केशरचना कारागिरीतील नाशिकचे आद्य प्रवर्तक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



नाशिकमध्ये पारंपरिक सलून व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील भाऊ अर्थात चंद्रकांत केशव आहेर यांनी वेगळी वाट निवडली. स्वकष्टावर प्राविण्य मिळविले आणि गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना या ‘हेअर स्टाईल’ची गोडी लावली.

 

केस... माणसाच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग. केस चांगले, नीटनेटके असतील, तर त्या व्यक्तीची प्रतीमाही तितकीच सकारात्मक. आज ही केशमहती वर्णन करण्याचे कारणही नेमके तसेच आहे. नाशिक हे पौराणिक शहर. त्यातही नाशिकमधील रामकुंड अगदी सुप्रसिद्धच. रामकुंडावर धार्मिक विधी संपन्न होतात. प्रामुख्याने कुटुंबातील एखादी व्यक्ती दिवंगत झाली, तर विधी केले जातात. जेव्हा हे विधी केले जातात, तेव्हा पुरुषांचे संपूर्ण केस काढले जातात. अशा या रामकुंडावर किंवा नाशिककर ज्याला ‘गंगे’वर म्हणतात, तिथे पूर्वीपासून लोक केशकर्तनासाठी जात. त्याचे कारण म्हणजे, शहरातील केशकर्तनाच्या दरापेक्षा कमी दरात तिथे कसे कापून मिळत असे. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी शहरात एक रुपया किंवा सव्वा रुपयात हजामत होत असे. ‘गंगे’वर मात्र पंचाहत्तर पैसे म्हणजे बारा आण्यात हे करून मिळे. थोडे पैसे वाचविण्यासाठी लहान विद्यार्थी आणि अनेक मोठी माणसेदेखील ‘गंगे’वर ‘कटिंग’ करण्यासाठी जात असत. अशा या नाशिक शहरात पारंपरिक सलून व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील भाऊ अर्थात चंद्रकांत केशव आहेर यांनी मात्र वेगळी वाट निवडली. त्यात स्वकष्टावर प्राविण्य मिळविले आणि गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना या ‘हेअर स्टाईल’ची गोडी लावली. प्रामाणिकपणे काम केले, तर यश मिळते अशी त्यांची श्रद्धा...

 

वय वर्षं ६१ असलेले भाऊ अजूनही तितकेच ताजेतवाने वाटतात. त्यांच्याकडे बघून त्यांच्या वयाची अजिबात जाणीव होत नाही. कारण, ते नेहमी कामात व्यस्त असतात. सलून हा त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय. सुमारे ४५ वर्षांपूर्वी ते १५- १६ वर्षांचे असताना रविवार पेठेतील मध्यवर्ती ठिकाणी त्यांचे सलूनचे दुकान होते. वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या चंद्रकांत यांनी एस.वाय.पर्यंत शिक्षण घेतले आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले. तरुणांच्या मागणीनुसार ते त्यांचे केशकर्तन करु लागले. व्यवसाय वाढल्याने रविवार पेठेतील गायधनी गल्लीतील मयूर चेंबर्समध्ये त्यांनी मोठा गाळा घेतला. नव्या युवकांची अपेक्षा आपण पूर्ण केली पाहिजे, या ध्येयाने त्यांनी आधुनिक ‘भाऊज हेअर सलून’ सुरू केले. ते व त्यांचे तिघे भाऊ तिथे कार्यरत होते. त्यातील एकाचे निधन झाले आहे. मात्र, आजही त्यांच्या कुटुंबातील तीन मुले शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सलून चालवीत आहेत. विशेष म्हणजे, आधुनिक केशरचनाकार जावेद हबीब यांच्याकडून या मुलांनी केशकर्तनाचे, स्टाईलिंगचे रीतसर शिक्षण घेतले आहे. स्वत: भाऊंनी आपले केशकर्तनाचे शिक्षण पारंपरिकरित्या घेतले आणि काही भाग त्यांच्या अमेरिकेतील बहिणीकडून व्हिडिओच्या माध्यमातून शिकून घेतले. पूर्ण केस भादरणे, मिशीकट अशी पूर्वीची कामे होती. आता त्यात फेशियल, केस कुरळे करणे अशी अनेक कामे करणारे पाच-सहा केशरचनाकार या ठिकाणी तत्पर असतात. नाशिकमध्ये आधुनिक सलून सुरू करण्याचा पहिला मान भाऊंनाच मिळतो. त्यानंतर अनेक दुकाने झाली. याविषयी प्रशिक्षणदेखील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सुरू केले होते. मात्र, पहिलेपणाचे श्रेय भाऊंनाचं दिले जाते.

