देश पिंजणारे पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |

 
स्वतःच्या स्वार्थासाठी जो जवळ येईल, त्यालाच उद्ध्वस्त करण्याचा, त्याचाच विश्वासघात करण्याचा अवगुण अंगात असल्याने संधी असूनही पवारांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीने नेहमीच वाकुल्या दाखवल्या. शिवाय शरद पवारांनी वेळोवेळी मारलेल्या कोलांटउड्यांतून आपली ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’ची प्रतिमा अधिकच उजळवली, सोबतच कित्येकांचा विश्वासघातही केला.
 
वाईट बोलू नका, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, अशी शिकवण देणार्‍या गांधीजींच्या तीन माकडांची गोष्ट नेहमीच सांगितली जाते. या तीन माकडांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सर्वच प्रकारच्या मर्कटलीला सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी असत. आता मात्र राष्ट्रीय राजकारणात नेमके याच्या उलट कर्तृत्व दाखविलेल्या आणि सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजाती मोदींच्या पराभवासाठी काहीतरी अचाट मर्कटलीला करणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेतून पायउतार करण्यासाठी पुरोगामित्व पाण्यात बुडवून बसलेल्या शरद पवारांनी याकामी पुढाकार घेत आपल्यासोबत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख (संपुआ) सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा असतील, अशी घोषणा केली. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, “२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा न बाळगणार्‍या संपुआप्रमुख सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि मी एकत्र येण्यास तयार आहोत. देश पिंजून काढून भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी विरोधकांना एकत्र आणून जनतेला आत्मविश्वास देण्याचा आमचा प्रयत्न असेल.” इथे शरद पवारांनी पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही, असे सांगणे म्हणजे मोठा विनोद असल्याचेच कोणाच्याही लक्षात येईल. कारण सत्ता आणि पदप्राप्तीसाठी कुठल्याही थराला जाऊन डाव टाकण्यात पटाईत असलेला कळीचा नारद म्हणूनच शरद पवारांना जग ओळखते. पवारांनी राष्ट्रीय राजकारणात मारलेली उडीदेखील पंतप्रधानपदाला डोळ्यासमोर ठेऊन खेळलेली खेळीच होती. आता तेच पवार पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नसल्याचे मानभावीपणाने सांगतात, याचा नेमका अर्थ लावायचा कसा? तर संपूर्ण महाराष्ट्रातही पुरेशी ओळख (स्वबळावर सत्ताप्राप्तीची) नसलेल्या शरद पवारांना कोणीही तुम्ही पंतप्रधानपद स्वीकाराल का?, असे विचारलेले नाही वा तशी शक्यताही नसल्याचे आपण आधी लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच जे दान मिळणारच नाही, ते नाकारून शरद पवार आपण काहीतरी फार मोठा त्याग करत असल्याचा आव आणत असल्याचे इथे स्पष्ट होते. त्यामुळे जे होणे शक्यच नाही, ते नाकारण्यात कोणता आलाय मोठेपणा? असेच पवारांना विचारावे लागेल.
 
दुसरीकडे शरद पवारांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. आपल्या अर्धशतकीय राजकीय कारकिर्दीत पवारांनी पंतप्रधानपद हस्तगत करण्यासाठी नाना लटपटी-खटपटी केल्या. काँग्रेसचे दोन तुकडे होण्यापासून, यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसण्यापर्यंत आणि १९९९ साली सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा उकरून काढत स्वतःची वेगळी चूल मांडण्यापर्यंत पवारांनी सगळ्या उचापत्या पंतप्रधानपदावर डोळा ठेऊनच केल्या. अर्थात पंतप्रधानपद मिळण्याएवढी पात्रता, योग्यता, कुवत आणि अनुभव शरद पवारांपाशी नक्कीच होता. पण स्वतःच्या स्वार्थासाठी जो जवळ येईल, त्यालाच उद्ध्वस्त करण्याचा, त्याचाच विश्वासघात करण्याचा अवगुण अंगात असल्याने संधी असूनही पवारांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीने नेहमीच वाकुल्या दाखवल्या. पवारांच्या विश्वास आणि विश्वासघाताचा आणखी एक नमुना म्हणजे सोनिया गांधींच्या विदेशीपणावरुन काहूर माजवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण ज्या मुद्द्यावर नव्या पक्षाची स्थापना केली, त्याच मुद्द्याला फाट्यावर मारत सत्तेचा मलिदा ताटात पडणार म्हटल्यावर पवार पुन्हा सोनियांच्याच कळपात डेरेदाखल झाले. शरद पवारांनी आपल्या या कोलांटउडीतून आपली सत्तातुराणां न भयं न न लज्जाची प्रतिमा अधिक उजळवलीच, पण सोबतच कित्येकांचा विश्वासघातही केला. दरम्यानच्या काळात जाती-पातीचे-धर्माचे आकडे जुळवून सत्तेचे गणित सोडवण्याचा उद्योगही शरद पवारांनी करून पाहिला. महाराष्ट्रात तर आपल्या जातीयवादी तमाशाचा बार उडवून देणार्‍या पवारांनी अगदी काल-परवापर्यंत पेशवे, पगडी, ब्राह्मण, इफ्तार, निरागस मुसलमान असे एकापेक्षा एक सरस नाट्य सादर करत एका समाजासमोर दुसर्‍या समाजाला उभे करण्याची थेरं केली, पण जनतेने पवारांच्या सुसंस्कृत, जाणता राजा वगैरे मुखवट्यामागचा खरा चेहरा ओळखल्याने त्यात त्यांना यश काही मिळाले नाही, ना ते कधी पंतप्रधान झाले. मुख्य गोष्ट म्हणजे जे शरद पवार आपल्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही कधी पंतप्रधान झाले नाहीत, ते आज पार रसातळाला गेल्यानंतर तरी पंतप्रधान कसे होतील? म्हणजेच शरद पवारांनी पंतप्रधानपद वगैरे नाकारलेले नसून नरेंद्र मोदी व भाजपसमोर शरणागती पत्करल्याचेच म्हणावेसे वाटते. शिवाय शरद पवारांच्या धडाडीच्या काळात त्यांना साथ देणारे अगदी तालुका स्तरापासून ते जिल्हा, राज्य पातळीवरील कार्यकर्ते आणि नेतेही सोडून जाताना दिसतात. अशा काळात शरद पवारांनी कुठल्याही पदाच्या, सत्तेच्या गमजा मारण्याचे टाळलेलेच बरे.
 
