ते पंधरा दिवस : ५ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2018   
Total Views |



 
वातावरण ढगाळ असूनही किंचित थंडी जाणवत होती. जम्मू हून लाहोर ला जाताना रावळपिंडी चा रस्ता चांगला होता. त्यामुळे गांधीजींचा काफिला पिंडी मार्गे लाहोर कडे निघाला होता.
 
 
वाटेत ‘वाह’ नावाचे शरणार्थी शिबिर होते. गांधीजींच्या मनात ह्या शिबिराला भेट द्यायची होती. पण त्यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना ही भेट टाळायची होती. कारण वाह चे शरणार्थी शिबिर म्हणजे दंग्यातून वाचलेल्या हिंदू – शिखांचे शिबिर. त्यांच्या कहाण्या फार हृदयद्रावक होत्या. त्या सर्वांना आपापले घरदार सोडून, पळून ह्या शिबिराचा आश्रय घ्यावा लागला होता. अनेकांचे कुटुंबीय मारल्या गेले होते. अनेकांच्या बहि‍णींवर, मुलींवर, बायकांवर त्यांच्या डोळ्यादेखत बलात्कार झालेले पहावे लागले होते. त्यामुळे साहजिकच कॉंग्रेस आणि गांधीं बद्दल ची चीड त्या शिबिरार्थींच्या वागण्यात / बोलण्यात जाणवत होती. आणि म्हणूनच गांधीजींना अश्या शिबिरात नेणे, त्यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना धोक्याचे वाटत होते.
 
 
मात्र गांधीजींचा ठाम निर्धार होता, वाह च्या शरणार्थी शिबिराला भेट देईनच..! त्यामुळे वाह ला जायचे नक्की झाले. दुपारी हा काफिला वाह च्या शरणार्थी शिबिरात पोहोचला.
 
 
हे शिबिर म्हणजे रक्तरंजित इतिहासाचा जिवंत पुरावा होता. गेल्या महिन्यात तर येथे शरणार्थींची संख्या पंधरा हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र जसजसा १५ ऑगस्ट हा दिनांक जवळ येऊ लागला, तसतशी शिबिरार्थींची संख्या कमी होऊ लागली. हा सर्व भाग पाकिस्तानात जाणार हे जणू घोषित झालेलं होतं. आणि ‘पाकिस्तानात आपण सुरक्षित राहणार नाही’ असं हिंदू – शीख निर्वासितांना वाटत होतं. म्हणून जमेल तसे, हे शरणार्थी पूर्व पंजाबात जायच्या प्रयत्नात होते. आज शिबिरात साधारण ९ हजार शरणार्थी होते. यात अधिकांश पुरुष होते. काही प्रौढ आणि म्हाताऱ्या बायका होत्या. पण तरुण मुली जवळ जवळ नव्हत्याच. शिबिरात येतानाच त्यांचं अपहरण झालं होतं किंवा त्यांच्यावर बलात्कार करून त्यांना मारून टाकलेलं होतं.
 
 
हे शरणार्थी शिबिर नसून ‘यातना शिबिर’ वाटत होतं. पाऊस येऊन गेलेला होता. खाली चिखल होता. अनेक टेंट गळत होते. ठिकठिकाणी राशन-पाणी घेण्यासाठी प्रचंड रांगा लागलेल्या होत्या.
 
 
गांधीजी तिथे पोहोचल्यानंतर काही शिबिरार्थींना, थोडा फार चिखल नसलेल्या भागात गोळा केलं गेलं. साधारण दीड - दोन हजार शिबिरार्थी असावेत. मात्र तेथेही घाण येतच होती. गांधीजींनी आधी त्यांची प्रार्थना म्हटली आणि मग शिबिरार्थ्यांबरोबर चा संवाद सुरु झाला. शिबिरार्थींतर्फे दोन शीख उभे राहिले. त्यांचं म्हणणं होतं, ‘हे शिबिर पूर्व पंजाबात स्थलांतरित करा. पंधरा ऑगस्ट नंतर येथे पाकिस्तान चे, अर्थात मुस्लिम लीग चे शासन येईल. ब्रिटीश काळातच त्यांनी हिंदू – शिखांची इतकी कत्तल केलेली आहे, तर त्यांचं राज्य आल्यावर काय होईल, याची कल्पनाच करवत नाही..!
 