 

नाशिकची रविवार पेठ, सराफ बाजार येथील अनेक नामांकित व्यापारी ‘भाऊ सलून’मध्येच येतात. इतकेच काय तर राजकीय पुढारी आणि मंत्र्यांचीही पहिली पसंती ही भाऊंच्याच सलूनला. नाशिक शहरातूनच नव्हे तर मनमाड, मालेगाव, धुळे अशा जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहूनदेखील केवळ भाऊंच्या प्रेमापोटी लोकं येथे येत असतात. लेडीज हेअर कटिंगचे कार्यदेखील त्यांनी केलेले आहे. नाशिकमध्येच नव्हे, तर सर्वत्र सुरुवातीला केवळ महिलांना सेवा देणाऱ्या ब्युटी पार्लर्सचं प्रमाण वाढत गेलं. हल्ली मात्र काही ब्युटी पार्लर्समध्ये स्त्री आणि पुरुषांसाठी अनेकविधं सौंदर्यविषयक सेवासुविधा उपलब्ध असतात. अर्थात, यामध्ये काही ब्युटी पार्लर्स ही केवळ स्त्रियांसाठीच असतात, तर काही केवळ पुरुषांसाठी. अलीकडच्या दिवसांमध्ये तर या ब्युटी पार्लर्सची जागा स्पाने घेतली आहे. ब्युटी पार्लर कोणतंही असलं, तरीही त्याचं अंतरंग हे सुंदरच असलं पाहिजे. ते सुसज्ज असलं पाहिजे. अशा ठिकाणी सर्व नवनवीन अत्याधुनिक सोयीसुविधा असणं ग्राहकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने जरुरीचं झालं आहे. अर्थातच, या सर्व सेवा देण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि त्यानुसार ब्युटी पार्लर्सचं अंतर्गत संरचनेचं काम करावं लागतं. यामध्ये वॉशिंगच्या जागेला तसेच हेअर वॉशला अधिक महत्त्व द्यावं लागतं. याचबरोबर वापरल्या जाणाऱ्या टॉवेल, नॅपकीन तसेच अ‍ॅप्रन्स ठेवण्यासाठी अथवा वाळवण्यासाठी योग्य सोय करावी लागते. याचा विचार चंद्रकांत आहेर यांनी करून आपलं सलून आधुनिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे.

 

नाशिकमध्ये अनेक चित्रपटांचे शुटींग झाले. तेव्हा प्रख्यात सिनेनटांचे केशकर्तन भाऊंनी केले आहे. गुलशन ग्रोवर, राजीव कपूर आदींचा त्यात समावेश आहे. आज केशकर्तनाचे दर खूप वाढले आहेत. मात्र, भाऊंनी आपले दर फारसे वाढविले नाहीत. आपल्या दुकानात लहानथोर सर्वच येत असतात, त्यांच्याकडून जास्त पैसे उकळणे योग्य नाही, अशी त्यांची भावना आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असले तरी जास्त दर ते घेत नाहीत, याचे कारण ग्राहकाचे प्रेम महत्त्वाचे आहे. प्रेमाने ते देतील ते आपण घेतो, असे ते सांगतात.

@@AUTHORINFO_V1@@