डॉक्टरकीचे शिक्षण आणि क्रांतीचे प्रशिक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2018
Total Views |
 
 
भारताला ब्रिटिश गुलामगिरीच्या शृखंलेतून मुक्त करण्यासाठी संपूर्ण भारतात एक संघटित सशस्त्र क्रांतीचा आधार तयार करण्याच्या उद्देशाने केशवराव हेडगेवार यांना तत्कालीन राष्ट्रीय नेते विशेषत: लोकमान्य टिळकांनी कलकत्ता येथे पाठविले होते. टिळकांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादी विचारधारेने प्रभावित झालेले केशवराव नागपुरात सक्रिय राहून बंगालच्या अनुशीलन समिती या क्रांतिकारक गटाशीही संबंधित राहिले होते. केशवरावांनी बंगालच्या अनेक क्रांतिकारकांना नागपुरात गुप्तपणे राहण्याचे व क्रांतिकारी हालचाली करण्याच्या दृष्टीने सहकार्य केले. कलकत्ता जाऊन तेथे राहण्यामागे महाराष्ट्रातील क्रांतिकारक चळवळीला बंगालच्या सर्वात मोठ्या क्रांतिकारक संघटनेशी जोडणे, हा प्रमुख उद्देशही त्यामागे होता.
 
 
१९१० मध्ये केशवरावांनी कलकत्त्यासाठी प्रस्थान केले. त्यांच्यापाशी डॉ. मुंजे यांनी दिलेल्या ओळखपत्राशिवाय दुसरे काहीही नव्हते. डॉ. मुंजे यांचा प्रभाव, परिचय व प्रखर व्यक्तिमत्त्व यामुळे केशवरावांना कलकत्त्याच्या नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. या कॉलेजातील प्राध्यापक व व्यवस्थापकही राष्ट्रीय विचारांनी ओतप्रोत भरलेले होते. अनेक जण लोकमान्य टिळक व बिपिनचंद्र पाल यांच्याद्वारे संचलित केल्या जाणार्‍या स्वदेशी व स्वराज्याच्या आंदोलनात गुप्त रूपाने सहभाग घेत होते. केशवरावांचा कलकत्त्यात येण्याचा हेतूच मुळी सशस्त्र क्रांतीचे प्रशिक्षण घेणे व संपूर्ण देशभरात इंग्रजांविरोधात १८५७ सारखी महाक्रांती घडवून आणणे हा होता. डॉक्टरकीच्या आपल्या शिक्षणाबरोबरच केशवराव हेडगेवारांनी युवकांच्या हातामध्ये क्रांतीची मशाल सोपविण्याच्या आपल्या उद्दिष्टाकडे क्षणभरही दुर्लक्ष केले नव्हते.
 
केशवराव हेगडेवार यांचे एक खास स्वभाव वैशिष्ट्यही होते ते हे की, सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मित्र बनवून त्याला अनुशीलन समितीच्या कार्यात जुंपणे. नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये देशाच्या प्रत्येक राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत होता. केशवरावांनी त्या सर्वांच्या माध्यमातून लवकरच देशभरात भविष्यात मोठ्या लढ्यासाठी युवकांना तयार करण्याच्या दृष्टीने तत्परता दर्शवित त्यात यशही प्राप्त केले. त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे वडील डॉक्टर आशुतोष मुखर्जी, मोतीलाल घोष, बिपिनचंद्र पाल तसेच रासबिहारी बोस यासारख्या राष्ट्रभक्त, हिंदुत्वनिष्ठ नेत्यांशी घनिष्ट संबंध प्रस्थापित केले होते.
 
