ते पंधरा दिवस : ७ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018   
Total Views |
 
 


 
 
देशभरातल्या अनेक वर्तमानपत्रांत कालच्या गांधीजींच्या लाहोरमधून केलेल्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळालेली आहे. 'मुंबई टाइम्स'मध्ये या संबंधीची ठळक बातमी आहे, तर 'दिल्लीच्या हिंदुस्थान'ने ही याला पहिल्या पानावर प्रकाशित केले आहे. कलकत्त्याच्या 'स्टेट्‍समन'मध्येही, ही बातमी आहे. मद्रासच्या 'हिंदू' ने ही त्याला प्रकाशित केलंय.
 
 
मात्र, ‘भारताच्या राष्ट्रध्वजात जर चरखा नसेल, तर मी त्या ध्वजाला प्रणाम करणार नाही’, हे काहीसं प्रक्षोभक वाटणारं, आणि गांधीजींच्या एकूण व्यक्तिमत्वाला साजेसं नसणारं वक्तव्य, भारताच्या अनेक वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेलं नाही कारण त्यांच्यापर्यंत ही बातमीच पोहोचलेली नाही. पंजाबच्या पंजाबी, हिंदी आणि उर्दू वर्तमानपत्रांनी मात्र या बातमीला चांगलंच उचलून धरलेलं आहे. देशभर, सकाळी सकाळी लोकं याच बातमीवर चर्चा करताहेत.
 
लाहोरचं ‘मिलाप’ हे दैनिक सकाळी लोकांच्या हातात होतं. तिथल्या हिंदुंचं हे प्रमुख वर्तमानपत्र. अर्थात या पूर्वी हिंदू महासभेचं मुखपत्र असलेलं ‘भारत माता’ हे अधिकांश हिंदूंच्या घरात दिसायचं. पण काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कॅलिग्राफी आर्टिस्टने गांधीजींच्या बद्दलची माहिती चुकीने, वेगळ्याच, अपमानजनक शब्दांत छापली, अन त्यानंतर ते दैनिकच बंद पडलं.
 
मात्र मिलाप, प्रताप, वंदे मातरम, पारस या हिंदीतून प्रकाशित होणाऱ्या दैनिकांनी सिंध प्रांतातल्या हैदराबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेचं चांगलं वर्णन दिलेलं आहे. सरसंघचालक गुरुजी यांच्या भाषणाचा गोषवारा ही छापला गेला आहे. ‘डॉन’ या इंग्रजी दैनिकाने ही गुरुजींचे भाषण छापलेय.
 
 
रावळपिंडीमध्ये एका घरात, आज गुरुवारी सकाळी, ‘पाकिस्तान हिंदू महासभेच्या’ नेत्यांची लहानशी बैठक भरली होती. ‘फाळणी आता निश्चित आहे आणि पिंडीसकट अधिकांश पंजाब आणि पूर्ण सिंध प्रांत पाकिस्तानात जाणार हे ही स्पष्ट दिसतंय. पाकिस्तान नॅशनल गार्डचे हिंदूंवरचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.’ अशा परिस्थितीत ‘होऊ घातलेल्या’ पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंसाठी काही तरी करणे आवश्यक होते. आणि म्हणूनच ‘पाकिस्तान हिंदू महासभेच्या’ नेत्यांनी एक वक्तव्य प्रकाशनासाठी दिलं.
 
 
या वक्तव्यात त्यांनी पाकिस्तानातील हिंदूंना अपील केली कि, त्यांनी मुस्लिम लीगच्या ध्वजाचा आदर आणि सन्मान करावा. त्याचबरोबर पाकिस्तान हिंदू महासभेने, पश्चिम पंजाबमध्ये मुस्लिम लीगचा, असेंब्ली पार्टीचा नेता निवडून आल्याबद्दल इफ्तखार हुसेन खान ‘मेमदोन’ यांचे अभिनंदन केले तर इस्ट बंगाल लीग असेंब्ली पार्टीचा नेता निवडून आल्याबद्दल ख्वाजा निझामुद्दीन यांचेही अभिनंदन केले.
 