 
यावर गांधीजींनी स्मित केलं. अन ते संथ आवाजात बोलू लागले, ‘तुम्हाला पंधरा ऑगस्ट नंतरच्या दंगलींची जी भीती वाटतेय, ती मला वाटत नाही. मुसलमानांना पाकिस्तान हवं होतं. ते त्यांना मिळालं. आता ते काही करतील असं मला मुळीच वाटत नाही. शिवाय जिन्ना साहेबांनी आणि मुस्लिम लीग च्या पुढाऱ्यांनी शांती आणि सलोख्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी आश्वस्त केलंय कि पाकिस्तानात हिंदू आणि शीख हे सुरक्षित राहतील. तेंव्हा त्यांच्या आश्वासनाचा आदर करा. हे शरणार्थी शिबिर पूर्व पंजाबात नेण्याचं काही एक कारण नाही. तुम्ही येथे सुरक्षित आहात. मनातील भीती काढून टाका. जर मी नोवाखालीला जायचं मान्य केलं नसतं, तर पंधरा ऑगस्ट ला मी तुमच्या बरोबरच राहिलो असतो.” (Mahatma, Volume 8, Life of Mohandas K. Gandhi – D. G. Tendulkar)
 
 
गांधीजी हे सांगत असताना शिबिरार्थींच्या चेहऱ्यावरचा राग, चीड, हताशा त्यांना दिसत होती. पण ह्या शिबिरार्थींना मुसलमानांची भीती का वाटावी, हे त्यांना उमजतच नव्हतं. तरीही त्यांनी आपल्या प्रतिनिधीच्या रुपात डॉ. सुशीला नायर यांना तेथेच रहायला सांगितलं.
 
____ ____ ____ ____
 
लाहोर ची दुपार...
 

लाहोर. प्रभू रामचंद्रांचा पुत्र ‘लव’ याने स्थापन केलेलं शहर. पंजाबी संस्कृतीचं माहेरघर. शालीमार उद्यानाचं शहर. नूरजहाँ आणि जहांगीर च्या मकबऱ्या चं शहर. महाराजा रणजितसिंगाचं शहर, अनेक मंदिरांचं, गुरुद्वारांचं आणि मशि‍दींचं शहर. कामिनी कौशल चं शहर. पंजाबी रंगा-ढंगाचं वसलेलं, उत्साहाने सळसळणारं शहर.
 

पण आज मात्र लाहोर ची दुपार संथ होती. काहीशी उदासवाणी पण. शहरातल्या सर्व हिंदू – शीख व्यापाऱ्यांचा आज बंद होता. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ हा आजचा बंद पुकारलेला होता. यापूर्वी हिंदू – शिखांनी सर्व पातळीवर आपलं म्हणणं मांडलं होतं. तीन – साडेतीन महिन्यांपूर्वी, अर्थात मार्च – एप्रिल ला लाहोर, रावलपिंडी आणि आजूबाजूच्या भागांवर झालेल्या मुस्लिम आक्रमणाची जखम ताजी होती. आणि आक्रमणाचं हे लोण काही कमी होण्याची चिन्ह दिसत नव्हती.
 
 
 
 

मुस्लिम नेशनल गार्ड ची आक्रामकता वाढत होती. त्यांच्या धमकावण्या वाढत होत्या. म्हणायला या ‘नेशनल मुस्लिम गार्ड’ चा मुस्लिम लीग शी संबंध नव्हता. पण फक्त म्हणायलाच. मुस्लिम नेशनल गार्ड हे मुस्लिम लीग चाच झेंडा वापरत होते. मुळात नेशनल गार्ड ही मुस्लिम लीग चीच छुपी पण आक्रमक संघटना होती. हिंदू – शीख व्यापाऱ्यांना पळवून लावायचं आणि त्यांच्या तरण्याताठ्या पोरी पळवून आणायच्या हेच यांचं मुख्य काम होतं.
 

