ते पंधरा दिवस : ९ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2018   
Total Views |

 
 
सोडेपुर आश्रम. कलकत्त्याच्या उत्तरेला असलेला. तसा शहराबाहेर म्हणावा असाच. कलकत्त्यापासून साधारण आठ – नऊ मैलांवर. अत्यंत रमणीय. झाडांनी, लता – वेलांनी बहरलेला हा सोडेपुर आश्रम, गांधीजींचा अत्यंत आवडता. गेल्या वेळी ते येथे आले असताना म्हणालेही होते की ‘हा आश्रम माझ्या अत्यंत आवडत्या साबरमती आश्रमाची बरोबरी करतो’ म्हणून..!
 
 
आज अगदी पहाटे पासून आश्रमात गडबड आहे. तसे ही आश्रमवासी सकाळी लवकरच उठतात. त्यातून आज गांधीजी आश्रमात रहायला येणार. गेल्या आठवड्यापासून आश्रमात तयारी चाललेली आहे. स्वच्छता, साफ-सफाई रोजच होते. पण आताची जरा विशेष. कारण बापू इथे राहणार आहेत. विशेषतः सतीश बाबुंचा उत्साह ओसंडून वाहतोय. सतीश बाबू म्हणजे सतीश चंद्र दासगुप्ता. सर आचार्य प्रफुल चंद्र राय यांनी स्थापन केलेल्या, भारतातील पहिल्याच, ‘बेंगाल केमिकल वर्क्स’ या केमिकल कंपनीत सतीश बाबुंची चांगली नोकरी होती. सुपरिटेन्डेंट होते ते तिथे. शास्त्रज्ञ असल्यामुळे बरेच प्रयोगही करायचे. पण त्यांची पत्नी हेमप्रभा आणि ते स्वतः गांधीजींच्या संपर्कात आले, अन सारंच बदललं. सव्वीस - सत्तावीस वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी नक्की सांगायचं तर सन १९२१ साली, सतीश बाबुंनी आपली चांगल्यापैकी नोकरी सोडली, अन काहीसा कलकत्त्याच्या बाहेर असलेला, हा सुरेख आश्रम उभा केला. सध्या सतीश बाबू अन हेमप्रभा दीदी हे आश्रमातच राहताहेत.
 
 
हेमप्रभा दीदिंवर गांधीजींचा चांगलाच पगडा आहे. त्यांनी म्हणुनच, अगदी सुरुवातीला, गांधीजींच्या चळवळीला आपल्या जवळचं होतं नव्हतं ते सर्व सोनं देऊन टाकलं. सतीश बाबुंना त्याचं काही वाटलं नाही. वाटला तो अभिमानच..!
 
 
सतीश बाबुंनी या आश्रमात बरेच प्रयोग केले आहेत. मुळात ते शास्त्रज्ञ. त्यातून गांधीजींच्या ‘स्वदेशी उद्योगाने’ त्यांना भुरळ घातलीय. त्यांनी आश्रमात स्वस्त आणि सोपी ऑईल प्रेस बनवलीय. तसंच, बांबूंच्या पल्प पासून कागद बनविण्याचा एक लहानसा कारखानाही या आश्रमातच उभारला आहे. यातून तयार होणारा कागद फारसा गुळगुळीत नसतो. पण त्यावर लिहिता येतं. त्यानं काम भागतं. आणि तो छान दिसतो. आश्रमातली सर्व स्टेशनरी तर सतीश बाबुंनी या कागदापासून बनवलेली आहेच. पण काही प्रमाणात हा कागद बाहेरही विकला जातो.
 
 
सतीश बाबुंना जाणीव आहे की गांधीजींचे या आश्रमावर खूप प्रेम आहे. वर्ष / दीड वर्षांआड ते येथे येऊन एक – एक महिना राहतात. मग त्यांना भेटायला अनेक मोठमोठी नामवंत पुढारी मंडळी येतात अन त्या साऱ्यांच्या वास्तव्यानं हा आश्रम पावन होऊन जातो.
 