पाकिस्तान होणार, किंबहुना झालंय, हे आता तेथील हिंदूंना पूर्णपणे लक्षात आलेलं दिसतंय..!
 
 
हैदराबाद, सिंध 


रात्री किंचित पाऊस पडून गेलाय. त्यामुळे वातावरणातील उष्मा जरा कमी झालाय. गुरुजींचे जागरण भल्या पहाटेच झालेय. ज्या प्रभात शाखेत गुरुजींना नेण्यात आलंय, तिथे भरपूर उपस्थिती आहे. मोठं मैदान आहे. त्यात सहा गण खेळताहेत. गुरुजी आज आपल्या शाखेत आलेत, म्हणून स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. पण त्याच बरोबर आता काही दिवसांतच आपल्याला हे सारं सोडून जायचंय..... आपल्या पूर्वजांची ही पवित्र भूमी लवकरच आपल्याला पारखी होणार आहे अन भारताच्या त्या अज्ञात प्रदेशात आपल्याला जावं लागणार आहे... याची विषण्णताही त्या स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. शाखेनंतर एक लहानशी अनौपचारिक बैठक. त्यातच सर्वांसाठी अल्पाहार. गुरुजी त्या तणावपूर्ण वातावरणातही, हसत खेळत चैतन्य आणण्याचा प्रयत्न करत होते. 
हैदराबाद आणि आजूबाजूच्या सिंध प्रांतातल्या हिंदूंना सुखरूप पणे भारतात नेण्याची योजना तयार होतेय. दुर्दैवानं हे सारं करताना भारत सरकारची मदत काहीही नाही. या हिंदूंना भारतात कुठे ठेवायचं, कुठे त्यांची वसती करायची या संदर्भात कसलेही निर्देश भारत सरकारकडून नाहीत. कारण लोकसंख्येच्या अदलाबदलीचं तत्वच मुळात कॉंग्रेसला मान्य नाही. गांधीजी तर हिंदूंना पूर्व पंजाबात आणि सिंध प्रांतातच राहण्याचे सल्ले देताहेत. तिथे राहत असताना, मुस्लिम गुंडांच्या आक्रमणापुढे निर्भयतेने हौतात्म्य पत्करण्याला उद्युक करताहेत...!
 
 
अशा परिस्थितीत, हिंदूंची रक्षा करत, त्यांना सुखरूप पणे भारतात आणणं, हे फार धैर्याचं, साहसाचं आणि धोक्याचं काम आहे. मात्र संघानं हे आव्हान स्वीकारलंय..! अल्पाहार झाल्या झाल्या, साधारण ९ वाजेच्या सुमारास गुरुजी परत कराचीच्या दिशेने निघाले आहेत. निरोप देताना हैदराबाद आणि आजूबाजूच्या गावांमधून आलेल्या स्वयंसेवकांच्या डोळ्यात पाणी आहे. अंतःकरणं जड झालेली आहेत. आता परत केव्हा आणि कशी भेट होणार, हे कोणालाच माहित नाही. ‘सिंध प्रांतातला हा आपला शेवटचाच प्रवास’, हे गुरुजींनाही चांगल्यानेच माहित आहे. काळ थांबलाय. वातावरण प्रचंड जडशील झालंय. पण निघणं भाग आहे. अनेक कामं समोर पडलेली आहेत.
 
 
 
 
 
आणि आबाजी, राजपाल जी वगैरेंबरोबर गुरुजींचा हा काफिला, कराचीच्या दिशेने निघाला...! जवळपास याच वेळेला, म्हणजे नक्की सांगायचं तर मॉस्कोमध्ये सकाळचे सहा वाजले असताना, स्वतंत्र भारताच्या, रशियासाठीच्या पहिल्या राजदूत, श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांचं विमान मॉस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं.
 
 
ऑगस्ट महिना हा मॉस्को वासियांसाठी उन्हाळा असला तरी विजयालक्ष्मी पंडितांना वातावरणात गारठाच जाणवला. विमानतळावरच, त्यांच्या स्वागतासाठी स्वतंत्र होऊ घातलेल्या भारताचा राष्ट्रध्वज, अशोक चक्रांकित तिरंगा फडकविल्या गेला. ‘कदाचित भारता बाहेर अधिकृत रित्या स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज फडकविण्याची ही पहिलीच वेळ असेल’, या विचारांनी बाईंच्या चेहऱ्यावर हलकेच स्मित पसरले.
 
