भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |


नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक आज नवी दिल्ली येथे सुरु झाली आहे. संसदेच्या लायब्ररी बिल्डींगमध्ये ही बैठक सुरु झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होत आहे. येत्या ९ तारखेला होणाऱ्या राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून या निवडणुकीसंबंधी या बैठकीत चर्चा होणार आहे.

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी काल राज्यसभेमध्ये उपसभापती निवडणुकांविषयी घोषणा केली होती. येत्या गुरुवारी उपसभापती पदासाठी मतदान घेण्यात येणार असल्याचे नायडू यांनी जाहीर केले होते. त्यामुळे उपसभापती पदासाठीच्या आपल्या उमेदवाराच्या नावावर चर्चा करण्यासाठी म्हणून ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यसभेमध्ये भाजपकडे सर्वाधिक जागा आहेत. राज्यसभेचे सभापती असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे देखील भाजपचे उमेदवार होते, त्यामुळे सभागृहाचे उपसभापती देखील भाजपचाच असावा असा पक्षाचा मानस आहे. परंतु सभागृहामध्ये बहुमत नसल्यामुळे भाजपने अजूनपर्यंत आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. दरम्यान कॉंग्रेस देखील ही निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून प्रयत्न करत आहे. परंतु कॉंग्रेसने देखील आपला उमेदवार अजून जाहीर केलेला नाही. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर भाजपची आजची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@