 
सतीश बाबुंना आठवतेय, सात – आठ वर्षांपूर्वीची, म्हणजे १९३९ मधली सुभाष बाबुंबरोबर झालेली भेट. गांधीजी, सुभाष चंद्र बसू आणि नेहरू. बस. तिघंच. नुकतंच त्रिपुरी कॉंग्रेसचं अधिवेशन संपलेलं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुभाष बाबू. गांधीजींच्या मनाविरुद्ध निवडून आलेले. त्यांना कॉंग्रेसच्या इतर मंडळींनी भरपूर त्रास दिला होता. त्यावर काही तोडगा काढण्यासाठी ही बैठक होती. अगदी अधिवेशन संपल्यावर लगेचच. पण तोडगा तर काही निघालाच नाही. उलट सुभाषबाबूच कॉंग्रेस सोडून गेले..! सतीश बाबू कितीही गांधीभक्त असले, तरी त्यांना या गोष्टीचं मात्र दुःख झालेलं होतं. सतीशबाबुंनी आपले विचार झटकले. गांधीजी येण्याची वेळ झालेली होती. कलकत्त्यात तसाही सूर्योदय जरा लवकरच होतो. त्यामुळे सकाळी पावणे पाच – पाच वाजायच्या सुमाराला बऱ्यापैकी उजाडलं होतं. सुमारे तासाभरात गांधीजी आश्रमात येणार होते...!
 
 
 
 
 
 
तिकडे दूर दिल्लीत, मंदिर मार्गावरच्या हिंदू महासभा भवनात सकाळी बरीच गडबड होती. महासभेचे अध्यक्ष डॉ. ना. भा. खरे कालच ग्वाल्हेर हून दिल्लीला पोहोचले होते. हे डॉ. खरे म्हणजे एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. मुळात हे कॉंग्रेसचे. १९३७ मध्ये, मध्य प्रांतातील, कॉंग्रेसचे पहिले मुख्यमंत्री होते. मात्र डॉ. खरे हे टिळकांच्या मुशीतून तयार झालेले. जहाल या गटात मोडणारे. त्यांना कॉंग्रेसने चालविलेलं मुस्लिम लीगचं लांगुलचालन पसंत नव्हतं. त्यामुळे ते या संदर्भात जाहीर भूमिका घ्यायचे, जे नेहरूंना आणि गांधीजींना पसंत नव्हतं. त्यामुळे गांधीजींनी यांना सेवाग्राममध्ये बोलावून घेतलं आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितलं.
 
 
यावर डॉ. खरे यांनी अगदी सहजपणे गांधीजींना सांगितलं की, ‘माझी मनःस्थिती ठीक नाही. तरी आपणच मसुदा लिहून द्यावा.’ इतक्या सहजपणे डॉ. खरे तयार झाले हे पाहून गांधीजी आनंदाने तयार झाले आणि त्यांनी लगेच, एका कागदावर, त्यांच्या स्वतःच्या अक्षरात, डॉ. खरे यांच्या राजीनाम्याचा मजकूर लिहून दिला. तो कागद घेऊन शांतपणे डॉ. खरे उठले आणि मोटारीने नागपूरकडे जायला निघाले. हे पाहून गांधीजी मागून ओरडले, ‘अरे, ये क्या करता हैं..? कहां जाता हैं..?’ मात्र डॉ. खरे नागपूरला आले. गांधीजींच्या हस्ताक्षरातला तो राजीनामा त्यांनी नागपूरच्या वतर्मानपत्रांमध्ये छापला आणि ‘गांधीजी स्वतः कसे राजीनामा द्यायला, एका मुख्यमंत्र्याला भाग पाडताहेत,’ हे जनतेला दाखवून दिले...!
 
 
तर असे हे डॉ. ना. भा. खरे, सध्या हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या मदतीला आहेत पंडित मौलीचंद्र शर्मां सारखं भारदस्त व्यक्तिमत्व. पंडित शर्मांची पार्श्वभूमीही कॉंग्रेसची आहे. १९३० आणि १९३१ च्या लंडनच्या गोलमेज परिषदेत त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र कॉंग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणामुळे कंटाळून ते हिंदू महासभेच्या जवळ गेले. आज स्वतः तात्याराव सावरकर हिंदू महासभा भवनात उपस्थित आहेत. त्यामुळे प्रत्येकाचे चेहरे प्रमुदित झालेले आहेत.
 