 
सत्तेचाळीस वर्षांच्या विजयालक्ष्मी जवाहरलाल नेहरूंच्या भगिनी असल्या तरी तीच त्यांची एकमेव ओळख नाही. त्यांनी स्वतः अनेक वेळा स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊन कारावास भोगलेला आहे. त्या स्वतः कुशाग्र बुद्धीच्या आहेत. जवाहरलाल पेक्षा तब्बल अकरा वर्ष लहान असल्याने त्यांना त्यांचा फारसा सहवास लाभलेला. एकवीस वर्षांचे वय असतानाच, त्यांनी त्यांच्या मर्जीने काठीयावाड संस्थानातील सुप्रसिद्ध वकील रणजीत पंडित यांच्या बरोबर विवाह केला होता. त्यामुळे स्वतंत्र भारतातर्फे रशियाच्या राजदूतपदी नेमले जात असताना, फक्त ‘जवाहरलाल नेहरू यांची बहीण’ हीच एकमात्र योग्यता त्यांच्यासाठी नव्हती. तर त्यांचे स्वतः चे कर्तुत्व ही होते..! रशियन मुत्सद्यांनी या भारतीय राजदूत म्हणून आलेल्या जवाहरलाल यांच्या बहिणीचे फार आत्मीयतेने स्वागत केले. रशिया मधील त्यांच्या वास्तव्याची सुरुवात तर फार छान झाली होती..!
 
 
दुपारी एक वाजायच्या सुमारास, दिल्लीहून कायदे आझम जीनांना घेऊन येणारे व्हॉइसरॉय साहेबांचे विशेष डाकोटा विमान, कराचीच्या विमानतळावर उतरले. त्यातून जीना, त्यांची बहीण फातिमा आणि त्यांचे ३ सहकारी उतरले.
 
पाकिस्तानच्या निर्मात्याच्या या ‘प्रस्तावित पाकिस्तानच्या’ भेटीबाबत मुस्लिम लीगच्या कार्यकर्त्यांमध्ये फारशी उत्सुकता दिसत नाही. कारण जीनांना घ्यायला फारच थोडे कार्यकर्ते विमानतळावर आलेले आहेत. पाकिस्तान आणि जीनांच्या संबंधी एक – दोन घोषणा दिल्या गेल्या. पण त्या अगदीच मरगळलेल्या होत्या.
 
कायदे – आझम जीनांचं नेहमीकरता पाकिस्तानात येणं, हे तसं निरुत्साहीच झालं..!
 
 
मुंबई.
 
आकाशात ढग. पावसाळी पण प्रसन्न वातावरण. बोरीबंदरच्या, मुंबई महापालिकेच्या भवना समोर एक लहानसा समारंभ चाललाय. समोर बेस्ट च्या दोन बसेस उभ्या आहेत आणि एक छोटासा मांडव घातलाय.
 
‘बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय एंड ट्रान्सपोर्ट’ नावाने, सन १८७४ पासून मुंबईकरांच्या सेवेत असलेली कंपनी, स्वातंत्र्याच्या फक्त एक आठवडा आधी, मुंबई महानगर पालिकेच्या आधीन होण्याचा हा समारंभ आहे. या क्षणी बेस्टच्या जवळ एकूण २७५ बसेस आहेत आणि आता या सर्वांची मालकी, पालिके कडे हस्तांतरित होतेय. मुंबईत एक नवीन अध्याय सुरु होतोय.
 
 
वरंगल.
 
काकतिया राजवंशाची राजधानी. हजार स्तंभांच्या मंदिरासाठी प्रसिध्द असलेलं स्थान. निझामशाहीतलं मोठं शहर. सकाळचे अकरा वाजताहेत. ऑगस्ट महिन्यातही सूर्य आग ओकतोय. दूर दूर वर ढगांचे चिन्ह नाही. वारा ही नाही. झाडांची पानं निस्तब्ध, निष्प्राण पडून असलेली.
 
