डॉ. हेडगेवार, संघ आणि स्वातंत्र्य संग्राम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2018
Total Views |
 
 
 
एक प्रखर स्वातंत्र्य सेनानी डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या जन्मकाळापासूनच आतापर्यंत नाव, पद, यश, प्रतिष्ठा, आत्मस्तुती आणि प्रचार यापासून कित्येक कोस दूर राहून राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. समाजसेवा, धर्मरक्षण आणि देशभक्तीच्या प्रत्येक कार्यात अग्रेसर राहण्याची भूमिका बजावली आहे. भारतातील ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधातील स्वातंत्र्य लढ्यातही संघाने देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सर्व पक्ष, संस्था यांच्यातर्फे आयोजित आंदोलन व सत्याग्रह एवढेच नव्हे तर सशस्त्र क्रांतीतही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता. संघाने आपल्या संघटनेला नेहमीच पार्श्‍वभागी ठेवले होते. त्यावेळी तेच राष्ट्राच्या हिताचे होते. परंतु याचा अर्थ संघाने स्वातंत्र्यासाठी काहीही केले नाही असा अर्थ लावणे चुकीचे ठरेल. त्या काळात संघ हीच अशी एकमेव संघटना होती की, जिच्या स्थापनकर्त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील सक्रिय भागिदारी आणि हिंदू संघटन कार्य अशा दोन्ही आघाड्यांवर यश मिळविले होते.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रसिद्धिपराङमुखता व नि:स्वार्थ कार्यपद्धतीला संघाची दुर्बलता मानून कथित स्वार्थी तत्वांनी स्वातंत्र्य संग्रामातील संघाच्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रश्नचिन्ह लावले होते. या संघविरोधी विशेषत: कॉंग्रेसी सत्ताधार्‍यांनी आपल्या राजकीय स्वार्थपूर्तीसाठी संघ स्वयंसेवकांच्या स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग साफ नाकारला होता. प्राचीन अखंड भारताच्या फाळणीस जबाबदार असलेल्या या लोकांनी १८५७ चे स्वातंत्र्य समर, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे शेतकरी आंदोलन, सद्गुरु रामसिंह यांचे कुका आंदोलन, देशव्यापी क्रांतिकारक संघटन अनुशीलन समिती, हिंदुस्तान समाजवादी लोकतांत्रिक सेना, गदर पार्टी, अभिनव भारत, सशस्त्र क्रांतीकारी गट, हिंदू महासभा, आर्य समाज, आझाद हिंद सेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासारख्या अनेक देशप्रेमी संघटनांचे योगदान नाकारत संपूर्ण स्वातंत्र्य लढा हा एका पक्ष आणि व एकाच नेत्याच्या नावावर दर्शविला होता. या लोकांनी इतिहासाची विटंबना करीत ज्यांनी स्वातंत्र्यदेवतेच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण केले त्या स्वातंत्र्य सेनानींचा अपमान केला आणि ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल’ असा डंका वाजवला.
 
उपरोक्त संदर्भात सर्वाधिक अन्याय झाला तो संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्यावरच. स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी पण अज्ञात राहिलेले योद्धे डॉ. हेडगेवार हे जन्मजात स्वातंत्र्य सेनानी होते. बालपणापासून ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या युगपुरुषाने ना आपले आत्मचरित्र लिहिले, ना ते वृत्तपत्रांमध्ये छापून येण्याची इच्छा बाळगली. मात्र आठ ते दहा वर्षाचे असतांना त्यांनी ‘वंदे मातरम्’साठी संघर्ष, नागपूरच्या सीताबर्डी किल्ल्यावर भगवा झेंडा फडकविण्याची योजना व महाराणी व्हिक्टोरियाच्या सिंहासनारोहण व वाढदिवसावर बहिष्कार आदी धाडसी कार्याबरोबरच या स्वातंत्र्य सेनानीचा लढा सुरु झाला होता. कलकत्त्यातील सक्रिय क्रांतिकारी संघटना अनुशीलन समितीत सक्रिय सहभागानंतर १९१५-१७ मधील पहिल्या महायुद्धाच्यावेळी देशव्यापी बंडखोरीची तयारी, महात्मा गांधींच्या असहकार आंदोलन व दांडी यात्रेत सक्रिय सहभाग, कॉंगे्रस नेता या नात्याने इंग्रजांविरोधात जाहीर सभांमध्ये जोरदार भाषणे, कॉंग्रेस अधिवेशनाच्या व्यवस्थेची जबाबदारी आणि स्वयंसेवक दलाची स्थापना, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडणे आदी घटना त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील संघर्षरत जीवनाचा परिचय करुन देणार्‍या आहेत.
 
