पहिले महायुद्ध आणि महासंघर्षाची तयारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2018
Total Views |
 
 
कलकत्त्यातील नॅशनल मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरकीची पदवी आणि क्रांतिकारक संघटना अनुशीलन समितीत राहून क्रांतीचे योग्य प्रशिक्षण घेऊन डॉक्टर हेडगेवार नागपुरात परतले. त्यांना सर्वत्र नोकरीच्या ऑफर्स व विवाहासाठीचे अनेक प्रस्ताव येऊ लागले होते. पण डॉक्टर साहेबांनी आपल्या कुटुंबीयांना व मित्रांनाही स्पष्टपणे सांगून टाकले होते की, ‘मी अविवाहित राहून देशकार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे’. त्यानंतर विवाह व नोकरीचे प्रस्ताव येणे बंद झाले आणि डॉक्टर साहेब आपल्या निर्धारित अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मोकळे झाले. हे वैयक्तिक स्वातंत्र्य त्यांच्यापुरते न राहता त्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षाच्या मार्गावर नेणारे ठरले.
 
 
कलकत्त्यातील अनुशीलन समितीच्या काही सहकार्‍यांशी विस्तृत चर्चा करूनच डॉक्टर हेडगेवारांनी स्वातंत्र्य लढ्यापेक्षाही भयंकर महासंघर्षाच्या योजनेवर विचार केला होता. ज्या कारणांमुळे पहिले स्वातंत्र्यसमर राजकीयदृष्ट्या अपयशी ठरले, त्याची पुनरावृत्ती न होण्यावरही या चर्चेत भर देण्यात आला होता. नागपुरात पोहोचल्यानंतर काही दिवसातच या योजनेला कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने शस्त्रे आणि मनुष्यबळ गोळा करण्यात ते मग्न झाले होते. डॉक्टर साहेबांच्या क्रांतिकारक मंडळींनी सैन्यात युवकांची मोठ्या प्रमाणावर भरती करवून लष्करी प्रशिक्षण प्राप्त करीत इंग्रजांविरोधात विद्रोह करण्याचाही विचार केला होता.
याच काळात पहिल्या महायुद्धाचे ढग पसरू लागले होते. इंग्रजांपुढे आपले जगभरातील साम्राज्य वाचविण्याचा पेंचप्रसंग उभा ठाकला होता. भारतातही इंग्रजांची स्थिती दयनीय झाली. देशाच्या कानाकोपर्‍यांत पसरणारी सशस्त्र क्रांतीची ठिणगी, कॉंग्रेसअंतर्गत जहाल गटाच्या राष्ट्रवादी नेत्यांकडून केली जाणारी स्वदेशीची चळवळ आणि सर्व भारतीयांच्या मनातील विदेशी सत्तेला उखडून फेकण्याची वाढू लागलेली भावना यासह अनेक कारणांमुळे इंग्रज सत्ताधारी भयभीत होऊ लागले होते. याप्रसंगी त्यांना भारतीयांच्या मदतीची गरज निर्माण झाली. स्वाभाविकरीत्या सशस्त्र क्रांतिकारकांकडून त्यांना कुठलीही मदतीची अपेक्षा करता येत नव्हती. व्यापारी बुद्धी असलेल्या इंग्रजांना या सत्याची पूर्ण जाणीव होती, त्यामुळेच त्यांनी ऍलन ह्युमद्वारा गठित केलेल्या कॉंग्रसकडून मदतीची अपेक्षा केली होती. इंग्रज सत्ताधार्‍यांनी महायुद्धात ते विजयी झाल्यास भारताला वसाहतीचे भ्रामक स्वराज्य (डोमिनियन स्टेट) देण्याची चाल खेळली, ती यशस्वी ठरली व कॉंग्रेसचे दोन्ही गट या जाळ्यात अडकून इंग्रजांना मदत करू लागले.
 