 
वरंगल शहराचा मुख्य चौक तसा सामसूमच आहे. फारशी वर्दळ नाही. आणि अचानक चौकात येऊन मिळणाऱ्या चार, पाच रस्त्यांमधून कॉंग्रेसचे झेंडे घेत, घोषणा देत शंभर – सव्वाशे कार्यकर्ते चौकात येतात. “निझामशाहीला भारतीय संघ राज्यात विलीन करा...” अशा घोषणा उच्च स्वरात दिल्या जाताहेत. या सर्वांचं नेतृत्व करताहेत, वरंगल जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष कोलिपाका किशन राव गारू.
 
 
हैदराबाद राज्य कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार या कार्यकर्त्यांनी भारतीय संघ राज्यात विलीन होण्यासाठी सत्याग्रह सुरु केलाय. हैदराबाद राज्य कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वामी रामतीर्थांनी जनतेला अपील केलीय, या सत्याग्रहात सामिल व्हायची. ते स्वतः हैदराबादेच्या काचीगुडा भागात शेकडो कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह घोषणा देत, निदर्शनं करताहेत.
 
 
अवघ्या भारताला स्वातंत्र्याची चाहूल लागलेली असली, तरी हा निझामशाही चा विशाल भाग अजूनही पारतंत्र्याच्या काळोखातच आहे, रझाकारांचे अमानुष अत्याचार सहन करत..!
 
 
कलकत्त्याच्या ‘अमृत बझार पत्रिका’, दैनिक बसुमती, स्टेट्‍समन सारख्या सर्व दैनिकांमधे, पहिल्या पानावर आज ठळक बातमी आहे ती चक्रवर्ती राजगोपालाचारी अर्थात राजाजी यांना बंगाल चे गव्हर्नर नेमल्याची. म्हणजेच राजाजी हे खंडित बंगाल चे, अर्थात ‘पश्चिम बंगाल’ चे पहिले राज्यपाल असणार आहेत. राजाजी हे कॉंग्रेस पक्षातलं उत्तुंग व्यक्तिमत्व. मद्रास प्रांत एका हाती चालविणारे. मात्र नुकत्याच झालेल्या प्रांतिक निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावं लागलं. त्यातून राजाजींची ओळख ही ‘फाळणी ची भूमिका हिरीरीने मांडणारा नेता’, अशी.
 
 
आपल्या अभ्यासिकेत ही बातमी वाचताना शरद चंद्र बोसांचं डोकं मात्र तापलंय. त्यांनी लगेचच एक वक्तव्य तयार केलं, सर्व दैनिक वर्तमानपत्रातून प्रकाशित करण्यासाठी. शरद बाबुंनी लिहिलं, “राजगोपालाचारीची नियुक्ती ही बंगालचा अपमान आहे. ज्या माणसाला मद्रासने नाकारले, निवडणुकीत पराभूत केले, त्यालाच आमच्या डोक्यावर बसविण्यात कसला आलाय शहाणपणा..?”
 
 
दिल्ली.
 
 
भारतीय सैन्य दलाचं मुख्यालय. एकदम कडक वातावरण. पूर्णतः अनुशासित. कलप लावलेल्या चकाचक गणवेशांमधील सैनिकांची ये जा चालू आहे.
 
 
थोडं आत गेल्यावर मात्र वातावरणात बदल जाणवतोय. जास्त गंभीर. जास्त शिस्तशीर. जास्त अदबशीर. येथे भारताच्या कमांडर-इन-चीफ चं भलंमोठं कार्यालय आहे. दारा शेजारी मोठ्या पितळी पाटीवर डौलदार अक्षरात नाव आहे – Sir Claude John Auchinleck. त्या भल्यामोठ्या दालनात, तश्याच भल्यामोठ्या महागोनी टेबलामागे छानश्या उभट खुर्चीत टेकून बसले आहेत, सर ऑचिनलेक. त्या टेबलावरचा लहानसा यूनियन जेक लक्ष वेधून घेतोय.
 
