इव्हीएमवरून विरोधकांची कोल्हेकुई!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018   
Total Views |


 

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर संशय व्यक्त करून त्यांचा वापर केला जाऊ नये, असे म्हणणाऱ्यांत तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, तेलुगू देसम, जनता दल (धर्मनिरपेक्ष), आम आदमी पार्टी, माकप, भाकप आदी सतरा पक्षांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नकोत, मतपत्रिका आणि मतपेट्या हव्यात, अशी या सर्वांची मागणी आहे.

 

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपविरुद्ध भक्कम आघाडी करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. “सोनिया गांधी, देवेगौडा आणि आपणा स्वत:स पंतप्रधान होण्याची आकांक्षा नाही, पण विरोधकांना एकत्रित करण्याची आकांक्षा आहे. आम्ही तिघे विरोधकांना एकत्रित करू शकतो,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला आहे. पवार यांनी ‘पंतप्रधानपदाची आकांक्षा नाही,’ असे म्हणणे जरा विचित्र वाटू शकते. कदाचित, ती शक्यता दुरापास्त वाटत असल्याने आधीच शर्यतीतून माघार घेण्यात शहाणपणा आहे, असे समजून त्यांनी हा निर्णय घेतला असावा! आता विरोधी ऐक्याची खूप तळमळ त्यांना लागली आहे. दुसरीकडे, देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे, असे एक पिल्लू त्यांनी सोडून दिले आहे. आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष मतभेद विसरून एकत्र आले होते. त्याप्रमाणे मोदी सरकारविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा, असेही त्यांचे म्हणणे आहे. इंदिरा गांधी यांच्या काळातील निरपराध्यांना तुरुंगात डांबणारी, राष्ट्रहिताशिवाय अन्य विचार ज्यांच्या मनात कधी आला नाही त्यांना ‘मिसा’खाली बंदिवासात टाकणारी, अन्याय, अत्याचार करणारी आणीबाणी जनता अजून विसरलेली नाही. त्यामुळे देशात आणीबाणीसारखी स्थिती असल्याचे त्यांचे म्हणणे मान्य होणारे नाही.

 

समजा, या कथित आणीबाणीला तोंड देण्यासाठी विरोधक एकत्र आले तर त्यांचे नेतृत्व कोण करणार? विरोधी नेत्यांपैकी कोणी तुरुंगात, कोणी जामिनावर, कोणी भ्रष्टाचाराच्या, घोटाळ्यांच्या आरोपांवरून डागाळलेले! जयप्रकाश नारायण, नानाजी देशमुख यांच्या तोलामोलाचा एक तरी नेता आहे का विरोधकांकडे? सगळे सत्तेसाठी हपापलेले! सर्व विरोधकांची पोटदुखी भाजपला सत्तेवरून हटविता येत नाही हीच आहे. त्यातून ही मळमळ बाहेर पडत आहे. याच्या जोडीला, विविध मार्गांचा अवलंब करून, जनतेत दुही माजवून, असंतोषाचा भडका उडवून सरकारला बदनाम कसे करता येईल, असा प्रयत्न देशात विविध ठिकाणी चालल्याचे दिसून येत आहे. सततच्या निवडणुकांमध्ये येत असलेल्या अपयशाने विरोधकांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर पराभवाचे खापर फोडणे, हे आता नित्याचेच झाले आहे. पराभव झाला की ही यंत्रे जबाबदार आणि विजय मिळाला की अळीमिळी गुपचिळी, असे चालले आहे. गेल्याच आठवड्यात सतरा विरोधी पक्षांनी, या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर निवडणुकांमध्ये केला जाऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचे ठरविले आहे. आपल्या पराभवास, या यंत्रांमध्ये जी हेराफेरी केली जाते ती जबाबदार आहे, असा विरोधकांचा दावा आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या आठवड्यात हे विरोधी नेते आयोगाकडे दाद मागणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.