आपल्या मुलाखतीत शरद पवारांनी देश पिंजून काढणार असल्याचीही एक घोषणा केली. खरे म्हणजे शरद पवार देश पिंजून काढणार म्हणजे नेमके काय करणार, हाही एक प्रश्नच आहे. कारण शरद पवार जिथे जातात, बोलतात, वागतात, त्यानंतर तिथले, त्या प्रदेशातले वा राज्यातले सामाजिक वातावरण नेहमीच कलुषित, दूषित होते, हा इतिहास आहे. आताही शरद पवार देश पिंजून काढताना असेच काही करणार आहेत का? म्हणजे जे गावभर केले तेच देशभर करायचे, जाती-पातीत भांडणे लावायची, एका समाजाला दुसर्‍याविरोधात भडकवायचे आणि दुरून गंमत पाहात बसायचे, पुन्हा स्वतःच जातीयवादाविरोधात प्रवचने देत फिरायचे आणि त्यातून स्वतःचा स्वार्थ साधायचा, शरद पवारांचा असाच काहीसा देश पिंजून काढण्यामागचा विचार आहे का? शिवाय पवार देश पिंजून काढणार तो कसा? कारण याआधी गेल्या चार वर्षात ज्या कोणत्याही निवडणुका झाल्या त्या प्रत्येकवेळी शरद पवार, सोनिया गांधी आणि एच. डी. देवेगौडा यांनी भाजप व नरेंद्र मोदींचे नाव घेऊनच तो भाग, प्रदेश वा राज्य पिंजून काढले होते ना? आणि तरीही हाती पराभवच पडला होता ना? अगदी कालपरवाचा जळगाव आणि सांगली महापालिकेचा निकालही हेच दर्शवतो ना! मग शरद पवारांना अशाप्रकारे पराभूत होण्यासाठीच देश पिंजून काढायचा आहे का? तसे असेल तर शरद पवारांनी खुशाल देश पिंजून काढावा, पण त्याआधी देश पिंजून काढणे म्हणजे काय, याचीही माहिती करून घ्यावी, तपास करावा, अभ्यास करावा. यदाकदाचित एखादा चमत्कार झालाच अंगावरून साप वगैरे जाण्यासारखा तर थोड्याफार जागा तरी वाढतील; अन्यथा मतदारराजाने यापूर्वी जसे अपयश ताटात वाढले, तसेच अपयश स्वीकारण्यासाठी घराबाहेर पडावे. दुसरी गोष्ट जनतेच्या मनात आत्मविश्वास जागवण्याची. शरद पवारांनी त्याची चिंता सोडावी. कारण ज्या दिवशी देशातून, राज्यातून तुमची सत्ता गेली, त्याच दिवशी जनतेच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटली. इतक्या दिवस जनतेला लुटून खाणार्‍यांना आपण घरी बसवू शकतो, हा आत्मविश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. तोच आत्मविश्वास आज चार वर्षांनंतरही जसाच्या तसाच आहे आणि तीच आत्मविश्वासाची ज्योत आगामी निवडणुकीत तुमची उरलीसुरली सद्दीही संपवून टाकेल. त्यामुळे पवारांनी जनतेच्या मनात आत्मविश्वास जागवण्याऐवजी स्वतःची, स्वतःच्या पक्षाची, पक्षातल्या कार्यकर्त्यांची चिंता करावी. कारण आत्मविश्वास गमावलेले खडीभर लोक पवारांच्या पक्षात आहेत आणि त्यांच्यातच आत्मविश्वास जागविण्याची खरी गरज आहे.
@@AUTHORINFO_V1@@