 
डॉक्टर हेडगेवार यांच्या मतानुसार ब्रिटिश साम्राज्यावर पसरलेले हे संकट म्हणजे भारताला स्वतंत्र करण्याची सुवर्णसंधी होय. ही संधी गमविणे म्हणजे आणखी एक ऐतिहासिक चूक ठरणार असून आपण गेल्या १२ शतकांपासून अशा वारंवार केलेल्या चुकांमध्ये तिची भर पडणार आहे. डॉक्टर साहेबांच्या विचारानुसार त्या वेळच्या ब्रिटनच्या कमजोर सैन्यशक्तीचा फायदा उठवून देशव्यापी सशस्त्र क्रांतीचा संघटित प्रयत्न करावयास पाहिजे. डॉक्टर हेडगेवारांनी अनेक दिवसांपर्यंत कॉंग्रेसच्या दोन्ही गटांशी चर्चा करून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी इंग्रजांना मदत केल्यास आपल्या पदरात काही ना काही पडणार असल्याचे भूत, या नेत्यांच्या मनावर स्वार झाले होते. पण जेव्हा इंग्रजांनी महायुद्धातील आपल्या विजयानंतर भारतीयांना काहीही देण्याचे टाळीत आपली साम्राज्यशाहीची पकड अधिकच मजबूत केली. एवढेच नव्हे तर अनेकदा दडपशाहीही केली.
 
 
डॉक्टर हेडगेवार कॉंग्रेसचा उदारमतवादी व राष्ट्रवादी नेत्यांच्या या वागणुकीमुळे नाराज तर झाले पण निराश मात्र झाले नाहीत. ते देशव्यापी सशस्त्र उठाव करण्याचा निर्णय घेत त्याच्या तयारीलाही लागले. क्रांतिकारक डॉक्टर हेडगेवार यांच्याद्वारा सुरू करण्यात येणार्‍या भावी उठावात त्यांचे लहानपणीचे एक मित्र भाऊजी कांवरे यांनी खांद्याला खांदा मिळवीत त्यांना साथ दिली व दुसरीकडे रासबिहारी बोस हेदेखील या महासंघर्षाच्या यशस्वितेसाठी कामास लागले. डॉक्टर साहेब व त्यांचे सहकारी १९१६ च्या प्रारंभी सशस्त्र क्रांती यशस्वी करण्याच्या हेतूने सर्व प्रकारची सामग्री जमविण्यासाठी मध्य प्रदेश व इतर प्रांताचा प्रवास करू लागले. डॉक्टरजींचे मध्य प्रांत, बंगाल आणि पंजाबच्या क्रांतिकारक नेत्यांशी आधीच घनिष्ठ संबंध होते. असंख्य युवकांना सशस्त्र क्रांतीसाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. अशाप्रकारे व्यायामशाळा व वाचनालयांची स्थापना करून युवकांना सशस्त्र क्रांतीचे प्रशिक्षण देण्यात येऊ लागले. अशा प्रकारच्या प्रयत्नांमागे प्रशासन व पोलिसांना ‘कात्रजचा घाट’ दाखविण्यात येत होता. या केंद्रात युवकांना साहस, त्याग व क्षमता या आधारावर प्रवेश दिला जात होता. युवक क्रांतिकारकांना १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या शौर्यकथा, शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र तसेच अनुशीलन समितीच्या क्रांतिकारकांच्या साहसी कार्यांची माहिती दिली जात होती.
 
 
प्रखर राष्ट्रवादाचे बाळकडू पाजल्यानंतर डॉक्टर साहेबांनी अगदी थोड्या वेळात सुमारे दोनशे क्रांतिकारकांना आपल्याबरोबर जोडले. या युवकांकडे बाहेरच्या राज्यातील क्रांतिकारक संघटना स्थापन करण्याचे काम सोपविण्यात आले. डॉक्टर हेडगेवारांनी वर्धा येथील आपले जुने सहकारी गंगा प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५ युवकांना उत्तर भारतातील सशस्त्र क्रांतीच्या कार्यवाहीचे संचालन करण्यासाठी पाठविले. यासाठीचे आवश्यक धन डॉक्टर साहेबांनी नागपुरातच गोळा केले होते. नागपुरात राहणारे डॉक्टर साहेबांचे अनेक मित्र विद्वान व पुस्तकप्रेमी होते. त्यांच्या घरातील पुस्तकांच्या कपाटांमध्ये व पेट्यांमध्ये आता पिस्तुले, बॉम्ब व दारूगोळा ठेवण्यात येऊ लागला. नागपूरजवळ कामटी येथील लष्करी छावणीतून शस्त्रे मिळविण्याचीही व्यवस्था करण्यात आली.
 