मंगळवार, पाच ऑगस्ट च्या ह्या उदासवाण्या दुपारी, लाहोर च्या गव्हर्नर हाऊस मधे मात्र सुस्ती नव्हती. गव्हर्नर सर इवॉन जेनकिन्स हा अस्वस्थपणे आपल्या कार्यालयात काम करत होता. जेनकिन्स हा तसा पूर्णपणे पंजाबी रंगात रंगलेला ब्रिटीश नोकरशाह होता. पंजाब बद्दल त्याची माहिती अचूक आणि परिपूर्ण होती. आणि म्हणूनच त्याला मनापासून फाळणी नको होती. आज दिवसभरात लाहोरात घडणाऱ्या घडामोडींवर तो लक्ष ठेऊन होता. शिखांच्या हरताळ पुकारण्या मुळे कुठे दंगे उसळतात कि काय, याची त्याला चिंता होती. मुस्लिम नेशनल गार्ड तर्फे दंगे भडकावण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती त्याच्याजवळ पोहोचलेली होती. त्यातूनच ‘उद्या गांधीजींची लाहोर ला धावती भेट आहे’, ही सूचना त्याला मिळाली होती. त्यामुळे तो अधिकच चिंतेत होता.
 

लाहोरातील गोमती बझार, किशन नगर, संत नगर, राम गली, राजगढ ह्या भागांमधे कडकडीत बंद होता. जवळपास सर्व दुकानं बंद होती. रस्त्यांवर रहदारीही तुरळक दिसत होती. हा सर्व भाग हिंदू – शीख बहुल होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचं जबरदस्त जाळं या भागात होतं. रोज सायंकाळी मैदानात भरणाऱ्या प्रत्येक शाखेवर दोनशे – तीनशे हिंदू – शीख तरुण हजर असायचे. मार्च पूर्वी लाहोरातल्या संघ शाखांची संख्या अडीचशे च्या वर पोहोचली होती. मात्र मार्च – एप्रिल च्या दंगलीनंतर अनेक हिंदू विस्थापित झाले अन त्या त्त्या भागातल्या शाखा आता बंद पडल्या होत्या. लाहोरातल्या तीन लाख हिंदू – शिखांपैकी सुमारे लाखभर हिंदू – शिखांनी आतापर्यंत लाहोर सोडलं होतं.
 
____ ____ ____ ____
 
 

 
 
 
कराची : 
दंगल, जाळपोळ आणि अशांततेच्या ह्या वातावरणात, लाहोर पासून बाराशे किलोमीटर दूर, सिंध प्रांतात, कराचीला मात्र एक वेगळीच गडबड उडालेली होती. फारशी गर्दी नसणाऱ्या कराची विमानतळावर माणसंच माणसं दिसत होती. बरोबर १२.५५ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, श्री गोळवलकर गुरुजी हे टाटा एयर सर्व्हिसेस च्या विमानानं मुंबई हून कराचीला येणार होते. मुंबई च्या जुहू विमानतळावरून हे विमान बरोबर ८ वाजता उडालं होतं. मधे अहमदाबाद चा थांबा घेऊन आता ते कराचीला पोहोचण्याच्या बेतात होतं. विमानात गुरुजींबरोबर डॉ. आबाजी थत्ते ही होते.
 
 
या अशांत वातावरणात, गुरुजींच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था स्वयंसेवकांनी ठेवली होती. मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक तिथे आले होते. कराची महानगरातील भाग कार्यवाह लाल कृष्ण अडवाणी हे देखील त्या स्वयंसेवकांमध्ये होते. गुरुजींच्या मोटारी बरोबर, मोटार सायकल वरून जाणाऱ्या स्वयंसेवकांचा एक वेगळाच ताफा होता. कराचीचं विमानतळ तसं फार मोठं नव्हतं. त्यामुळे ही स्वयंसेवकांची संख्या बरीच मोठी वाटत होती.
 
