पराभूत लोकशाही !''जाता जात नाही , ती जात ''

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2018
Total Views |

 

 

पराभूत लोकशाही !
'जाता जात नाही , ती जात '

 
भाग 2
कोणत्याही देशाची व्यवस्था टिकवणे किंवा कमकुवत करणे हे त्याराष्ट्रातील नागरिकांवर अवलंबून असते. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. लोकांनी, लोकांव्दारे आणि लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही असा याचा अर्थ सामान्यपणे अभिप्रेत आहे.लोकांनी लोकांसाठी अर्थात निवडणुक प्रक्रियेतून लोकं म्हणजेच जनता आपला प्रतिनिधी निवडून देतात. मतदानाचा अधिकार त्यासाठीच आहे.
 
लोकशाहीला मजबूत करते ती भारतीय घटना प्रत्येक राष्ट्राची घटनाही तेथील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण आणि राष्ट्राचा आत्मा असते. भारतीय घटनेने भारतीयांना बहाल केलेले मूलभूत अधिकार हे लिखीत स्वरुपात आहेत.सुदैवाने भारतीय नागरिक त्यांच्या अधिकारांबद्दल जागरुक आहेत, पण कर्तव्याबद्दल नाही. लोकशाहीत आपण राज्यकर्ते निवडून देणार असतो. त्यामुळे मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे. मतदान कोणालाही करता येत नाही. त्यासाठी नियमावली आणि कायदेही आहेत. 18 वर्षे वय पूर्ण केलेली भारतीय व्यक्ती मतदान करु शकते.
लोकांनी जात,धर्म,पंथ भेद विसरुन लोकशाहीच्या महायज्ञात सहभाग नोंदवणे अपेक्षित असते. जात निर्मूलनासाठी महापुरुषांनी त्यांचे आयुष्य वेचले आहे, परंतु लोकशाहीत भारतीय मतदार मतदान करतांना जातीचा उमेदवार बघतात, जातीचा  विचार करतात निवडणूकीत जातीचेच गणित मांडले जाते. ''जाता जात नाही , ती जात '' ही जातीबद्दलची व्याख्या त्यातूनच निर्माण झाली आहे. जातीचा उमेदवार,जातीचे मतदार, जातीचा पक्ष, जातीचे नेते असे मतदारांमध्ये विभाजन होते किंवा जाणून बुजून केले जाते. यामुळे घटनाकारांना अपेक्षित असलेल्या लोकशाहीचा लोकच गळा दाबत आहेत असे दुर्देवाने म्हणावे लागते.
 
 
जातीपातीविरहित राष्ट्र अशी अपेक्षा संत आणि महापुरुषांना होती पण आज साधू - संत आणि महापुरुषांनाही जातीपातीमध्ये वाटून घेतले आहे. मते या महापुरुषांच्या नावावर मागितली जातात आणि त्यांची शिकवण मात्र विसरली जाते. जातीचा वापर समाजासाठी नाही तर केवळ स्वत:चे इप्सित साध्य करण्यासाठी केला जातो हे अर्धसत्य आहे. लोकशाही या जातीयवाद्यांच्या हट्टांमुळे सामान्यांपर्यंत पोहचण्याऐवजी जातीयवाद्यांच्या भोवती लाचारासारखी फिरत आहे.
 
इतिहास साक्षी आहे की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून केवळ लाटा तयार झाल्या नंतर निवडणुकांमध्ये जातीचा प्रभाव कमी पडला आहे. अन्यथा, सर्वच निवडणुकींवर जातीचा प्रभाव असतो. देवाने आपल्याला जन्माला घालतांना कुटुंब किंवा जात, धर्म असे पर्याय दिलेले नव्हते. आपल्या मृत्यूनंतर आपले काय होते हे कुणालाही ठावूक नसते तरीही आपण जातींच्या विखारी पाशात अडकून असतो. सुदैवाने, आजची बहुतांश तरुण पिढी जातीपातीच्या पलिकडे विचार आणि आचार करतांना दिसतात हे लोकशाहीसाठी सकारात्मक चिन्ह आहे असेच म्हणावे लागेल.
क्रमश :
 
 
@@AUTHORINFO_V1@@