ए ‘अ‍ॅपल’चा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |



‘अ‍ॅपल’च्या उलाढालीचा १ ट्रिलियनचा भलामोठा आकडा दिसत असला तरी त्यामागच्या सृजनकथा ठाऊक असणेही तितकेच गरजेचे आहे.

 

स्टिव्ह जॉब्स या जगात असताना १९९७ साली ‘अ‍ॅपल’ची एक जाहिरात अमेरिकेत झळकली होती आणि जगभर गाजली होती. ‘ज्या मंडळींना असा वेडा आत्मविश्वास असतो की, ते जगही बदलू शकतात...तेच जग बदलतात.’ हा संदर्भ आजच्या संदर्भात आठवायचे कारण म्हणजे ‘अ‍ॅपल’ या संगणक, मोबाईल व प्रामुख्याने हार्डवेअर व त्याला लागणाऱ्या प्रणाली विकसित करणाऱ्या कंपनीला मिळालेले देदीप्यमान लौकीक यश. १९८० साली लोकांसाठी समभाग खुले करण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर केवळ ३७ वर्षांत अ‍ॅपलने अमेरिकेतल्या पहिला १ ट्रिलियन डॉलर इतका महाकाय ताळेबंद गाठला. ही इतकी मोठी उलाढाल ‘अ‍ॅपल’सारख्या कंपनीने कशी गाठली, हे पाहाणे रंजक ठरावे. ऐंशीच्या दशकात जागतिक उत्पादने आणि विविध प्रकारच्या सेवा हेच अर्थार्जनाचे आणि रोजगाराचे मुख्य स्त्रोत असताना संगणक क्रांती येऊ घातली. येऊ घातली अशा अर्थाने की, हा सगळा काळ खरेतर टेलिकम्युनिकेशनचा होता. भारतासारख्या देशाला राजीव गांधींसारखे नेतृत्व गांधी घराण्यातून मिळाले होते. सॅम पित्रोडा, प्रभाकर देवधर यांसारख्या आपल्या भारतीय टेक्नोक्रॅट मित्रांच्या साहाय्याने राजीव गांधी देशात टेलिकम्युनिकेशनची क्रांती आणू पाहात होते. यात त्यांच्यावर टीका करण्यासारखे काहीच नाही. मात्र, त्याच सुमारास अमेरिकेत ‘अ‍ॅपल’चा पाया रचला जात होता. संगणकाच्या महाकाय यंत्रणांपासून ते कार्यालयातील टेबलावर किंवा बेडरूममधील टेबलावर बसू शकेल, अशा संगणकाच्या निर्मितीच्या प्रसववेदना सुरू होत्या. जगातील सर्वच मोठ्या उद्योगसमूहांना टेलिकम्युनिकेशनचे गारूड इतके होते की, संगणकाचे हार्डवेअर आणि त्याला लागणारे सॉफ्टवेअर याकडे पाहायला कुणालाही वेळ नव्हता. त्यामुळे संगणकीय क्रांतीची बीजे ही सर्वसामान्य इंजिनिअर्स किंवा सृजनशील तंत्रज्ञांनीच पेरली आहेत, हे ध्यानात घ्यावे लागेल. स्टिव्ह जॉब्स किंवा बिल गेट्स सारखी नावे मग पुढे आली. नंतर त्यातील काही जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत जाऊन बसली, ती याच कारणामुळे. मानवी कल्पनाशक्ती व सृजनशीलता याचा उत्तम मिलाफ म्हणून आजही ‘अ‍ॅपल’कडे पाहिले जाते.

 