 
बरोबर एक वाजता गुरुजी आणि आबाजी विमानातून उतरले. विमानतळावर उभ्या असलेल्या स्वयंसेवकांमधे कसलीही घाई, गडबड नव्हती, कि गोंधळ ही नव्हता. सारं कसं शिस्तीत चाललं होतं. तीन स्वयंसेवक बुरखे घालून आले होते. ते, त्यातील भोकांमधून आपल्या चौकस डोळ्यांनी सारा परिसर न्याहाळत होते.
 
 
गुरुजी, आबाजींबरोबर विमानतळाच्या इमारतीत आले. एकच दमदार घोषणा झाली – ‘भारत माता की – जय..’
गुरुजींना घेऊन, संघ कार्यकर्त्यांचा एक भला मोठा काफिला शहराकडे निघाला. आजच संध्याकाळी पूर्ण गणवेशात संचालन निघणार होतं आणि नंतर तिथल्या मुख्य चौकात गुरुजीची जाहीर सभा ठरली होती.
 
 
फक्त नऊ / दहा दिवसात जो भाग पाकिस्तानात शामिल होणार आहे, आणि सध्या जो पाकिस्तानची तात्पुरती राजधानी म्हणवला जातो, अश्या भागात हिंदूंनी संचलन काढणं आणि जाहीर सभा घेणं हे अतीव साहसाचं होतं. पण संघांनी हे साहस दाखवलं होतं. दंगेखोर मुसलमानांना एक कडक संदेश जावा आणि हिंदूंमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, म्हणून संघाने हा पुरुषार्थ दाखवला होता.
 
बरोबर पाच वाजता संचलन निघालं. ह्या संचलनाच्या सुरक्षितते साठी स्वयंसेवकांनी विशेष व्यवस्था केलेली होती. दहा हजार स्वयंसेवकांचं ते संचलन इतकं जबरदस्त आणि प्रभावी होतं की कोणाचीही अश्या संचलनावर हल्ला करण्याची हिंमतच झाली नसती.
____ ____ ____ ____
 
भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर होत असलेल्या दंग्यांपासून, अशांततेपासून आणि शरणार्थी शिबिरांपासून दूर, दिल्लीत ‘१७, यॉर्क’ रोड या नेहरूंच्या निवासस्थानी, स्वतंत्र भारताचे भावी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू, त्यांच्या नवीन मंत्रिमंडळ स्थापण्या संबंधी आणि नवीन सरकारच्या कामकाजासंबंधी चिंता करण्यातच व्यस्त होते.
 
मंगळवार, पाच ऑगस्ट ची दुपार आता संध्याकाळ च्या दिशेने वाटचाल करू लागली होती. नेहरू, त्यांना आलेल्या पत्रांना उत्तर डिक्टेट करत होते.
 
१ ऑगस्ट ला लॉर्ड माउंटबेटन नी पाठवलेलं पत्र समोर होतं. भारत सरकारचे ऑडीटर जनरल सर बर्टी स्टेग यांना स्वतंत्र भारतात मुदतवाढ देणार का ? हे विचारणा करणारं ते पत्र होतं. त्यात सर स्टेग हे मुदतवाढ मिळाली तर काम करण्यास उत्सुक आहेत असं ही लिहिलं होतं.
 
या पत्राला समोर ठेऊन नेहरू उत्तर सांगू लागले, “सर बर्टी स्टेग हे अर्थ मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार असून भारत सरकारचे ऑडीटर जनरल ही आहेत. तुम्हाला कदाचित माहित असेलच, की आमचे धोरण हे त्या सर्व अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचे आहे, ज्यांना स्वतंत्र भारतात काम करण्याची इच्छा आहे. अर्थात, जिथे त्या पदासाठी योग्य भारतीय मिळतील, तिथे आम्ही भारतीयच नेमणार. मात्र सध्या तरी, ज्या अधिकाऱ्यांना पुढे ही काम करण्याची इच्छा आहे, त्यांना आम्ही त्याच पदावर कायम ठेवणार हे निश्चित.’
 