 
सर ऑचिनलेकां समोर एक महत्वाचं पत्र पडलंय. प्रस्तावित स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, राजकीय स्वरूपाच्या, सर्व भारतीय कैद्यांना सोडून देण्याविषयी ची ती नोट शीट आहे. ‘सर्व भारतीय’ या शब्दावर ऑचिनलेक थबकतात. याचा अर्थ, सुभाषचंद्र बोसांच्या ‘इंडियन नॅशनल आर्मी’ मध्ये लढलेले सैनिक ही..? होय. नोट शीट वरून निघणारा अर्थ ही तेच सांगतो.
 
 
सर साहेबांच्या कपाळावरची शीर तडतडते. त्या सुभाष बोसांच्या सहकाऱ्यांना सोडून द्यायचं..? इंग्रजांना खरं खुरं आव्हान दिलेल्या त्या ‘आझाद हिंद सेनानींना’ मोकळं सोडायचं..? नाही. कदापि नाही. किमान १५ ऑगस्टपर्यंत तरी आपली सत्ता आहे. तोपर्यंत तरी नाहीच नाही.  मग ते त्यांच्या स्टेनोला बोलावतात. आणि हळू, पण कणखर आवाजात मजकूर सांगू लागतात, “इतर राजकीय कैद्यांना १५ ऑगस्टला मोकळं करण्यास सैन्य दलाला कसलाच आक्षेप नाही. मात्र सुभाष बोसांचे सहकारी असलेल्या ‘इंडियन नॅशनल आर्मीच्या सैनिकांना सोडून देण्याला आमचा प्रखर विरोध आहे...” आणि सुभाष बाबूंचे ते सहकारी, भारताला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावलेले ‘आझाद हिंद सेने’चे शूर सैनिक, १५ ऑगस्टला काही सुटत नाहीत, हे निश्चित होतं..!
 
 
तिकडे मद्रास सरकारने दुपारी एक पत्रक प्रसिद्धीसाठी दिले, ज्यात ही घोषणा करण्यात आली कि भारतीय स्वातंत्र्य युद्धात भग घेतलेल्या, मद्रास प्रांतातील सर्वांना पाच एकर जमीन फुकटात देण्यात येईल. १५ आणि १६ ऑगस्टला सुट्ट्यांची घोषणाही या पत्रकात करण्यात आली.
 
स्वातंत्र्य सूर्याच्या उदयाला फक्त एक आठवडा तर उरलाय..! दुपारचे चार वाजले आहेत. मद्रास मध्ये स्थानिक सिनेमा मेनेजर्सची सभा चालली आहे. स्वातंत्र्याच्या संदर्भात ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. के सी आर रेड्डी हे या सर्वात जेष्ठ आहेत. ते प्रस्ताव मांडतात – ’१५ ऑगस्ट नंतर सर्व चित्रपट गृहांमधून इंग्रजांचे (ब्रिटीश सरकारचे) राष्ट्रगीत वाजवले जाणार नाही. त्या जागी एखादे चांगले भारतीय राष्ट्रीय विचारांचे गीत वाजवले जाईल..” प्रस्ताव सर्वानुमते, टाळ्यांच्या गजरात पारित होतो..!
 
तिकडे दूर कराचीत, एका मोठ्या हवेलीत, श्रीमती सुचेता कृपलानी, सिंधी बायकांची बैठक घेताहेत. साधारण शंभर – सव्वाशे बायका, त्या तशा असुरक्षित वातावरणात ही गोळा झालेल्या आहेत.
 
 
सुचेता कृपलानींचे पती, जे. बी. कृपलानी हे सध्या कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कॉंग्रेस ने घेतलेल्या फाळणीच्या निर्णयाने या सीमा भागातील जनमत जबरदस्त खवळलेले आहे. त्यामुळे आपल्या या गृह प्रांतात वातावरण सामान्य ठेवण्याचे या दोघा पतीपत्नींचे प्रयत्न चालले आहेत. सुचेता बाईंना, त्या सर्व सिंधी बायका, ‘आपण किती असुरक्षित आहोत’ हे सांगतात. स्त्रियांवर मुसलमानांचे किती नृशंस अत्याचार होताहेत हे ही सांगतात.
 
