची स्थापना केली. १८१८ साली काही इंग्रजी अधिकार्‍यांची त्यांनी हत्त्या करण्याची योजना केली. त्यात अनेक अधिकारी मारले गेले. यानंतर १ हजार वनवासिंनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. १८५७च्या उठावात बहादूरशहा जाफर, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा संपर्क आला. जबलपूरच्या इंग्रजांच्या तावडीतील तोफखाना क्रांतिदिनी ताब्यात घेण्याची जबाबदारी शंकरशहा यांच्यावर राणीने सोपवली. दुर्दैवाने या तयारीची खबर इंग्रजांना लागली. राजा शंकरशहा आणि रघुनाथशहा यांना घेराव घालून इंग्रजांनी अटक केली. १८ सप्टेंबर रोजी या पिता-पुत्रंाना तोफेच्या तोंडी देण्यात आले.
 
 
तिलका मांझी
पुंजा तिलका मांझी यांचा जन्म बिहारमधील भागपूरजवळील तिलकपूर येथे ११ फेब्रुवारी १७५० ला झाला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून हा देश मुक्त व्हावा, म्हणून तेव्हा त्यांनी आंदोलन सुरु केले. फोडा, झोडा आणि राज्य करा इंग्रजांच्या या नीतीविरुध्द तिलाक मांझी यांनी लोकांना संघटित केले. गनिमी काव्याचा वापर करुन त्यांनी इंग्रजांना निकराची झुंज दिली. तिलका मांझी यांना पकडण्यात इंग्रजांना यश आले. १७८५ साली जानेवारी महिन्यात त्यांना फाशी देण्यात आली. ज्या स्थानावर त्यांना फाशी देण्यात आली ते स्थान तिलका मांझी चौक नावाने प्रसिध्द आहे.
 
 
वीर बुधू भगत
सन १८३१- ३२ च्या विद्रोहाचे नायक बुधू भगत उराव जनजातीतील होते. ते रांची जिल्ह्यातील मूळ निवासी होते. त्यांची भीती इंग्रजांच्या मानगुटीवर बसली होती. १३ फेब्रुवारी १८३२ रोजी कॅप्टन सेनेने बुधू भगत यांना सिलाईगाव येथे घेरले. त्यांच्या ४०० समर्थकांनी त्यांच्या भोवती गोल मानवी भिंत तयार करुन गावाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंग्रजांच्या गोळीबारात बुधू भगत शहीद झाले.
 
 
सिध्दू, कान्हू, चांद, भैरव
झारखंड राज्यातील इंग्रजांविरुध्द प्रथम जनक्रांती सन १८८५ मध्ये झाली. संथाल हूल या नावाने ती प्रसिध्द आहे. या क्रांतीचे नेतृत्व संभाल परगाण्यातील चुन्ना माझी यांचे चारपुत्र सिध्दू, कान्हु,चांद आणि भैरव यांनी केले. ३० जून १८८५ रोजी २० हजार सशस्त्र लोक एकत्र झाले. बंदुकीच्या गोळ्यांचा विरोध तीरकमानने झाला. दरम्यान, चांद आणि भैरव इंग्रजांच्या गोळीला बळी पडले. फितुरीने कान्हू पकडले गेले तर १९ ऑगस्टला सिध्दूलाही पकडण्यात आले. दोघांनाही फाशी देण्यात आली.
 
 
गोंडवली राणी फुलकंवर
गढा- गोंडवनाचे राजे शंंकरशहा आणि रघुनाथशहा यांना तोफेच्या तोंडी दिल्यानंतर शंकरशहांची पत्नी राणी फुलकंवर यांनादेखील पकडण्यात आले. तिने दासीचे रूप घेऊन यशस्वी पलायन केले. इंग्रजांना मदत करणार्‍या अनेकांना यमसदनी पाठवले. गनिमी काव्याने तिने इंग्रजांच्या तोंडचे पाणीच पळवले होते. इंग्रजांनी तिच्या सैन्याला चारही बाजूंनी घेरले. पराभव निश्चित झाल्याने स्वत:ची कट्यार स्वतःला मारून त्यांनी जीवनयात्रा संपवली.
@@AUTHORINFO_V1@@