‘अर्थातच सर बर्टी स्टेग हे (स्वतंत्र भारताचे) ऑडीटर जनरल म्हणून पुढेही काम बघतील.’
 
पुढील पत्र ही गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबेटन यांचंच होतं. पण जरासं आधीचं. दिनांक १४ जुलै चं. या पत्रात लॉर्ड साहेबांनी दोन गोष्टी मांडल्या होत्या. पहिली म्हणजे, त्यांच्या स्टाफ चं पुढे काय करायचं. आणि दुसरी म्हणजे स्वतंत्र भारतात त्यांना व्हॉइसरॉय हाऊस सोडून एखाद्या लहानश्या घरात रहायला आवडेल.
 
उत्तर देण्याआधी नेहरू काहीसे विचारमग्न झाले. अन मग सावकाश, ते आपल्या सचिवाला डिक्टेशन देऊ लागले,
 
“प्रिय लॉर्ड माउंटबेटन,
 
तुमच्या १४ जुलै च्या पत्रात तुम्ही प्रामुख्याने दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. तुमच्या स्टाफ संबंधी आणि तुमच्या भविष्याच्या घरा संबंधी.
 
यातील पहिल्या मुद्द्या संबंधात तुम्हालाच निर्णय घ्यायचाय. जो ही सेवक वर्ग तुम्हाला आवश्यक वाटेल, तो स्वतंत्र भारत शासनाच्या वतीनं तुमच्या कडेच राहील. मला आनंद वाटतो कि लॉर्ड इस्मे तुमच्या सोबतच राहतील.
 
तुमचा, तुलनेनं लहान घरात स्थलांतरित होण्याचा विचार स्तुत्य आहे. मात्र सध्याच्या घडीला तुम्हाला शोभेल असं घर शोधणं कठीण आहे. आणि तसाही त्या ‘व्हॉइसरॉय हाऊस’ चा लगेचच काहीही उपयोग होणार नाहीये. आणि म्हणूनच आपण उभयतांनी व्हॉइसरॉय हाऊस मधेच राहावे ही विनंती..!”
____ ____ ____ ____
 
कराचीच्या मुख्य चौका जवळील मोकळ्या जागेत जाहीर सभेची सारी तयारी झालेली होती. छानसा लहानसा मंच. मंचावर तीन खुर्च्या. समोर लहानसा टेबल आणि त्यावर तांब्या – भांडं. आणि समोर एक उभा माईक्रोफोन. बस. इतकीच तयारी होती त्या सभेची.
 
समोर स्वयंसेवक शिस्तीत बसले होते. नागरिकांसाठी दोन्ही बाजूला बसायची जागा होती. महिलांसाठी काही जागा मोकळी ठेवली होती. बरोबर ७ वाजता सभा सुरु झाली. गुरुजींच्या उजव्या हाताला, आजच्या सभेचे अध्यक्ष साधू टी. एल. वासवानी बसले होते. हे साधू वासवानी म्हणजे सिंधी समाजाचे गुरु. समाजात त्यांना प्रचंड मान होता. आणि गुरुजींच्या डाव्या हाताला सिंध प्रांताचे संघचालक बसले होते.
 
श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती...
 