 
सकाळी न्याहारी करून बरोबर ९ वाजता हिंदू महासभेच्या केंद्रीय समितीची बैठक सुरु झाली. बैठकीत हिंदू महासभेच्या घोषित मुद्द्यांवर चर्चेला प्रारंभ झाला. खंडित हिंदुस्थानात येथील नागरिकांना पूर्ण अधिकार राहतील. मात्र प्रस्तावित पाकिस्तानात ज्याप्रमाणे हिंदूंची स्थिती राहील, तशीच स्थिती खंडित हिंदुस्थानात मुसलमानांची असावी, अशी मागणी पुढे आली. हिंदी भाषिक प्रांतात देवनागरी लिपीत, हिंदीतून व्यवहार असतील. अन्य प्रांतात शिक्षणाचे माध्यम स्थानिक भाषा आणि लिपी असली तरी, राष्ट्रभाषा हिंदी ही प्रशासकीय आणि न्याय व्यवस्थेत मान्य असावी. याशिवाय, अनिवार्य सैनिकी शिक्षणासह इतर अनेक मागण्या करण्यात आल्या.
 
 
खंडित हिंदुस्थानात तरी हिंदूंना ताठ मानेनं जगता यावं म्हणून ही सारी मंडळी वेगवेगळ्या दिशांचा शोध घेत होती...!
 
जुम्म्याच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ, अर्थात शनिवार, ९ ऑगस्टची सकाळ ही जीनांसाठी, त्यांच्या प्रिय पाकिस्तानातली दुसरीच सकाळ होती. कराचीतला तो प्रशस्त बंगला, म्हणजे जीनांचे तात्पुरते निवासस्थान होते. जीनांच्या डोक्यात असंख्य गोष्टी, एकाच वेळी घोळत होत्या. नवीन पाकिस्तान चं स्वरूप कसं राहील, तिथली न्याय-व्यवस्था कशी राहील, पाकिस्तानचा राष्ट्रध्वज कसा राहील, पाकिस्तान चं राष्ट्रगीत कसं राहील... आणि या विचारावर बॅरिस्टर मोहम्मद अली जीना थबकले. खरंच. बाकी सर्व बाबींवर सखोल विचार झाला. पण पाकिस्तानच्या राष्ट्रगीतावर अर्थात ‘कौमी तराना’वर फारशी चर्चा झालेली नाही. आता फक्त पाचच दिवस उरलेत, अधिकृतरीत्या पाकिस्तान अस्तित्वात यायला.
 
दिल्लीत असताना, जीनांनी काही कवींच्या रचनांवर खुणा करून ठेवलेल्या होत्या. त्या त्यांना काल अचानक आठवल्या. त्यात एक नाव होतं – जगन्नाथ आजाद यांचं. मुळचे लाहोरचे पंजाबी हिंदू. पण उर्दू भाषेवर जबरदस्त प्रभुत्व. काफिर आहेत. असेना का. चांगलं गीत उर्दूत लिहून दिलं, तर अजून काय हवं..? त्यांनी मग काल निश्चय केला, या आजादांनाच बोलवावं, पाकिस्तान चा कौमी तराना लिहिण्यासाठी. काल दुपारी त्या आजादांना लाहोर हून बोलावणं पाठवलंय. कदाचित आतापर्यंत ते यायला हवेत.
 
 
जीनांनी त्यांच्या ए डी सी ला हक मारली अन विचारलं की ‘लाहोर हून कोणी जगन्नाथ आजाद आले आहेत का.?’ ते सकाळीच आलेले होते. मग जीनांनी त्यांना आत पाठवायला सांगितलं. जगन्नाथ आजाद. उण्यापुऱ्या तीस वर्षांचा तरुण. जीनांची कल्पना होती, की अशी प्रगल्भ शायरी करणारा माणूस म्हणजे किमान पन्नाशीतली प्रौढ व्यक्ती असेल.
 
 
जीनांनी जगन्नाथ आजाद याला बसायला सांगितलं. त्याची विचारपूस केली. आणि त्याला विचारलं की त्याच्याजवळ पाकिस्तानचं ‘कौमी तराना’ होऊ शकेल असं एखादं गीत आहे का..? जगन्नाथ आजाद जवळ असं गीत तयार नव्हतं. मात्र त्याच्या कल्पनेत अश्या प्रकारची रचना होती. तो सांगू लागला –
ऐ सरजमीं – ए – पाक
जर्रे तेरे हैं आज
सितारों से ताबनाक,
रोशन हैं कहकशां से
कही आज तेरी खाक
तुन्दी – ए – हसदां पे
ग़ालिब हैं तेरा सवाक,
दामन वो सिल गया हैं
जो था मुद्दतों से चाक
ऐ सर जमिनें – ए – पाक..!
 