आपला झुंझार स्वभाव, निरंतर परिश्रम व लोकसंग्रही वृत्ती यामुळे केशवराव हे इतर प्रांतातील क्रांतिकारक हालचालींची मुख्य साखळी बनले होते. बंगालच्या अनेक ठिकाणी शस्त्रांचे गुप्त कारखाने यशस्वीरीत्या चालविले जात होते. तेथूनच देशातील क्रांतिकारकांना शस्त्रे पुरविली जात होती. केशवराव हेडगेवार यांनी हे कार्य अतिशय सतर्कतेसह पार पाडले. विशेषत: मध्य प्रांतामध्ये क्रांतिकारकांपर्यंत शस्त्रे पोहोचणे, हे केशवरावांच्या मेहनतीचे फळही होते. मध्य प्रातांच्या तत्कालीन सरकारी कागदपत्रांमध्येही यास पुष्टी देण्यात आली आहे की, हेडगेवारांनी नागपूर व बंगालच्या क्रांतिकारकांदरम्यान ताळमेळ राखण्यात मोठे यश मिळविले होते. अनुशीलन समितीद्वारा संचलित क्रांतिकारक कार्यवाहीस यशस्वीरीत्या आयाम देण्यासह केशवराव अन्य संस्थांद्वारे संचलित आंदोलने आणि समाजसुधारक कार्यक्रमातही सहभागी राहिले होते. परिणामस्वरूप क्रांतिकारक देशभक्तांची एक मोठी साखळीच तयार झाली.
 
सरकारी गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी केशवराव हेडगेवार यांचे एक यशस्वी क्रांतिकारक असे वर्णन करीत त्यांच्याविरोधात लांबलचक अहवालही सरकारकडे पाठविले. परंतु या अतिसतर्क युवक देशभक्ताच्या कार्यवाहीचा ठोस पुरावा गोळा करण्यात गुप्तचर विभागाला कधीही यश आले नव्हते. कार्यवाही झाल्यानंतरच तिची खबर मिळत होती. लाखो वेळा डोके चालवूनही क्रांतिकारी हालचालींचे ठिकाण, नेता, कार्यपद्धती आणि साथीदार यांची कुुठलीही माहिती त्यांच्या हाती लागत नव्हती. अनेक गुणांनी संपन्न असलेले केशवराव हेडगेवार कलकत्त्यात राहून आपल्या डॉक्टरकीचा अभ्यास, वर्गातील प्राध्यापकांनी शिकविलेला धडा किंवा प्रयोगशाळेत केलेले प्रयोग यांच्या जोरावर प्रत्येक वर्षी प्रथम श्रेणीत ते उत्तीर्ण होत गेले. वर्गाच्या बाहेर आल्यानंतर मात्र ते आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी झटत राहिले. अनुशीलन समितीचे एक प्रमुख सदस्य म्हणून जे काम दिले, ते त्यांनी आपली सर्व शक्ती एकवटून पूर्ण केले. त्यात शस्त्रे तयार करणे, त्यांचे वितरण करणे, कृती योजना व तिची अंमलबजावणी, क्रांतिकारकांना गुप्त ठिकाणी ठेवणे व त्याबरोबरच गुप्तचर विभागाच्या नजरेपासून दडून राहणे आदी जोखीम असलेल्या गोष्टींचा यात समावेश होता. याच काळात गुप्तचर विभागाने एका युवकाला केशवरावांच्या हालचालींची माहिती मिळविण्यासाठी नियुक्त केले. त्याला केशवराव व त्यांच्या सहकार्‍यांबरोबर राहण्याची व्यवस्थाही केली. पण केशवराव यांनी आपल्या तीक्ष्ण दृष्टीने या गुप्तचराच्या कारवायांचा सुगावा घेतला व एकेदिवशी त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या पेटीतील सर्व गुप्त कागदपत्रे काढून त्याची ‘पोलखोल’ केली, तसेच आपल्या सहकार्‍यांना सावधही केले. अशा तर्‍हेने केशवरावांनी या गुप्तचराचीच टेहळणी सुरू केली.
 