 
ब्रिटिश साम्राज्यवादाप्रती डॉक्टर हेडगेवार यांचा दृष्टिकोन व इंग्रज शासकांना कोणत्याही पद्धतीने गुडघे टेकवण्यास बाध्य करण्याचा त्यांच्या खोल विचारांचा परिचय होतो. डॉक्टर हेडगेवार हे आयुष्यभर इंग्रजांशी निष्ठा राखणार्‍या नेत्यांच्या तडजोडवादी भूमिकेचा तिरस्कारही करीत होते. डॉक्टर हेडगेवार यांचा हा प्रयत्न म्हणजे इंग्रजी शासनाविरोधातील लढण्यात येणारे दुसरे स्वातंत्र्यसमर होते. १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे बहादूरशाह याच्यासारखे दुर्बल नेतृत्व व इंग्रजांच्या दमन व विभाजनकारी (फोडा आणि झोडा) रणनीतीमुळे राजकीयदृष्ट्या विफल ठरले होते. परंतु, १९१७-१८ चे हे स्वातंत्र्य आंदोलन मात्र महायुद्धात अडकलेल्या इंग्रजांना साथ देण्याच्या कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांमुळे न लढताच अपयशी ठरले होते. कॉंग्रेसच्या या व्यवहारशून्यतेमुळे भारतातील इंग्रजांचे उखडणारे साम्राज्य पुन्हा मजबूत झाले व त्याला हादरविण्यासाठी आणखी ३० वर्षे लागली.
 
 
सशस्त्र क्रांतीद्वारा विदेशी राजवटीविरोधात १९५७ प्रमाणे महाउठाव करण्याचा विचार अपूर्णच राहिला व त्यासाठी केलेली तयारी वाया गेली. तरीही डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनध्येयाच्या मार्गात कुठलीही अडचण आली नाही. ज्या विश्वास, साहस आणि द्रष्टेपणाने त्यांनी शस्त्रे आणि युवकांना एकत्र करून युद्धाची तयारी केली होती, त्याच दूरदृष्टीने डॉक्टरांनी सर्वकाही आटोपते घेऊन आपल्याशी जोडलेल्या देशभक्ती क्रांतिकारकांना इंग्रजांच्या वक्रदृष्टीतून वाचविले.
 
 
याचे कारण म्हणजे जर यावेळी महासंघर्षाच्या भूमिगत सज्जतेची ब्रिटिशांना गंध वार्ताही लागली असती तर १८५७ प्रमाणे निर्दोष लोकांवर त्यांनी भीषण अत्याचार करण्यास कमी केले नसते. म्हणून त्यांच्यातर्फे देशाच्या विभिन्न केंद्रातून डॉक्टरांनी प्रशिक्षित केलेल्या युवकांना परत बोलावण्यात आले. अशाच तर्‍हेने डॉक्टरांनी सर्व शस्त्रांचीही विल्हेवाट लावीत, सर्व प्रकारचे साक्षीपुरावे संपवून टाकले. हे यशस्वीरीत्या पार पाडण्यात डॉक्टरसाहेबांचे घनिष्ट सहकारी अप्पाजी जोशी, बाबुराव हरकरे, नानाजी पुराणिक व गंगाप्रसाद पांडे यांनी विलक्षणरीत्या गुप्तपणे सहकार्य केले होते.
 
 
सशस्त्र क्रांतीच्या नेत्यांनी डॉक्टर हेडगेवार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली महाउठावासाठी गोळा केलेले साहित्य आणि इंग्रजांच्या हातामध्ये लागू शकणारे दस्तऐवज इतक्या सफाईने दूर ठेवले की, प्रशासकीय अधिकारी आपली डोकी खाजवितच राहिली तरी त्यांच्या हातामध्ये काहीही लागू शकले नाही. या महासंघर्षाची तयारी गुप्त ठेवण्याचा लाभ तर झालाच. परंतु, ब्रिटिशांविरोधात एका अत्यंत गुप्त लढाईच्या तयारीला इतिहासाच्या पानांवर जागाही मिळू न शकल्याचे नुकसानही असे झाले की ते अजूनपर्यंत जाणवत आहे. इतर क्रांतिकारकांनी केलेल्या लढ्याची नोंद जरी इतिहासात झालेली असली, तरी ते अखेरीस विफल ठरले होते.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@