 
पण सुचेता बाईंना हे काही पटलेलं नाही. त्या आवेशात त्यांची बाजू मांडू लागतात. “मी पंजाब आणि नोवाखालीत भरपूर फिरले आहे. मात्र कोणाही गुंड माणसाची माझ्याकडे वाकडी नजर वळवण्याची हिंमत झाली नाही. कां..? तर मी काही भडक मेकअप करत नाही की लिपस्टिक लावत नाही.” “तुम्ही बायकाच लो नेकचे ब्लाउज घालतात, पारदर्शक साड्या नेसतात. म्हणून त्या मुस्लिम गुंडांचे तुमच्याकडे लक्ष जाते. आणि एखाद्या गुंडाने आक्रमण केलंच, तर तुमच्या राजपूत बहि‍णींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, जोहरचा..!” (Indian Daily Mail – ७ ऑगस्ट ची बातमी, प्रथम पृष्ठावर)
 
 
त्या हवेलीतल्या मोठ्या खोलीत बसलेल्या, जीव मुठीत घेऊन आजचा दिवस उद्यावर ढकलणाऱ्या, घाबरलेल्या सिंधी बायका अक्षरशः आवाक झाल्यात..! काय सांगताहेत, या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पत्नी..? या अशा संकटाच्या सावलीत वावरणाऱ्या आम्ही बायका भडक मेकअप करतो, लो कट ब्लाउज घालतो..? आणि म्हणून मुस्लिम गुंड आमच्याकडे आकृष्ट होतात..? आणि त्यांनी आमच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला, तर आम्ही राजपूत स्त्रियांप्रमाणे जोहार करावा..?
 
 
कॉंग्रेसचे नेतेच नव्हे, तर त्यांच्या बायकाही वास्तवाशी फटकून वावरायला लागल्यात..?
 
 
दिल्लीतील तेच सैन्यदलाचं मुख्यालय.
 
दुसऱ्या मजल्यावर एक मोठं दालन. गोरखा रेजिमेंटचं, सैन्य मुख्यालयातलं लहानसं कार्यालय. ‘गोरखा रायफल्स’ नावाने जगभरात गाजत असलेली ही शूर सैनिकांची पलटण.
 
 
एका प्रशस्त टेबलापाशी रेजिमेंटचे चार अधिकारी एका गहन प्रश्नावर चर्चा करत आहेत. भारतीय सैन्याची वाटणी होतेय. त्यात गोरखा रेजिमेंटने पाकिस्तानात जायचे का, हा मोठा मुद्दा आहे. पूर्वी इंग्रजांच्या विनवणीवरून गोरखा रेजिमेंटच्या काही पलटणी सिंगापुरला दिल्या गेल्या. काही ब्रुनेइला गेल्या. या सर्वांसाठी नेपाळ सरकारची आणि गोरखा रेजिमेंटची सहमती होती. मात्र पाकिस्तानात जायला एकही गोरखा सैनिक तयार नव्हता. शेवटी गोरखा रेजिमेंटच्या त्या चारही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक नोट तयार केली, कमांडर-इन-चीफ यांना द्यायला, की गोरखा रेजिमेंटची एकही बटालियन पाकिस्तानात जायला इच्छुक नाही. आम्ही भारतातच राहणार..!
 
 
लखनऊ.
 
स्टेट असेंब्लीमधील मुख्यमंत्र्यांचं कार्यालय.
 
भरदार देहयष्टीचे आणि झुपकेदार, भरघोस मिशा असणारे गोविंद वल्लभ पंत आपल्या जिंदादिल स्वभावाप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांशी हसत खेळत चर्चा करताहेत. कैलाश नाथ काटजू, रफी अहमद किदवई आणि पी. एल. शर्मा हे मंत्री आजूबाजूला बसलेले आहेत. विषय आहे – ब्रिटिशांनी अपभ्रंश केलेल्या शहरांच्या, नदींच्या नावांना बदलून त्यांना त्यांच्या मूळ नावाने ओळखण्याचा.
 
ब्रिटिशांनी गंगेचं गेन्जेस केलं होतं तर यमुनेचं जुम्ना. पवित्र अशा मथुरेचं नाव त्यांनी मुत्रा (Muttra) केलं होतं. या सर्वांची मूळ नावं कायम व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने एक आदेश काढला आणि तत्काळ प्रभावापासून या सर्व गावांची आणि नद्यांची नावं बदलण्यात आल्याचे जाहीर केले..!
 