आपले शिक्षण व अनुशीलन समितीच्या कामांसोबत समाजसेवेच्या इतर कार्यातही ते सक्रिय सहभाग घेत होते. १९१३ मध्ये दामोदर नदीला आलेल्या भीषण पुराने हाहा:कार माजविला होता. अनेक घरांचे पुरामुळे नुकसान झाले. लोकांचा धंदा-रोजगार बुडाला. अनेक सामाजिक संस्था लोकांना पुरातून वाचविणे व सुखरूप ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य करीत होत्या. रामकृष्ण मिशनच्या तरुण संन्याशी व भक्तांनी सेवा कार्यात मदतीचा हात देण्यास सुरुवात केली. या युवकांनी जेथे जाण्याची कुणी हिंमतही करणार नाही, अशा ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून लोकांना सुरक्षित बाहेर काढले. केशवरावांच्या गटाचे सदस्य पाणी आणि चिखलातून मैल न मैल दूरवरच्या गावांपर्यंत चालत जाऊन खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे काम करीत होते. एका शहरात रोगाची साथ पसरल्यानंतर केशवरावांच्या गटाने रोग्यांसाठी परिश्रमपूर्वक सेवेसारखे पवित्र कार्यही केले.
 
केशवराव हेडगेवारांनी कलकत्त्यात राहून तेथील सक्रिय अशा सर्वात मोठ्या क्रांतिकारक अनुशीलन समिती या संघटनेच्या कार्यपद्धतीची आणि उद्देशाची अगदी जवळून माहिती घेतली. विभिन्न समित्या, उपसमित्यांच्या माध्यमातून कामाची वाटणी व कामे गुप्तपणे यशस्वी करण्याचे अनुभव केशवराव हेडगेवारांसाठी भावी जीवनाच्या आधारशीलेसारखे ठरले. अनुशीलन समितीत राहून क्रांतिकारक चळवळीत सहभागी झाल्याने केशवरावांचा देशाच्या अनेक प्रांतातील युवकांशी संबंध आला. केशवरावांची दृष्टी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सशस्त्र आंदोलनांवर खिळलेली होती.
 
कलकत्त्यात पाच वर्षे राहिल्यानंतर डॉक्टर हेडगेवारांना अनुशीलन समितीच्या माध्यमातून देशाच्या धगधगत्या वातावरणाचा अंदाज घेता आला. राष्ट्राला समर्पित क्रांतिकारी जीवनाचे संपूर्ण प्रशिक्षण, भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प, संघटित राष्ट्रप्रेमी शक्तीच्या आवश्यकतेचा आभास, समाजसेवेचे अमिट संस्कार, अटळ इच्छाशक्ती आणि डॉक्टरकीची पदवी घेत डॉ. केशवराव हेडगेवार १९१५ मध्ये नागपुरात परतले.
 
वस्तुत: हे सत्य आहे की, डॉक्टरकीची पदवी वगळता बाकी सारे संस्कार बीजरूपाने त्यांच्या अंतर्मनात लहानपणापासून रुजलेले होते. तरीही अखंड भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या एकमात्र अंतिम लक्ष्यावर आधारित आपल्या उर्वरित जीवनाची दिशा निर्धारित करण्यासाठी कलकत्त्यातील अनुभव त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरला. त्यामुळे नागपुरात परतल्यानंतर त्यांना एक दिवसही स्वस्थ झोप लागली नव्हती. देशाला इंग्रजांच्या गुलामीतून सोडविण्यासाठी होणार्‍या तत्कालीन प्रयत्नांचे सर्व मार्ग त्यांच्यासाठी खुले होते. डॉक्टर साहेब अशा कोणत्या तरी सुदृढ मार्गाच्या शोधात होते की, जो सरळसरळ ब्रिटिश साम्राज्याच्या नरडीपर्यंत पोहोचू शकेल.
 
 
 
- नरेंद्र सहगल
मो.९८११८०२३२०
 
@@AUTHORINFO_V1@@