 
बस. हेच ते. हेच. जीनांना हा तराना खुपच आवडला... अन एका काफिरानं लिहिलेलं गाणं, वतन – ए – पाकिस्तानचा ‘कौमी तराना’ होणार, हे निश्चित झालं..!
 
 
शनिवार. ९ ऑगस्ट.
 
 
अमृतसरसाठी तरी आजचा दिवस प्रचंड तणावाचा आहे. अमृतसर शहरात आणि जिल्ह्यात मुसलमानांची संख्या जास्त आहे. सीमेवरच्या इतर गावांमधून दंगलींच्या बातम्या सतत येताहेत. त्यामुळे शीख, हिंदू आणि मुसलमान हे सर्वच चिडलेले आहेत. शिखांनी त्यांच्या पवित्र गुरुद्वाराच्या सभोवताली कडव्या निहंगांचा जागता पहारा ठेवलाय. गुरुद्वारामधील ते पवित्र सरोवर शिखांना, मुसलमानांमुळे अपवित्र झालेलं नकोय.
 
 
सकाळी सुमारे साडेअकरा – बाराच्या सुमारास, अमृतसर पोलिसांनी रेल्वे स्टेशन जवळच्या टांगा स्टेन्डची घेराबंदी केली. मोठ्या संख्येत साध्या वेशातील पोलीस होते. त्यांना बरोबर टिप मिळालेली होती – मोहम्मद सईद या लीगी पठाणाची. हा मोठमोठी हत्याकांडं घडवून आणण्यातला उस्ताद होता. आणि पोलिसांनी त्याला धरला. तोच. मोहम्मद सईद. त्याच्या जवळ अनेक प्रकारची शस्त्र, उर्दूत लिहिलेली काही पत्रकं आणि काही हातबॉम्ब सापडले. एका मोठ्या हत्याकांडाला मूर्त रूप देण्यास आलेल्या मोहम्मद सईदला अटक झाली होती..!
 
 
तिकडे दिल्लीत, सर सिरील रेडक्लिफ साहेबांच्या बंगल्यावर फारशी वर्दळ नव्हती. बंगल्याच्या तीन चार खोल्यात पसरलेली असंख्य कागदपत्रं आवरून नीट पेट्यांमध्ये भरण्याचे काम चालले होते. सर साहेबांचे बरेचसे काम आटोपले होते. भारत आणि पाकिस्तान च्या विभाजनाची रेषा ओढून झाली होती. त्यात आपण न्याय केला की अन्याय, हे सर साहेबांना कळत नव्हते. एकाचा न्याय केला असे म्हणावे, तर दुसऱ्याला तो अन्याय वाटत होता. मात्र सर्व आक्षेप लक्षात घेत, आता विभाजनाची रेषा तयार होती. मात्र व्हॉईसरॉय साहेबांशी, रेडक्लिफ यांचे आज सकाळीच बोलणे झाले होते. विभाजनाची रेषा या स्फोटक वातावरणात जाहीर करणे म्हणजे आगीत तेल ओतणे होते. त्यामुळे दंगे अधिकच उसळले असते. जास्तच कत्तली झाल्या असत्या. सध्या हे थांबविणे आवश्यक होते. त्यामुळे आता, स्वातंत्र्य दिना नंतर एक - दोन दिवसात, हा विभाजनाचा तपशील जाहीर करावा असे ठरले.  रेडक्लिफ साहेबांचा रक्तदाब, अजून आठ – दहा दिवस तरी स्थिरावणार नव्हता, हे निश्चित होतं...!
 
 
दख्खनच्या हैदराबादमध्ये, त्यांच्या विशाल महालात, हैदराबाद रियासतचे निझाम, उस्मान अली खान, आपल्या दिवाणांबरोबर चर्चा करत होते. त्यांना आताच्या आता एक पत्र पाठवायचे होते जीनांना. हैदराबाद रियासत स्वतंत्र ठेवण्यासाठी त्यांना नवीन होऊ घातलेल्या पाकिस्तानच्या मदतीची गरज होती. त्यांच्या दिवाणांनी तयार केलेल्या पत्रावर, निझाम साहेबांनी लफ्फेबाज उर्दूत सही ठोकली आणि एक खास दूत कराचीला रवाना केला. फक्त आठवडा भराच्या आत, स्वतंत्र होऊ घातलेल्या खंडित भारताच्या, अगदी मध्यभागी, इटली या देशाच्या क्षेत्रफळाएवढी मुस्लिम रियासत, स्वतंत्र आणि स्वायत्त राहण्यासाठी धडपड करत होती...!
तिकडे खूप दूर, पूर्वेत, सिंगापुरला, शासकीय कर्मचाऱ्यांची सुटी झाली होती. तसंही शनिवारी पूर्ण दिवस भर शासकीय कार्यालये काम करीत नाहीत. सिंगापुरच्या ‘मरीना बे’ भागात असलेल्या त्यांच्या यूनियनच्या एका छोट्याश्या कार्यालयात हे शासकीय कर्मचारी एकत्र जमले होते. ते सर्वच्या सर्व भारतीय होते..!
 