डॉ. हेडगेवार यांनी दोनदा प्रत्येकी एक वर्षांचा कारावास भोगला. या तुरुंगवासातील अनेक यातनाही त्यांनी सहन केल्या. हजारो स्वयंसेवकांनी तुरुंगातील यातना भोगल्या. संघाच्या स्थापनेनंतरही त्यांनी स्वयंसेवकांना गांधींजींच्या आंदोलनात वाढता सहभाग घेण्याची परवानगी दिली. संघाने हा लढा कॉंग्रेस व महात्मा गांधींच्या नेतृत्वात लढला होता. २६ जानेवारी १९२९ रोजी संघाच्या सर्व शाखांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि डॉ. हेडगेवार हे सैन्यात बंडाळी आणि आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यास अनुकूल होते. १९४२ च्या ‘अंग्रेजो चले जाव’ (भारत छोडो) चळवळीतही संघ स्वयंसेवकांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. (या सर्व प्रसंगांचे तपशीलवार वर्णन पुढे येणारच आहे.)
 
संघावर स्वातंत्र्य लढ्यापासून दूर राहिल्याचा आरोप खुद्द इंग्रजांची ‘जी हुुुजुरी’ करीत हातामध्ये भिकेचा कटोरा घेत इंग्रजांकडे स्वातंत्र्याची भीक मागितलेलेच करीत असतात. यांनी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, त्रैलोक्यनाथ चतुर्वेदी, कर्तार सिंग सराबा, रासबिहारी बोस, श्यामजी कृष्ण वर्मा, लाला हरदयाल, यतींद्रनाथ सांन्याल, रामप्रसाद बिस्मिल आणि चंद्रशेखर आझाद यासारख्या प्रखर देशभक्त स्वातंत्र्य सेनानींना ‘पथभ्रष्ट देशभक्त’ (वाट चुकलेले देशभक्त) म्हणून हिणवण्यासही कमी केले नाही. उल्लेखनीय आहे की, या सर्व स्वातंत्र्य सेनानींना संघाकडून नेहमीच संपूर्ण सहकार्य मिळत होते. स्वयंसेवकांनी अहिंसक सत्याग्रह व सशस्त्र क्रांतीतही सक्रिय भूमिका बजावली होती.
 
ऐतिहासिक सत्य हेच आहे की, १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर संपूर्ण भारतात वेगाने होत असलले हिंदुत्व जनजागरण, सांस्कृतिक राष्ट्रवादाची पुनर्स्थापना, चहूबाजूच्या क्रांतिकारी हालचाली, संघटित होत असलेला भारतीय समाज आणि भारतवासियांची स्वातंत्र्य प्राप्तीची तीव्र आकांक्षा यांना पायदळी तुडवीत त्यांची दिशाभूल करण्यासाठी १८८५ मध्ये एक कट्टरवादी ख्रिश्‍चन इंग्रज ऍलन ह्युमने कॉंग्रेसची स्थापना केली होती. या कॉंग्रेसला स्वातंत्र्य संग्रामाशी काहीही देणेघेणे नव्हते. ही कॉंग्रेस म्हणजे इंग्रजांचे ‘कवच कुंडल’ होती. त्यामुळे इंग्रजांचा हा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी, भारतीयत्त्वाला विदेशी व परधर्मीयांच्या कारस्थानांपासून वाचविण्यासाठी, स्वातंत्र्य आंदोलनाला सनातन राष्ट्रीय आधार मिळवून देण्यासाठी आणि एक देशव्यापी, शक्तिशाली हिंदू संघटन (सर्व भारतीयांचे संघटन) तयार करण्यासाठी डॉ. हेडगेवार यांनी १९२५ मध्ये संघाची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे देशाचे स्वातंत्र्य आणि संरक्षणासाठी देशभक्त सेनानींचे संघटन. (क्रमश:)
 
 
- नरेंद्र सहगल
मो.९८११८०२३२०
 
@@AUTHORINFO_V1@@