सुलेखनकार असलेला ‘अ‍ॅपल’चा जन्मदाता रटाळ अशा संगणकप्रणालींमध्ये मानवी स्पर्शाची जाणीव निर्माण करता येईल का, याचा विचार करीत होता आणि त्यातूनच ‘मॅकीन्टॉश ते आयफोन’चा प्रवास समृद्ध होत गेला. महाकाय संगणक व्यक्तींच्या टेबलावर पोहोचले खरे, पण त्यात अधिक ‘आय’ किंवा ‘मी’ कसा असेन, हाच ‘अ‍ॅपल’च्या निर्मितीचा ध्यास होता. कानाला हेडफोन लावून तळहातावर मावतील अशा वॉकमनमध्ये हव्या त्या कॅसेट टाकून ऐकत फिरणारी ऐंशी-नव्वदीतील युवा पिढी आपण सगळ्यांनीच पाहिली. त्याच धर्तीवर आलेला ‘अ‍ॅपल’चा ‘आयपॉड’ हे सारे तंत्रज्ञान एकामागोमाग एक करून मोडीत काढून गेला. हवे ते संगीत, हवे तेव्हा डाऊनलोड करण्याची सोय, लहान आकार आणि किमान बटणांचे गुळगुळीत मॉडेल. साधे सोपे माणसाला न घाबरविणारे असे काही नामाभिमान स्टिव्ह आणि त्याच्या टीमला हवे होते. त्यातूनच ‘अ‍ॅपल’ हे नाव सापडले. गंमत म्हणजे आपल्याकडे सगळेच सुरुवातीला जसे आपल्या ब्रॅण्डविषयी जागृत आणि संवेदनशील असतात, त्याची जाहिरात किंवा अस्तित्व ठळकपणे लक्षात यावे म्हणून प्रयत्न करतात तसा, या मंडळींनीही केला होता. झाडाखाली बसलेला न्यूटन आणि त्याच्या डोक्यात पडणारे सफरचंद असे ‘अ‍ॅपल कम्प्युटर्स कंपनी’ चे पहिले चिन्ह होते. तिथून पुढे हा प्रवास अर्धवट खाल्लेल्या सफरचंदापर्यंत येऊन पोहोचला. स्टिव्ह जॉब्सच्या गरिबीतून संघर्ष करीत ‘अ‍ॅपल’चा निर्माता होण्याची, अन्नासाठी इस्कॉन मंदिरात जाण्याची कथा वारंवार सांगितली जाते. अनेकांसाठी ती प्रेरणादायीदेखील असते, मात्र ‘अ‍ॅपल’च्या यशात सर्वात मोठा वाटा आहे तो त्याच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीमागच्या तत्त्वज्ञानाचा. कदाचित जगातल्या कुठल्याही उत्पादनामागे असा मानवी अस्तित्वाला केंद्रस्थानी ठेऊन तंत्रज्ञानाचा विकास झाला असेल. ‘अ‍ॅपल’ एक एक करून आपली मुसंडी मारत असताना संगणक विश्वाचा खरा स्वामी झाला होता ‘विंडोज’ आणि त्याचा निर्माता बिल गेट्स.

 

आपल्याकडे जसे राजकीय समर्थक आपापल्या भावविश्वातल्या नेत्यांचे आंधळे समर्थन करीत असतात, तशीच काहीशी स्थिती त्यावेळी युरोप आणि अमेरिकेत होती. या दोन्ही मोठ्या व्यक्तिमत्त्वांनी एकमेकांविषयी केलेल्या व्यक्तिगत किंवा प्रणालीविषयी केलेल्या टीका, टिप्पण्या किंवा शेरे त्यावेळी गाजत होते. टेकसाप्ताहिकांचे मथळे या दोन्ही दिग्गजांवर असल्याच्या घटनाही झाल्या. वृत्तपत्रही साथीला होतीच. दोघेही संगणक आणि त्यासाठी लागणाऱ्या प्रणालींच्या निर्मितीत असले तरी दोघांचीही बलस्थाने अत्यंत निराळी होती. कल्पक आणि सौंदर्यभान असलेले ‘इंटरफेस’ मानवी मनाला हवेहवेसे वाटणारे, भुरळ घालणारे तंत्रज्ञान निर्माण करणे ही स्टिव्हची खासियत होती, तर उपयुक्तता, वेळापत्रकावर आधारित काम, कुठल्याही मुद्द्यांच्या आधारावर त्याच्या गाभ्यापर्यंत जाण्याची तयारी, बौद्धिक तीक्ष्णता असे गेट्सचे गुण होते. या द्वयीने एकत्र येऊन काम कधीच केले नाही. काही उत्पादने संगणकीय विश्वाची गरज किंवा अपरिहार्यता म्हणून केली गेली, पण तीही नंतर या दोघांच्या सोबत व्यवस्थापनासाठी उभ्या ठाकलेल्या टीमच्या आग्रहामुळे किंवा व्यवसायांच्या गरजांमुळे. महत्त्वाचे म्हणजे, दोघांनीही लौकिक शिक्षण सोडून आपापल्या व्यवसायांना सुरुवात केली होती. सृजनाचा आनंद की उपयुक्तता असे हे कधीही न संपणारे द्वंद्व हे दोन्ही दिगज्ज जगले. आता ग्राहकाला हवी ती उत्पादने देणाऱ्या कंपन्या एकेकाळी काही निर्मितीमूल्यांच्या आधारावर वाढीचा झगडा लढत होती, यावर विश्वास ठेवावा लागेल. व्यवसायाचे मोठमोठाले आकडे आज समोर येत असताना यामागच्या या सृजनकथा ठाऊक असणे गरजेचे आहे.

@@AUTHORINFO_V1@@