मुंब्रा पुलाची दुरुस्ती 10 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |


 

ठाणे: मुंब्रा पुलाची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिली. कोणत्याही परिस्थितीत ही वेळ पाळली जावी, असे सांगून पालकमंत्र्यांनी सर्व पालिका हद्दीतील ग्रामीण भागातील रस्त्यांचे खड्डे पॉलिमरसारखे तंत्रज्ञान, रेडीमिक्स वगैरे सारख्या पद्धतीने तातडीने बुजवावेत, पोलिसांना मदत करण्यासाठी १०० वाहतूक वॉर्डन एमएसआरडीसीने द्यावेत, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्या ना दिले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनीदेखील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात मुंब्रा बायपास दुरुस्ती तसेच एकूणच ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी परिसरात होणारी वाहतूककोंडी यावर विस्तृत चर्चा झाली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी भिवंडी येथील गोदामांच्या वाहतुकीस नियंत्रणात आणले त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली तर बराच प्रश्न सुटेल, असे सांगितले. उरण -जेएनपीटी तसेच पालघरकडून येणारी वाहनेदेखील नियंत्रित करण्याच्या सूचना होत्या. मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी तसेच संबंधितांशी बोलण्यात येऊन तत्काळ सूचना देण्यात येतील, असेही ते म्हणाले. टोलनाक्यावरील गर्दीच्या वेळी पिवळ्या रंगाच्या पट्टीचा नियम पाळण्यात येऊन रांगा सोडाव्यात गर्दी कमी होईल, असे पाहावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
 

वाहतूककोंडी दूर करण्यासाठी खड्डे बुजवणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्व ठिकाणी किमान मध्यरात्रीच्या वेळी पालिकांनी खड्डे बुजविण्याची प्रक्रिया प्राधान्याने करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सध्या पोलिसांना मदतीसाठी दिलेले वाहतूक वॉर्डन्स अपुरे असून १०० वॉर्डन्स एमएसआरडीसीने द्यावेत, असेही ते म्हणाले. वाहतूककोंडीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना, वाहनधारकांना मोठा फटका बसत असून सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून या प्रश्नाकडे पाहावे लोकांची गैरसोय होणार नाही, असे पाहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

@@AUTHORINFO_V1@@