‘योगमय’ कझाकिस्तान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2018   
Total Views |

 

 

 
 

आपल्या राज्यातील संदीप जाधव या योगगुरूने कझाकिस्तानमध्ये सुरू केलेल्या प्रज्ञा योगधामच्या माध्यमातून तेथे आजमितीस मोठ्या प्रमाणावर योगसाधनेचा विकास होण्यास मदत झाली आहे. नुकतेच तेथे योगविद्याधामचे विश्वास मंडलिक यांच्या योगविषयक वर्गाला लाभलेली उपस्थिती ही तेथील योगसाधनेच्या लोकप्रियतेची साक्ष देते.

 
 
योग म्हणजे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा एक अभिजात आविष्कार. मानवी शारीरिक आरोग्य सुदृढ, सशक्त राहावे, यासाठी योगसाधना ही जीवनशैली असावी याकडे आजमितीस जग कटाक्षाने पाहात आहे. योगाच्या प्रसार आणि प्रचारासाठी भारताच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेकविध कार्यक्रम नेहमीच आखले जातात. संयुक्त राष्ट्र संघटनेने ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याची सुरू केलेली प्रथा म्हणजे भारतीय योगसाधनेचे जागतिक पटलावर असणारे अस्तित्व नमूद करणारी बाब म्हणून आपण पाहावयास हवी. योगामध्ये यज्ञ या संज्ञेचा आजमितीस वापर केला जात आहे. यज्ञामधील ‘य’ म्हणजे योग आणि ‘ज्ञ’ म्हणजे ज्ञान होय. म्हणजेच योगाद्वारे ज्ञानप्राप्तीकडे जगाचा वाढलेला कल यातून दिसून येत आहे. मध्य आशिया व पूर्व युरोपातील संधीप्रदेशावर वसलेला देश म्हणजे कझाकिस्तान होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने नवव्या क्रमांकाचा असणारा हा देश जगातील सर्वात मोठा भूवेष्टित देश आहे. याचे विस्तारलेले क्षेत्रफळ पश्चिम युरोपपेक्षाही मोठे आहे. रशिया, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, चीन या देशांना व कॅस्पियन समुद्राला लागून याच्या सीमा आहेत. म्हणजे बारकाईने विचार केल्यास याही देशाच्या भोवती असेच देश आहेत, जे या देशाच्या सार्वभौमत्वावर कब्जा करण्याकामी आसुसलेले आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी आणि डोक्यावर टांगती तलवार ठेवत आपल्याला आपला विकास साधावयाचा आहे, हे येथील नागरिकांनी जाणले आहे. त्यामुळेच बर्फाच्छादित असणारा हा देश सध्या योगमय झालेला आहे. बव्हंशी इस्लामधर्मीय असणाऱ्या या देशातील नागरिकांना योगाचे वावडे नाही, हे विशेष.
 

आर्थिकदृष्ट्या प्रगत असणाऱ्या या देशातील नागरिकांची मानसिकता ही श्रमपरिहार आणि नाविन्याच्या प्रारंभासाठी शुद्धविचार यासाठी योग आवश्यक आहे, अशाच धारणेची असल्याचे जाणवते. भारतातील नव्हे, आपल्या राज्यातील संदीप जाधव या योगगुरूने कझाकिस्तानमध्ये सुरू केलेल्या प्रज्ञा योगधामच्या माध्यमातून तेथे आजमितीस मोठ्या प्रमाणावर योगसाधनेचा विकास होण्यास मदत झाली आहे. नुकतेच तेथे योगविद्याधामचे विश्वास मंडलिक यांच्या योगविषयक वर्गाला लाभलेली उपस्थिती ही तेथील योगसाधनेच्या लोकप्रियतेची साक्ष देते. कझाकमधील नागरिकांच्या मते, मोठे ध्येय साध्य करण्यासाठी योग हा महत्त्वाचा आहे. तसेच प्राणायाम केल्यामुळे आम्हाला आमच्या अंत:करणाचा ठाव घेण्याची संधी मिळते आणि आमच्या राष्ट्रपुरुषांच्या कार्याचे व त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्याची अद्वितीय अनुभूती आम्हाला प्राप्त होते, असे येथील नागरिक मोठ्या अभिमानाने सांगतात. कोणत्याही क्षणी तुम्ही तुमचे मन, शरीर आणि आत्मा यांची संगत साधू शकत असाल तर तुमचे कार्य हे अभूतपूर्व असतेच आणि ते निश्चितच राष्ट्राच्या उद्धारात मोलाची भूमिका बजावते, अशी धारणा येथील नागरिक बाळगतात. हे सर्व योगामुळे सहजसोपे आहे, यावर कझाकींचा ठाम विश्वास आहे. कझाकमध्ये आजमितीस अनेक योगकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामार्फत होणाऱ्या योगसाधनेमुळे मद्यपान, कॉफीपान आणि धूम्रपान यात लक्षणीय घट झाल्याचे योगशिक्षक दिनारा कार्शालोव्हा यांनी ‘अस्ताना टाइम्स’शी बोलताना नुकतेच सांगितले. योग ही फॅशन नसून पॅशन आहे, असे कझाकवासीय मानतात. आजवर कझाकच्या सुमारे ८०० नागरिकांनी १९० देशांत योगाचा प्रसार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जवळपास ४०० योगप्रेमी नित्यनियमाने आस्तानाच्या ओपेरा थिएटर परिसरात योगाभ्यास करताना दिसतात.

 

कझाकिस्तानला नैसर्गिक इंधन साठ्याचे अमाप वरदान लाभले आहे. तसेच जगातील अव्वल क्रमांकाचा युरेनियम उत्पादक देश म्हणून कझाकिस्तानकडे पाहिले जाते. या सर्व बाबींचा ऊहापोह करण्याचे कारण इतकेच की, अत्यंत प्रगत आणि लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या या देशात अत्याधुनिक सामग्रींनी सज्ज असणाऱ्या जीमची कमतरता नाही. मात्र, केवळ शारीरिक बलस्थान वाढविण्याकडे येथील नागरिकांचा कल दिसत नाही तर, योगाच्या माध्यमातून मानसिक प्रगल्भता साधण्याकामी येथील नागरिक जागरूक असल्याचे दिसते.

 

भारतीय मूळ असणारी योगसाधना ही भारताच्या भूमीवर लोकप्रिय ठरू नये, तिला आवश्यक तितकी समाजमान्यता मिळू नये, ही बाब खेदाचीच म्हटली पाहिजे. सर्वधर्मसमभाव म्हणणारे आपण योगसाधनेत धर्म का आणतो? हा सवाल सर्व भारतीयांच्या मनाला भेडसावणे आवश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@