जागतिक आदिवासी दिनामागे दडलयं काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2018
Total Views |


 


आज ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन! या दिवसामागे नेमके काय आहे? भारत आणि या जागतिक दिनाचा खरच काही संबंध आहे का? मुळात हा दिवस कोणी, का व कशासाठी सुरू केला, का साजरा होऊ लागला? त्याविषयी...

 

गेल्या चार-पाच वर्षांत भारतातील जनजातीय (आदिवासी) समाजाच्या भोळेपणाचा, त्यांच्या एकत्रित समूह पद्धतीने राहण्याचा, अस्मितेचा फायदा घेऊन भारतातील काही विचारधारा, संस्था, पंथ-जातीपातींमध्ये भेद उत्पन्न करणारी यंत्रणा आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या साहाय्याने ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरा करीत आहे. जगात ४४ कोटी आदिवासी असून त्यातील ११ कोटी आदिवासी भारतीय आहेत. आपण भारतवासी नसून मूलनिवासी, म्हणून आपण आदिवासी आहोत, उर्वरीत परके आहेत. त्यांना घालवून राजा होण्याचा हा गौरव दिन म्हणजे जागतिक आदिवासी दिवस ९ ऑगस्ट, असा गैरसमज या काही संस्था भोळ्या समाजात पेरत आहेत.  १९९२ मध्ये जिनिव्हा येथे ‘युनेस्का’च्या बैठकीमध्ये जगातील आदिम, आदिवासी, मूलनिवासी लोकांच्या सद्यःस्थितीचा विचार होऊन एक ठराव पारित करण्यात आला.४५ कलमांचा हा ठराव आठ भागांत विभाजित करण्यात आला. हा ठराव करताना ज्या मुख्य गोष्टी विचारात घेतल्या गेल्या, त्याचा आणि भारताचा सुतराम संबंध नव्हता आणि हे भारताच्या प्रतिनिधींनी ठरावाच्या बाजूने सही करताना स्पष्ट केले होते. जागतिक हिताच्या दृष्टीने आम्ही यावर सही करीत आहोत, परंतु हे स्पष्ट करीत आहोत की, भारतामध्ये राहणारे सर्वच जण हे येथील मूलनिवासी आहेत. या देशात बाहेरून आक्रमणकारी येऊन त्यांनी येथील मूलनिवासींचे हक्क हिरावून घेतले, त्यांना गुलाम केले असे नाही. मात्र, वितुष्ट पसरवणाऱ्या विचारधारेच्या दृष्टीने भारतात आर्य हे बाहेरून आले. त्यांनी अनार्यांवर आक्रमण करून त्यांची संस्कृती, धर्म, नष्ट करून त्यांची भूमी बळकावली. परंतु, या सर्व गोष्टींना भारताने नाकारले आणि ठरावाच्या वेळी विरोध करून आपली बाजू सुस्पष्टपणे मांडली.

 

१९४७ नंतर भारतासह अनेक देश स्वतंत्र झाले. इंग्रजांच्या वसाहतींमध्ये जे गुलाम म्हणून राहत होते, ते स्वतंत्र झाले. भारतामध्ये जरी ते दीडशे वर्षे होते, तरी पहिल्या दिवसापासून ते जाईपर्यंत त्यांना येथे पावलोपावली सर्व जनतेने कायम विरोध केला. दुसरे म्हणजे युरोपीय सैन्याबरोबर धर्मप्रसारक या चौथ्या सेनेनेही जगात हैदोस घातला. सैन्य अनेकांना मारायचे, तर धर्मप्रचारक सर्वांना ख्रिस्ती करायचे. भारतात राज्यसत्ता येऊनही धर्मपरिवर्तन-ख्रिस्ती करण्यास त्यांचा सपशेल पराभव झाला. जगात जे अन्य स्थानी ख्रिश्चनही झाले नाही अथवा मुसलमानही झाले नाही, जे आपल्याच देशात परागंदा झाले अथवा कडेकपारीत भीतीयुक्त जीवन जगू लागले, ज्यांनी त्यांची संस्कृती, क्रूरता काहीही स्वीकारली नाही, जे आपल्या परंपरागत जीवनाशी एकरूप राहिले, ते सर्व तेथे मूलनिवासी आदिवासी म्हणून जगण्यास हतबल झाले आणि मूलनिवासींच्या अनेक व्याख्यांमध्ये याच सर्व गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत.मूलनिवासींमध्ये काही प्रदेश आणि जनजातीय समाजही निश्चितपणे सांगता येतो. उदा. आफ्रिकेतील फ्रेंच सोमालिया, ब्रिटिश सोमालिया, लॅटिन अमेरिकेतील फ्रेंच गयाना, डच गयाना, अमेरिकेतील रेड इंडियन, नेटिव्ह ऑस्ट्रेलियन्स, पापुआ, मावरी. या एतद्देशीय लोकांची पूर्वीपासून वस्ती होती. माया, इन्का यांच्यासारख्या संस्कृती जगाच्या पटलावरून नष्ट झाल्या. २१ व्या शतकाच्या शेवटी ‘युनो’च्या माध्यमातून मूलनिवासींचे प्रश्न जागतिक स्तरावर विविध माध्यमांद्वारे मांडले जाऊ लागले. त्यातून १९९३ हे जागतिक मूलनिवासी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. १९९४ - २००४ ही दहा वर्षे मूलनिवासींचे दशक म्हणूनही साजरीकरण्याचे ठरले. यातून मूलनिवासींना स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली जगण्याचा व जपण्याचा अधिकार प्रदान करणे, मूलनिवासींचे जीवन, त्यांची एकात्मता, सुरक्षितता याबद्दलची हमी देणे, त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची वंशहत्या अथवा हिंसाचार न होण्याची हमी, व्यक्तिगत तसेच सामूहिकरित्या जगण्याचा अधिकार, आणीबाणी व युद्धप्रसंगी त्यांचे मूलभूत नागरी हक्क अबाधित राहतील याची हमी, मूलनिवासींच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक व भाषाशास्त्र याविषयीचे हक्क मान्य करण्यात आले आहेत. त्यांचा इतिहास, परंपरा, भाषा, बोलीभाषेचा वापर, लेखनपद्धती, त्यांची स्वत:ची, समुदायाची नावे, स्थळे इ. गोष्टींचे संवर्धन करण्याचा अधिकार अशा बऱ्याच गोष्टींचा सहभाग त्या दहा वर्षांत करण्यात आला. जगाला मूलनिवासींचा विचार करण्यासाठी २१ वे शतक लागले. ते भारतात स्वातंत्र्यानंतर घटनेने १९५२ मध्येच जनजातीय समाजाला दिले. त्यानंतरही विविध आयोगांच्या विशेषत: नियोगी आयोगाच्या शिफारशीवरून, पंचायत राज्य कायदा, जंगल कायदा हे भारतातील एक मुख्य निवासी, परंतु आज मुख्य प्रवाहापासून, विकासाच्या गतीपासून दूर असलेल्या जनजातीय समाजाला दिले आहेत.

