‘आलो आंधारि’ची सत्यकथा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2018   
Total Views |


 


पोटाची खळगी भरण्यासाठी घरकाम करणारी एक गोरगरिब स्त्री अनपेक्षितपणे लेखिका म्हणून नावारुपास आली. तिची पुस्तकं विविध भारतीय भाषांमध्येही प्रसिद्ध झाली. पण, अजूनही ‘ती’ घरकामच करते...

 

असे म्हणतात की, आयुष्याला सामोरे जाताना येणारी प्रत्येकच परिस्थिती अनुकूल असेलच असे नाही, तर आपल्या स्वतःलाच परिस्थितीला अनुकूल करावे लागते. म्हणजेच आयुष्य जगताना आपल्याला जसे वाटते तशाच घटना घडतील असे नव्हे, तर घडणाऱ्या घटना, येणारे प्रसंग हे वास्तवात आपल्या कल्पनेपलीकडलेही असू शकतात. खरे म्हणजे आयुष्याशी जो आपला सतत वाद, झगडा, झुंज सुरू असते, त्यालाच ‘संघर्ष’ असे म्हणतात. आयुष्याचा संघर्ष सुरू असताना यशदेखील अशाच व्यक्तीच्या पायाशी लोळण घेते, जी व्यक्ती उत्कटतेने कठोर मेहनत घेऊन, कष्ट करून मार्गात येणाऱ्या प्रत्येक समस्येचा, अडचणीचा, संकटाचा न डगमगता सामना करतात. ज्या व्यक्तीमध्ये हे वैशिष्ट्य नसते, अशांपासून यश नेहमीच शेकडो मैल दूरदूरच धावत असते. आज आपण अशाच एका ‘संघर्षाचा दाखला’ म्हटल्या जाणाऱ्या बेबी हालदर यांची माहिती घेणार आहोत. बेबी हालदर-ज्यांना त्रास देण्यात, जीव मेटाकुटीला आणण्यात परिस्थितीने कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. पण, कितीही संकटे आली तरी त्यांना गाडून पुढे पुढे जात राहण्याचे त्यांच्या मनानेच नक्की केले होते आणि त्यांनी तसे सिद्धही केले. बेबी हालदर यांना सुरुवातीला त्यांच्या आईने सोडून दिले, नंतर पतीनेच त्यांच्यावर बलात्कार केला आणि तरीही पुढे परिस्थितीला आपल्यासमोर शरणागती पत्करायला भाग पाडत त्या एक प्रसिद्ध लेखिकाही झाल्या.

 

एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या, राहिलेल्या बेबी हालदर पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये राहातात. पण, त्यांच्या आयुष्याचा घटनाक्रम पाहिला असता तो एखाद्या भयानक चित्रपटापेक्षा कमी नसल्याचेच स्पष्ट होते. बेबी हलदर चार वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईने बेबीचा इवलासा हात सोडून दिला. त्यानंतर केवळ 12व्या वर्षी त्यांचे लग्न लावण्यात आले आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीने बेबीवर बलात्कार केला. लग्नानंतरची 25 वर्ष बेबी हलदर फक्त पतीच्या शिव्या खाऊन, मारहाण सहन करूनच जगली. पतीच्या सततच्या शिव्या आणि मारहाणीला वैतागून पदरात दोन मुले पडलेली असताना, बेबी हालदर यांनी पतीचे घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वेतून शौचालया बाहेरच्या मोकळ्या जागेत बसून दिल्ली गाठली. दिल्लीला आल्यानंतर बेबी हालदर यांनी निवृत्त मानव विज्ञान प्राध्यापक आणि हिंदीतील महान लेखक मुन्शी प्रेमचंद यांचे नातू प्रबोध कुमार यांच्याकडे मदत मागितली. इथेच त्यांनी घरकाम करण्याची-कामवाल्या बाईची-मोलकरणीची रोजंदारी पत्करली आणि इथेच त्यांचे आयुष्य 360 अंशांच्या कोनात बदलले. प्रबोध कुमार यांच्या घरात साफसफाई करता करता बेबी हालदर नेहमीच बुक शेल्फ आणि त्यातील पुस्तकांना न्याहाळत असत. कधी कधी तर त्या शेल्फमधील बंगाली पुस्तके घेऊन वाचायलाही सुरुवात करत. ज्यावेळी प्रबोध कुमार यांना बेबी हालदर यांचा कल पुस्तकांकडे असल्याचे समजले, तेव्हा त्यांनी स्वतः बेबी हालदर यांना बांगलादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांचे पुस्तक दिले आणि वाचायला सांगितले. तसलिमा नसरीन यांचे पुस्तक पूर्णपणे वाचून झाल्यावर प्रबोध कुमार यांनी बेबी हलदर यांना एक कोरी वही दिली आणि आपली स्वतःची कथा त्याच्यावर उतरवायला सांगितले. एका मुलाखतीत प्रबोध कुमार यांनी याबाबतचा किस्सा सांगितला की, “मी कोरी वही दिल्यानंतर बेबी घाबरली. कारण, ती फक्त सातवीपर्यंतच शाळा शिकली होती. पण, जशी ती पुस्तक लिहायला-स्वतःची कथा कागदावर उतरवायला बसली, तेव्हा तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला.”

 

बेबी हालदर यांनी लिहिलेली स्वतःची कथा ज्यावेळी प्रबोध कुमार यांनी पहिल्यांदाच वाचली तेव्हा ते इतके भावूक झाले की, त्यांनी त्याचा हिंदीत अनुवाद केला. त्यानंतर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आणि हळूहळू या पुस्तकाचे नाव, पुस्तकातली कथा लोकांच्या ओठांवर आली. 2002 साली बेबी यांचे पहिले पुस्तक ‘आलो आंधारि’ नावाने प्रकाशित झाले. अर्थात, अंधाराकडून प्रकाशाकडे मार्गक्रमण करा. गेल्याच वर्षी त्यांचे हे पुस्तक इंग्रजीतही प्रकाशित झाले. पहिल्या पुस्तक प्रकाशनानंतर आज बेबी हालदर यांचे नाव साहित्यक्षेत्रातले प्रसिद्ध नाव झाले. त्यानंतर त्यांना साहित्यक्षेत्राशी संबंधित प्रसंग, कार्यक्रमासाठी पॅरिस, हाँगकाँगचा प्रवास करण्याची संधीही मिळाली. विशेष गोष्ट म्हणजे बेबी हालदर यांच्या पुस्तकांचा आतापर्यंत 24 भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. जगातल्या कित्येक ठिकाणी झालेल्या साहित्य मेळाव्यांत त्यांनी भाग घेतलेला आहे. 2002 सालापासून बेबी हालदर यांनी आतापर्यंत एकूण चार पुस्तके लिहिली आहेत. बेबी यांच्या बाबतीतली सर्वात चमत्कारिक गोष्ट म्हणजे, एक प्रसिद्ध लेखिका झाल्यानंतरही त्या आजही कामवाल्या बाईचे-मोलकरणीचेच काम करतात. आजही लोक त्यांना त्याचे कारण विचारतात, तेव्हा त्या उत्तर देतात की, ”ज्यांनी मला काम दिले, लेखनासाठी प्रोत्साहित केले, त्यांना सोडून मी जाऊ शकत नाही.”

@@AUTHORINFO_V1@@