१७, यॉर्क रोड. जवाहरलाल नेहरूंचं घर. सध्या स्वतंत्र भारताचं मुख्य प्रशासनिक केंद्र.
 
आत्ता संध्याकाळी ६ वाजता, नेहरू हे विदेश मंत्र्यांच्या भूमिकेत आहेत. पाकिस्तान अस्तित्वात यायला आता फक्त एक आठवडाच उरलाय. या पाकिस्तानात आपला राजदूत ठेवणं अत्यावश्यक आहे. कारण बरीच काम सामंजस्याने करून घ्यायची आहेत. हिंदू – शीख विस्थापितांचा मोठा प्रश्न नीट मार्गी लावायचा आहे.
 
आणि नेहरूंच्या समोर नाव आलं, श्रीप्रकाश यांचं. नेहरूंच्याच प्रयागचे, म्हणजेच अलाहाबादचे हे श्रीप्रकाश. अनेक स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेले. ‘भारत छोडो’ आंदोलनात दोन वर्ष तुरुंगात असलेले. विनम्र आणि स्पष्टवक्ता. केंब्रिजमधे उच्च शिक्षण घेतलेल्या या सत्तावन वर्षाच्या माणसामध्ये प्रशासकीय क्षमता भरपूर आहे.
 
अर्थातच श्रीप्रकाश यांच्या नावाचा आदेश निघाला. नवनिर्मित पाकिस्तानातले, भारताचे पहिले हाय कमिश्नर. ११ ऑगस्टला जीना पाकिस्तानच्या कायदे मंडळात पहिले भाषण देणार होते. त्यापूर्वी श्रीप्रकाश यांनी कराचीला रिपोर्ट करणं आवश्यक होतं. पुढील दोन वर्ष पाकिस्तानातून प्रचंड संख्येने विस्थापित झालेल्या हिंदू-शिखांचा मुद्दा, पाकिस्तान चा उद्दामपणा आणि काश्मीर गिळंकृत करण्याचा पाकिस्तानचा डाव.. या सर्व कठीण प्रश्नांना तोंड द्यावं लागणार आहे, हे कुठं त्यांना माहित होतं..!
 
 
गुरुवार. ७ ऑगस्ट.
 
 
रात्र होत चालली आहे. अमृतसर पासून सुरु झालेला गांधीजींचा ट्रेनमधील प्रवास चालूच आहे. एकाच जागी बसून गांधीजींचं शरीर आंबून गेलंय. त्यांना चालणं आवडतं. अशा माणसाला चोवीस तासांपेक्षा जास्त एका ठिकाणी बसवून ठेवणं ही तशी शिक्षाच आहे. पण गांधीजींचं वाचन आणि मनन दोन्हीही चालूच आहे.
 
 
गाडी सध्या संयुक्त प्रांतातून जातेय. थांबणाऱ्या प्रत्येक स्टेशनवर कार्यकर्ते, जनता त्यांना भेटायला येतेय. अधिकांश लोकांचा हाच प्रश्न – ‘बापू, या दंगली केव्हा थांबणार..?’
 
 
त्यांचे लाडके बापू अस्वस्थ आहेत. वाहच्या शरणार्थी शिबिरात आणि लाहोरमध्ये जे पाहिलं आणि ऐकलं ते भयानक होतं.. पण म्हणून आपली जागा, आपली जमीन, आपली घरं सोडून जायचं..? मग तर आपण ज्या बद्दल बोलतोय, ते सारं खोटं ठरेल... उद्या पहाटे पटनामध्ये गांधीजींना उतरायचे आहे. काळोखाला कापत जाणाऱ्या त्या रेल्वेच्या खिडकीतून गांधीजी दूरवर बघताहेत..
 
 
अस्वस्थ भारताचं भविष्य बघण्याचा हा त्यांचा मनस्वी प्रयत्न आहे..!
 
 
 
प्रशांत पोळ
 
 
मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : ६ ऑगस्ट १९४७
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@