 
सिंगापुर सरकारच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीला देण्यासाठी ते एक पत्र तयार करत होते. १५ ऑगस्टला शुक्रवार होता. अर्थात शासकीय आणि इतर कार्यालयांना सुटी नव्हती. १५ ऑगस्टला त्या सर्वांचा प्रिय देश भारत स्वतंत्र होत होता. त्या निमित्ताने ही सर्व भारतीय मंडळी उत्सवा सारखा हा दिवस साजरा करणार होती. आणि म्हणूनच या सर्वांना १५ ऑगस्टला सुटी हवी होती. या सुटीचेच पत्र, ही सर्व मंडळी तयार करत होती.
 
 
अमृतसर शहर आणि जिल्ह्यात प्रचंड तणावाचं वातावरण होतं. कारण बातमी पसरलेली होती कि पोलिसांनी मोहम्मद सईदला अटक केली आहे. या बातमीमुळे मुसलमान चिडलेले होते आणि दुपारपासून त्यांनी शीख आणि हिंदूंच्या दुकानांवर आणि घरांवर दगडं फेकायला सुरुवात केली होती. संध्याकाळपर्यंत ही दंगल संपूर्ण जिल्हाभर पसरली. मुस्लिम लीगचे नॅशनल गार्ड यात आघाडीवर होते. अमृतसर जवळच्या जबलफाड गावात १०० हिंदू आणि शिखांची नृशंस कत्तल करण्यात आली. साठसत्तरच्या वर तरण्याताठ्या मुलींना उचलून पळवून नेण्यात आलं. धापाई गावावर तर सुमारे हजार मुसलमानांनी हल्ला केला. मात्र याचा प्रतिकार ही झाला. गाझीपुर गावात १४ मुस्लिम मारल्या गेले.
 
दंग्यांची ही भीषणता बघून, मेजर जनरल टी. डब्लू. रीस यांच्या नेतृत्वाखाली धावून आलेल्या सैनिकांबरोबर मुस्लिम नॅशनल गार्डचे सैनिक जाऊन भिडले. संध्याकाळच्या त्या धूसर वातावरणात, सुमारे तासभर तरी आर्मीच्या सैनिकांबरोबर मुस्लिमांचे जणू काय युद्धच चालले होते..! काही मैल अंतरावर असलेल्या लाहोर या पंजाबच्या राजधानीच्या शहरात ही बातमी तारायत्रांच्या सहाय्याने कळविण्यात आली. पंजाबचे गव्हर्नर सर इव्होन मेरेडिथ जेनकिन्सने ती तार लक्ष्यपूर्वक वाचली. ताबडतोप आपल्या ए.डी.सी.ला बोलावविले आणि संपूर्ण पंजाब प्रांतात ‘प्रेस सेन्सरशिप’ची ऑर्डर काढायला सांगितली.
 
याचाच अर्थ, शनिवार ९ ऑगस्टला अमृतसर आणि आसपास होत असलेला भीषण रक्तपात, पंजाब च्या कुठल्याही वर्तमानपत्रात येणार नव्हता..!
 
 
तिकडे दूर पूर्वेत, कलकत्त्याच्या जवळ असलेल्या सोडेपुर आश्रमात गांधीजींच्या सायंप्रार्थनेची तयारी चालली होती. मात्र प्रार्थनेपुर्वी डॉ. सुनील बसू यांनी गांधीजींची पूर्ण तपासणी केली. सन १९३९ मधे गांधीजींचा सोडेपुर आश्रमात महिनाभराचा मुक्काम असताना, याच सुनील बाबुंनी गांधीजींची तपासणी केली होती.
 