आधी साधू वासवानींनी प्रास्ताविक भाषण केलं. ते म्हणाले, “इतिहासात निश्चितच या क्षणाची, या काळाची नोंद होईल, जेंव्हा आम्हा सिंधी हिंदूंच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा पहाडासारखा उभा राहिला आहे.”
आणि नंतर गुरुजींचे मुख्य भाषण. संथ पण धीरगंभीर, दमदार आवाज. स्पष्ट उच्चार. सिंध प्रांतातल्या हिंदू बांधवांबद्दल खरीखुरी तळमळ.
“आपल्या मातृभूमीवर एक फार मोठी विपत्ती आलेली आहे. मातृभूमीचं विभाजन हे ब्रिटीशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ ह्या नीतीचा परिणाम आहे. मुस्लिम लीग ने जे पाकिस्तान मिळवलंय ते हिंसेचं तांडव करून मिळवलंय. दुर्दैवानं कॉंग्रेस ने लीग पुढे शरणागती पत्करली. मुसलमानांना चुकीच्या दिशेने वळवल्या गेलं, की ‘ते इस्लाम धर्माचं पालन करतात म्हणून ते वेगळे राष्ट्र आहेत’. त्यांचे रिती-रिवाज, त्यांची संस्कृती ही भारतीय आहे. अरेबिक नाही.”
“ही कल्पनाच कठीण वाटते कि आपली खंडित मातृभूमी सिंधू नदी शिवाय असेल. सप्त सिंधुंचा हा प्रदेश आहे. राजा दाहीर च्या तेजस्वी शौर्याने नटलेला हा प्रदेश आहे. देवी हिंगलाज च्या अस्तित्वानं पुनीत झालेला हा आपला प्रदेश आपल्याला सोडवा लागतोय. या संकटाच्या काळात सर्व हिंदूंनी एक दुसऱ्याची काळजी घ्यायची आहे. संकटाचे हे हि दिवस जातील हे नक्की..!”
गुरुजींच्या ह्या भाषणाने कराची मधली ही ऐतिहासिक सभा थरारून उठली.
 
भाषणानंतर कराचीतल्या काही प्रमुख मंडळींबरोबर चहापानाचा कार्यक्रम होता. कराचीतले अनेक हिंदू पुढारी तर गुरुजींच्या परिचयाचेच होते. दरवर्षी च्या प्रवासात गुरुजी त्यांच्याशी आवर्जून भेटायचे. रंगनाथानंद, डॉ. चोइथराम, प्रोफे. घनश्याम, प्रोफे. मलकानी, लालजी महरोत्रा, शिवरतन मोहता, भाई प्रताप, निश्चलदास वझीरानी, डॉ. हेमनदास वाधवानी, मुखी गोबिन्द्रम वगैरे. यातील अधिकांश मंडळी बैठकीत उपस्थित होती.
 
‘सिंध ऑबझर्वर’ या दैनिकाचे संपादक आणि कराचीतले एक मान्यवर व्यक्तित्व के. पुनैय्या पण ह्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी गुरुजींना प्रश्न केला, “आपण खुशीने हे विभाजन स्वीकारण्यात वाईट काय आहे..? एखादा सडलेला पाय कापला तर काय चूक आहे..? माणूस तरी जिवंत राहतोच ना...?”
 
गुरुजींचं ताबडतोप उत्तर आलं, “काय झालं जर माणसाचं नाक कापल्या गेलं तर..? तो तरीही जिवंत राहतोच की..!”
सिंध प्रांतातल्या त्या हिंदू बांधवांकडे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या. अंधकारमय भविष्य पाहत असलेली ही माणसं, अक्षरशः पिडल्या गेलेली होती. यांना गुरुजींबरोबर बरंच काही शेअर करायचं होतं. पण वेळ थोडा होता. अनेक कामं करायची होती. गुरुजींना त्या भागातल्या प्रचारक आणि कार्यवाहांची बैठक घ्यायची होती. व्यवस्था लावायच्या होत्या.
 
पाच ऑगस्ट च्या रात्री, राजधानी दिल्ली शांत झोपली असताना पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि बंगाल प्रांतात वणवा भडकलेलाच होता. आणि कराचीच्या मुक्कामात, एक तपस्वी, विभाजनाचं हे भेसूर चित्र बघत, पुढील व्यवस्थेची जुळणी करत होता...!
 
 
- प्रशांत पोळ
 
 
 
 
मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : ४ ऑगस्ट १९४७
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@