शासकीय कार्यालयात आज शुकशुकाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |


 

अंबरनाथ : महाराष्ट्रात राज्य शासनाच्या विविध विभागाच्या कर्मचाऱ्या नी आपल्या मागण्यांसाठी तीन दिवसांचा राज्यव्यापी संप जाहीर केला आहे. या संपात वाडा तालुक्यातील प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समितीच्या सर्व विभागातील कर्मचारी असे एकूण १७१ कर्मचारी सहभागी झाले आहेत. मात्र संपामध्ये वरिष्ठ अधिकारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झालेले नसल्याने कार्यालयाचे दरवाजे उघडे, पण खुर्च्या रिकाम्या अशी अवस्था दिसून येत आहे. तर, मुरबाड तालुक्यातील शिक्षकवर्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरबाड तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी असे सर्व कर्मचारी या संपात सहभागी झाले. अंबरनाथमध्येही महसुली कर्मचाऱ्याच्या संपामुळे तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. तहसीलदार कार्यालयाप्रमाणे शिधावाटप कार्यालयातही संपाचा परिणाम जाणवत आहे. रोज गर्दीने भरून जाणारे कार्यालय मंगळवारी संपामुळे ओस पडले होते. मात्र, कल्याण-डोंबिवलीत संपाचे काही पडसाद उमटले नसून, कर्मचाऱ्या नी नेहमी प्रमाणे आपली कामे पार पाडली.
 

शासनाने सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तात्काळ करावी, तसेच जानेवारी २०१७ पासूनची महागाई भत्ता १४ महिन्यांची थकबाकी आणि जानेवारी २०१८ पासूनचा वाढीव महागाई भत्ता खर्चाच्या रकमेसह त्वरित मंजूर करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२ ची परिभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करावी, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरावी, सर्व इच्छुक अर्जदारांना एक विशेष बाब म्हणून अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या तात्काळ देण्यात याव्यात, आधुनिक आरोग्य केंद्रातील महिला परिचारिकांना किमान वेतन देण्यात यावे, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्या ना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करावा, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे १०० टक्के आयोजन करावे, निवृत्तीचे वय साठ वर्षे करावे व पाच दिवसांचा आठवडा जाहीर करावा इत्यादी प्रलंबित मागण्यांसाठी तालुक्यातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.  या संपामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याने तालुक्यातील आदिवासी भागांमधून येणार्‍या सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर या नागरिकांचे काम न झाल्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

@@AUTHORINFO_V1@@