क्रोध जाळी मनाला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |


 

आपले आपल्यावरचे नियंत्रण गमावणे, हे मानसिक अस्वास्थ्याचे द्योतक आहे. मनाला थोडेसे काबूत आणताना आपल्या भावनांना समजून घेणे, त्यांच्यावर नियंत्रण आणणे, जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ज्या गोष्टींमुळे त्या भावना निर्माण झाल्या आहेत, त्याबद्दल काहीतरी विधायक करायला हवे, हे समजून घेतले पाहिजे. त्या समस्येला जाणून घेऊन काही मार्ग निघतो का, हे पाहायला हवे. म्हणजे रागासारखी भावना माणसाला उद्विग्न करणार नाही.
 

आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना अनेकदा आपल्या हाताबाहेरील असतात. कंपनी बंद पडली व एखाद्याची असलेली नोकरी गेली, एखाद्या व्यक्तीला आर्थिक व्यवहारात कुणी फसविले, विश्वासाच्या पार्श्वभूमीवर सुखासमाधनाने बसलेला संसार साथीदाराच्या बेईमान वृत्तीमुळे तुटला, तर आयुष्यात जणू ज्वालामुखीचा उद्रेक होतो. अशावेळी व्यक्तीचे भावनिक व मानसिक संतुलन पार बिघडते. तेव्हा जर त्या व्यक्तीची मानसिक पार्श्वभूमी मुळात जर कणखर असेल आणि प्रगल्भ असेल, तर कदाचित काही काळ भावनिक हिंदोळ्यावर भरकटलेली मने पुन्हा आपली मुळे जमिनीत शोधतात आणि पुन्हा भक्कमपणे उभी राहतात. बऱ्या च वेळा आपल्या आयुष्यातील अनुभवांचा हा साठा आपल्याला बरेच काही नवीन नवीन शिकवितो. आपल्या स्वत:च्या भावनांमधील कल्लोळ समजून घेणारी प्रगल्भ व्यक्ती मात्र, पुढे या भावना आपल्याला मदत करणार आहेत की, आपला विनाश करणार आहेत याचा ऊहापोह करू शकते. जेव्हा सकारात्मक भावना वा मनाला सुखावणाऱ्या भावना येतात तेव्हा त्या आपले तसे व्यावहारिकदृष्ट्या नुकसान करीत नाहीत. पण रागाच्या वा सूडाच्या भावना मात्र कुरुक्षेत्रावरील महायुद्ध घडवितात. त्यात ज्याच्यावर सूड घ्यायचा आहे, त्याचा विनाश करायला व्यक्ती आपली सारी ऊर्जा वाया तर घालवतेच, शिवाय कौरवांसारखी स्वत:च्या विध्वंसालाही कारणीभूत ठरते. एकंदरीत उद्रेकी भावनांच्या आगीत सगळेच भस्मसात होतात. म्हणूनच त्या भावनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुळात त्या भावना निर्माण तरी का झाल्या, हे समजणे जरूरीचे आहे. बऱ्या च वेळा ज्या अनुभवाच्या बळावर आपण प्रगल्भ होतो व आयुष्याबद्दल बरेच काही शिकतो, त्याच अनुभवांची शिदोरी कधी कधी कुठलाही सांगोपांग विचार वा गहन विश्लेषण न करता आपण बाळगली, तर आपलेच विचार व भावना आपल्याला जमेस धरतात.

 
एखाद्या गोष्टीबद्दल व माणसाबद्दल आपल्याला इतका अमर्याद राग का येतो? याचा थोडा विचार करायला हवा. अनुराधाच्या बाबतीत असेच झाले. छोट्या घरातल्या दोन कुटुंबांचे एकमेकांशी जमायचे नाही. एक पोटमाळ्यावर जाऊन बसायचे, तर दुसरे त्याच खोलीत खाली बसायचे. पण, त्या दोन्ही कुटुंबाची बाचाबाची चालायची, रोजचीच भांडणे व रोजचीच अस्वस्थता. अनुराधाची सततची भूणभूण की, दुसरीकडे जाऊया. पण तिच्या पतीकडे आर्थिक ताकद नव्हतीच म्हणून तोही बिथरलेला. एकेदिवशी त्याने तिला जेवण चांगले झाले नाही म्हणून जाम सुनावले. तिचाही संताप संताप झाला व घरातल्या औषधांच्या काही गोळ्या खाऊन तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नंतर ती पश्चातापदग्ध झाली. खरेतर तिचा मनातला राग त्या घरच्या रोजच्या परिस्थितीमुळे वाढत होता. आपल्याला भांडणे करत जगायला लागते. घरात नुसती किरकिर व अशांतता असते. आपल्याला हे असे जगायचे कारणच काय? आपल्या असाहाय्यतेचा खूप राग तिच्या मनात दाटून यायचा. मग त्या दिवशी नवऱ्या ने सुनावले म्हणून तीही चिडली. तीसुद्धा प्रमाणाबाहेर. नंतर जेव्हा नवऱ्या ने तिला म्हटले, “अगं, आपली बाचाबाची नेहमीच होते. पण तू असे कसे केलेस?” तेव्हा विचार करताकरता तिच्या लक्षात आले की, हा राग तसा तिच्या नवऱ्या वरचा प्रत्यक्ष राग नव्हता; मनात साचलेल्या त्या परिस्थितीच्या रागाने खरे तर तिचा संयम सुटला होता. अनेकजणांचे असे होते. आपण आपल्या भावनांबद्दल अनभिज्ञ असतो. त्या मनात धुमाकूळ घालतात. त्याचे स्वरूप सुप्त असल्याने व्यक्तीला नक्की कळत नाही की, त्या कशामुळे निर्माण झाल्या आहेत. खरे तर त्यांचा उगमस्रोत समजला तर व्यक्तीला त्या भावनांबरोबर कसे काय वागायचे, हे थोड्याशा विचारमंथनाने कळेल. आपले आपल्यावरचे नियंत्रण गमावणे, हे मानसिक अस्वास्थ्याचे द्योतक आहे. मनाला थोडेसे काबूत आणताना आपल्या भावनांना समजून घेणे, त्यांच्यावर नियंत्रण आणणे, जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ज्या गोष्टींमुळे त्या भावना निर्माण झाल्या आहेत, त्याबद्दल काहीतरी विधायक करायला हवे, हे समजून घेतले पाहिजे. त्या समस्येला जाणून घेऊन काही मार्ग निघतो का, हे पाहायला हवे. म्हणजे रागासारखी भावना माणसाला उद्विग्न करणार नाही. अशा प्रसंगी स्वत:ला स्वत:च समजून घ्यायलाही हवे.

-डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@