नक्षलवादाचे कंबरडे मोडले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |
 

 
 
 
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत विशेषकरून मोदी सरकारच्या कार्यकाळात अतिरेकी डाव्या विचारसरणीच्या चळवळीत लक्षणीय घट झाली आहे. नक्षलवाद्यांकडून वेळोवेळी होणारी हिंसा व त्यांचा भौगोलिक विस्तार दोन्हीमध्ये चांगलीच घट झाली असून गेल्या ८ वर्षांत नक्षलवादी कारवायांमध्ये तब्बल ६० टक्के घट झाल्याची माहिती केंद्र सरकारने आज लोकसभेत दिली. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
 
 
नक्षलवादी हिंसक कारवायांमध्ये झालेली घट लक्षणीय असून २००९ मध्ये सर्वाधिक २ हजार २५८ हिंसक घटना घडल्या होत्या मात्र २०१७ मध्ये मात्र ९०८ हिंसक घटना घडल्या असून हा आकडा दिवसेंदिवस कमी कमी होत आहे अशी माहिती सरकारने दिली. तसेच नक्षलवाद्यांची भौगिलक व्याप्ती देखील कमी झाली असल्याचे अहिर यांनी सांगितले. एकंदर ११ राज्यांतील ९० जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरु आहेत. गेल्या काही काळात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओईस्ट) या नक्षलवादी संघटनेकडून केरळ-कर्नाटक-तामिळनाडूचा त्रिकोण व मध्यप्रदेश-महाराष्ट्र-छत्तीसगड या तीन राज्यांचा त्रिकोण या ठिकाणी आपले काम वाढवण्याचा प्रयत्न झाला मात्र तो फार यशस्वी ठरला नाही. यापैकी पहिल्या त्रिकोणातील वायनाड, पलक्कड आणमि मलप्पुरम् जिल्ह्यांत तर बालाघाट, मंडला, गोंदिया आणि राजनंदगाव या दुसऱ्या त्रिकोणातील जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी कारवाया जास्त प्रमाणात होत होत्या असे त्यांनी संसदेत सांगितले.
 
 
नक्षलवादाविरोधात केंद्र सरकारची भूमिका ही राज्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याची राहिलेली आहे. स्थानिक राज्य सरकारने नक्षलवादाविरोधात उचललेल्या प्रत्येक पावलाला केंद्र सरकारची योग्य ती साथ मिळत असते. राज्य आणि केंद्र सरकारचे या संदर्भात एक एकत्रित राष्ट्रीय धोरण व कृती आराखडा असून विविध पातळ्यांवर त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे व उपाययोजना करणे, तसेच नक्षलग्रस्त भागात विकासाला चालना देणे व स्थानिक वनवासी जमातींच्या हक्कांचे संरक्षण करणे अशा तीन पातळ्यांवर प्रामुख्याने हे काम चालते असे सरकारने सांगितले. नक्षलग्रस्त भागात रस्त्यांचा विकास करणे, मोबाईल टॉवर उभारणे, तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, बँक व पोस्ट ऑफिसेसचे जाळे उभे करणे, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उत्पन्न करून देणे अशा प्रकारे विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक नागरिकांचा सरकारवरचा विश्वास अधिक वाढला असून माओवादापासून ते दूर जात आहेत असे हंसराज अहिर यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@