 
तपसणी झाल्यावर सुनील बाबुंनी म्हटलं, “गेल्या आठ वर्षात गांधीजींची प्रकृती स्थिर राहिलेली आहे. त्यात काहीही फरक पडलेला नाही. १९३९ साली त्यांचे वजन, त्या एक महिन्याच्या काळात, ११२ ते ११४ पाउंडाच्या मध्ये होतं. आज ते ११३ पाउंड आहे. त्यांचे हृदय आणि फुफ्फुसे व्यवस्थित काम करताहेत. त्यांच्या नाडीच्या ठोक्यांचा वेग ६८ आहे. थोडक्यात, त्यांची प्रकृती उत्तम आहे.”
 
 
आजची गांधीजींची सायंप्रार्थना ही कलकत्त्याच्या परिस्थितीवर केंद्रित होती. हिंदू आणि मुसलमान, दोघेही वेड्यासारखे वागताहेत, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “मुस्लिम लीग मंत्रिमंडळाने काय केलं, याची झाडाझडती मी घेणार नाही. मात्र १५ ऑगस्ट पासून (खंडित) बंगालचा राज्यकारभार आपल्या हातात घेणारे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री डॉ. प्रफुल चंद्र घोष हे कसे काम करतात, याकडे माझे पूर्ण लक्ष राहणार आहे. या कॉंग्रेसच्या राजवटीत मुसलमानांवर अत्याचार तर होत नाहीत ना, हे मी बघणार आहे. मी नोवाखालीला जाणार आहे, पण कलकत्ता शांत झाल्यावर...!”
 
 
इकडे दिल्लीत, संध्याकाळ होऊन गेल्यानंतर, रामलीला मैदानावर भरपूर गर्दी उसळली होती. स्वातंत्र्य सप्ताह आजपासून सुरु होत होता. आज शनिवार. येत्या शुक्रवारी आपण स्वतंत्र होणार..! हा उत्साह, आणि कॉंग्रेसच्या दिग्गज पुढाऱ्यांची भाषणं, हे ही फार मोठे आकर्षण होते. या सभेत नेहरू, पटेल वगैरे पुढारी मंडळी बोलणार होती. कार्यक्रम दिल्लीच्या कॉंग्रेस कमिटीने आयोजित केला होता. त्यामुळे सुरुवातीला, दिल्ली प्रांताचे स्थानिक पुढारीच बोलत होते. मात्र नेहरू – पटेलांचे सभास्थानी आगमन झाले, अन् गर्दीचा माहौल एकदम बदलला. उत्साहाचा जबरदस्त संचार झाला. उच्च स्वरात लोकं घोषणा देऊ लागले.
 
 
पटेल बोलत होते, तेव्हा संपूर्ण रामलीला मैदान त्यांना शांतपणे ऐकत होतं. पटेलांनी फाळणीची विवशता लोकांना सांगायचा प्रयत्न केला. पण लोकांना ते काही पटलं नाही. आणि आवडलंही नाही. त्यामुळे पटेलांच्या भाषणानंतर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हाच प्रकार नेहरूंच्या भाषणानंतर ही घडला.
 
 
दिल्ली ही या क्षणी विस्थापितांची राजधानी झालेली होती. मोठ्या प्रमाणात घर / दार / संपत्ती हिरावलेले, लुटले गेलेले शरणार्थी दिल्लीत होते. त्यांना नेहरू – पटेलांच्या तोंडून काही ठोस ऐकायचं होतं. पण ते झालं नाही.
  
 
नेहरूंनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विषय काढला. त्यांनी गर्जना केली की ‘आता संपूर्ण आशिया खंडातून विदेशी शक्तींना पूर्णपणे बाहेर काढण्यात येईल.’ मात्र लोकांवर याचा फारसा परिणाम झाला नाही. स्वातंत्र्य सप्ताहाच्या पहिल्या दिवसाच्या सभेत, सुरुवातीला जो जल्लोष आणि उत्साह होता, तो शेवटपर्यंत टिकलेला दिसत नव्हता...!
 
 
देशाच्या मध्यभागी, नागपुरमध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल कार्यालयात, शनिवारी रात्री, संघाचे वरिष्ठ प्रचारक आणि पदाधिकारी बसले होते. समोर अखंड भारताचा नकाशा ठेवलेला होता. विभाजनाची नेमकी रेषा कोणती असेल आणि त्या रेषेपलीकडील हिंदू – शिखांना कसे वाचवता येईल, यावर गहन मंथन चालले होते..!
 
 
 
- प्रशांत पोळ
 
 
 
मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : ८ ऑगस्ट १९४७ 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@