 

युनो’पासून जगातील अनेक विचारवंत हे मान्य करतात की, भारतात मूलनिवासी ही समस्या नाहीच आहे. अन्य देशांतील मूलनिवासी संदर्भातील ध्येयधोरणे भारतात लागू करण्याची आवश्यकता नाही, परंतु दुर्दैव हेच आहे की, भारत अजूनही इंग्रजी मानसिकतेच्या गुलामीतून मुक्त झालेला नाही.

 

आपल्या देशाचे वैशिष्ट्य हेच आहे की, भाषा, वेशभूषा, खानपान यात विविधतेने नटलेला असूनही विविध पंथांनी, जातीअंतर्गत वेगळा वाटत असला तरी सांस्कृतिकदृष्ट्या, आंतरिक श्रद्धा, विश्वास, परंपरा, गौरव परंपरेने एकच आहे. ‘आम्ही सारे भारतीय एक आहोत ‘ आणि याची अनुभूती वर्षानुवर्षे या देशाने जगाला दाखविली आहे. स्वतंत्र भारतात काँग्रेस, पुरोगामी डावे, ख्रिश्चन, मिशनरी, मुस्लीम आणि जातीवर आधारित छोटेमोठे पक्ष, संस्था यांनी भेद केले. त्यातून पंथीय संघर्ष, नगरवासी, ग्रामवासी, आदिवासी संघर्षही उदयास आले. खोट्या अस्मिता जपल्या गेल्या, विद्वेषाची पातळी इतक्या खालच्या पातळीवर गेली की, महाविद्यालय परिसरात खुलेपणाने भारतीय संस्कृती, इतिहास यांना अमान्य करण्यात आले. ज्यांचा आपला काही संबंध नाही ते उत्सव म्हणून साजरे होऊ लागले. उदा. बीफ महोत्सव, love for kissing, मूलनिवासी, भारत तोडो, आझादी यासारख्या दिवसांची जेएनयुपासून विविध स्तरांवर याच्या वैचारिक फुटीरतेची बांधिलकी प्रस्थापित होऊ लागली आहे. भारतात ९ ऑगस्ट म्हणजे ‘चले जाव’ हा ‘ऑगस्ट क़्रांती दिन’ म्हणून प्रसिद्ध होता. त्यानंतर मात्र समाजवादी, डाव्या विचारांच्या लोकांनी, शिक्षण व्यवस्थेने या दिनाचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न केले. सदर विचारांशी बांधिल असलेले लोक, संस्था ९ ऑगस्ट हा दिन ‘ऑगस्ट क्रांती दिन’ ऐवजी ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्यात धन्यता मानू लागले. यातही आदिवासींच्या हक्कासंदर्भात जागरूकता नाहीच आहे, उलट मूलनिवासी, आर्य, अनार्य, स्पृश्य, अस्पृश्य भेदाभेदाचे विष कालवून आपला स्वार्थ साधण्यासाठी साजरा करीत आहेत. दुर्दैवाने सरकारी स्तरावरही ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून मान्य आहे. काही ठिकाणी कार्यक्रमांचेही आयोजन होते. ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून का साजरा होत आहे, याची कारणमीमांसा व्हायला हवी. वनवासी कल्याण आश्रम अथवा जनजाती समाजासाठी कार्य करणाऱ्या विविध व्यक्ती व संस्था देशाच्या दृष्टीने याचा विचार करून जागृती निर्माण करीत आहेत. त्यामुळे जगाच्या नकाशावर जरी हा दिवस यशस्वी होत असला, तरी यापुढे भारतात या दिवसाचे सत्यस्वरूप स्वीकारले जाईल.

-शरद चव्हाण

@@AUTHORINFO_V1@@