 

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर संशय व्यक्त करून त्यांचा वापर केला जाऊ नये, असे म्हणणाऱ्यांत तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, तेलुगू देसम, जनता दल (धर्मनिरपेक्ष), आम आदमी पार्टी, माकप, भाकप आदी सतरा पक्षांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नकोत, मतपत्रिका आणि मतपेट्या हव्यात, अशी या सर्वांची मागणी आहे. भारतीय जनता पक्षास सर्वत्र जे यश मिळत आहे, त्यास ही यंत्रेच कारणीभूत आहेत, त्यामुळे तीच जर निकालात काढली तर आपले यश निश्चित, असे या विरोधकांना वाटत आहे. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ अमेरिका, जर्मनी आदी देशांची उदाहरणे पुढे केली जात आहेत. स्वायत्त असलेला निवडणूक आयोग आणि त्या आयोगाकडून पार पाडल्या जात असलेल्या निवडणुकांचे कौतुक केले जात असताना, आपल्या देशातील विरोधकांचा घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याचा जो प्रयत्न चालला आहे, तो पाहून त्यांची कीव करावीशी वाटते.

 

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे शंभर टक्के निर्धोक असल्याने त्यात कसल्याही प्रकारची गडबड करता येणे शक्य नसल्याचे आयोगाने सांगितले असतानाही आयोगाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायला विरोधक तयार नाहीत. या यंत्रांचा इंटरनेटशी संबंध येत नसल्याने त्यात दूरवरूनही कोणी गडबड करू शकत नसल्याचे सांगितले तरी ते त्यांना मान्य होत नाही. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या वापरांमुळे मतपत्रिका, मतपेट्या पळविल्या जाण्याचे, मतदान केंद्रे बळकाविण्याचे जे गैरप्रकार बंद झाले आहेत, ते पुन्हा सुरू व्हावेत अशी विरोधकांची इच्छा आहे काय? इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गडबड होऊ शकत नसल्याचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी अलीकडेच स्पष्ट केले आहे. २००४, २००९ आणि २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधीपासून या यंत्रांचा वापर विविध निवडणुकांसाठी केला गेला होता. ही यंत्रे निर्धोक असल्याचे स्पष्टीकरण या आधीच्या निवडणूक आयुक्तांनीही केले होते. असे असताना हा आरडाओरडा का केला जात आहे? मतदानाबाबत अधिक पारदर्शकता राहावी म्हणून आता व्होटर वेरीफिएबल पेपर ऑडिट ट्रेल्स (व्हीव्हीपॅट्स) चा वापर करण्यास प्रारंभ झाला आहे. लोकसभेच्या अलीकडील पोटनिवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसमवेत व्हीव्हीपॅट्सचा वापर करण्यात आला होता. पण, प्रखर उन्हामुळे किंवा आर्द्रतेमुळे अशा काही यंत्रात बिघाड झाल्याचे आढळून आले. ते प्रमाण नगण्य होते. पण असा कोणताही दोष व्हीव्हीपॅट्समध्ये येऊ नये, याची दक्षता आयोगाकडून घेतली जात आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुका व्हीव्हीपॅट्ससह घेण्याची तयारी आयोगाकडून केली जात आहे.

 

निवडणूक आयोगाकडून सर्व ती काळजी घेतली जात असताना आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत काहीही गडबड करणे अशक्य असल्याचे सांगितले जात असताना विरोधक त्यांना कशासाठी विरोध करीत आहेत? आपल्याला लोकांनी झिडकारल्याचे खापर या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर कशाला फोडले जात आहे? केंद्रात आणि त्यापाठोपाठ अनेक राज्यांमध्ये जनतेने विरोधकांना डावलले ही वस्तुस्थिती आहे. विरोधकांनी ‘स्वकर्तृत्वा’ने ही स्थिती ओढवून घेतली आहे. उगाच भाजपवर किंवा निवडणूक आयोगावर आरोप करण्यात काय अर्थ आहे? या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबद्दल जनतेच्या मनात अविश्वास नाही; आहे तो राजकीय पक्षांच्या मनात! एकीकडे, आयोग स्वायत्त असून तो चांगले काम करीत आहे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच आयोगाने वापरत आणलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबद्दल अविश्वास दाखवायचा, याला काय म्हणायचे? विविध निवडणुकांमध्ये सातत्याने अपयश मिळत गेल्याने द्राक्षेच आंबट आहेत, अशी राजकीय कोल्हेकुई सुरू झाली आहे! यशाची द्राक्षे चाखता आली नाहीत म्हणून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना धोपटणे सुरू आहे!

@@AUTHORINFO_V1@@