वाहतूककोंडीने कल्याण-डोंबिवलीकर बेजार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2018
Total Views |



 

डोंबिवली : ऐन पावसाळ्यात, रस्त्यांची चाळण झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागलाच. मात्र आता शहरातील जुना पत्रीपूल निष्कासित केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील दिवसा अवजड वाहनांची वाहतूक बंद केली असली तरी वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे दिवसाढवळ्याही अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीतून जाणार्‍या प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी होत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे दृश्य दररोज सकाळी व संध्याकाळी पाहायला मिळते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीची अवस्था वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकल्यासारखी झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण सहा प्रवेशद्वार आहेत, यांपैकी गांधारी पुलाचा अपवाद वगळला तर इतर ४ पूल अरुंद असल्याने शहराच्या प्रवेशद्वारावर वाहनांची गती कमी होऊन, मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होताना दिसत आहे.
 

कल्याण शहरातून जाणाऱ्या शीळरोडला पर्याय म्हणून पत्रीपूल - गोविंदवाडी बायपास रस्ता झाल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी मुंब्रा बायपास दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक कल्याण - शीळ रोडने वळविण्यात आली आहे. या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी तर होतेच, तसेच अपघातही होण्याची शक्यता असल्याने वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडून अवजड वाहनांना दिवसा वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, स्थानिक वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने वाहतूक पोलीस उपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसविले जात आहेत. अवजड वाहनांची दिवसाढवळ्या वाहतूक राजरोस सुरू असल्याने वाहतूककोंडीत भर पडत चालली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

दररोज सकाळी मुंबईला जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. काही वाहने दुर्गाडी-भिवंडी बायपासमार्गे जातात तर काही वाहने कल्याण-शीळ रोडने जात असतात. त्यामुळे सकाळी गर्दीच्या वेळीस मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते. वाहनांच्या रांगा शीळ फाटा ते अगदी कल्याणपर्यंत लागलेल्या असतात. त्याचा फटका शहरातील इतर रस्त्यांनादेखील बसून वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्राची सहा प्रवेशद्वारे आहेत. ठाणे-भिवंडी मार्गे कल्याण शहरात येण्यासाठी दुर्गाडी पूल, नवी मुंबई - ठाणेमार्गे डोंबिवली कल्याण शहरात येण्यासाठी लोढा-निळजे, अंबरनाथ-उल्हासनगरमार्गे कल्याण शहरात येण्यासाठी वालधुनी पूल, नगर -शहापूर - मुरबाड मार्गे कल्याण शहरात येण्यासाठी शहाड पूल, नाशिक - पडघा मार्गे कल्याण शहरात येण्यासाठी गंधारे पूल, उल्हासनगर मार्गे कल्याणमध्ये येण्यासाठी श्रीराम चौक व बदलापूर - तळोजा मार्गे नेवाळी नाका अशी एकूण सहा प्रवेशद्वारे आहेत.

@@AUTHORINFO_V1@@