एकीचे समाजकारण हवे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2018   
Total Views |

 

 

‘‘आरक्षणासाठी जीव देणारे जीव घेतील, आम्ही न्याय हातात घेतला तर सरकारच जबाबदार असेल. जी काही परिस्थिती निर्माण होईल, त्याला सामोरे जाण्याची मानसिकता ठेवा.” सातारच्या उदयनराजे भोसलेंचे उद्गार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सांगणारे म्हणून उदयनराजे भोसले यांचा मानसन्मान करणे गरजेचेच आहे, पण जिथे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आघात होतो, तिथे छत्रपतींचे वंशज जरी असले तरी बेहत्तर. त्यावर विचारविमर्श होणे गरजेचे आहे. जातीपातीच्या भिंती तोडीत हिंदू समाजातल्या गटातटाला एकत्रित करत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी वाहिलेली शपथ पूर्ण केली. रयतेच्या सुतळीच्या तोड्यालाही स्पर्श न करणारा, अवघ्या व्यसनांपासून, मोहापासून दूर राहणारा छत्रपती शिवकल्याण राजा आणि त्या राजाच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेला हा महाराष्ट्र. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला कोणत्याही जातीपातीच्या व्यक्तीचा छत्रपतींचे नाव घेतले की ऊर अभिमानाने भरून येतो. त्याच छत्रपतींचा केवळ वारस आहे म्हणून समाजासमोर दबदबा असणाऱ्या उदयनराजेंचे आजचे विधान केवळ आणि केवळ दुर्दैवी आणि समस्त महाराष्ट्र तसेच मराठा समाजाला कमी लेखणारे आहे. मराठा समाजातील काही व्यक्ती जीव देत आहेत, ही काही अभिमानास्पद घटना नाही. पण उदयनराजे यांनी या घटनेबद्दल बोलताना जाहीररीत्या म्हटले की जीव देणारे जीवही घेतील. मराठा समाजाचे समन्वयक मोठ्या आशेने उदयनराजेंकडे गेले असतील पण त्यांना ऐेकावे लागले की जीव देणारे जीवही घेतील. ज्याच्याकडून समाजाला दिशा मिळण्याची आशा असते, त्याने समाजाला असा सूचक सल्ला देणे योग्य आहे का? दुसरे असे की, उदयनराजे म्हणाले, ‘‘आम्ही न्याय हातात घेतला तर?” उदयनराजे, छत्रपती शिवबांच्या काळातही न्यायव्यवस्थेवर न्यायच राज्य करायचे. आता तर देश स्वतंत्र आहे आणि राज्यघटनेने चालणारी कायदा-सुव्यवस्था आहे. सरंजामशाही नाही. त्यामुळे न्याय हातात घेण्याची गोष्ट करणे ही अराजकताच आहे! समाजाला शांतता, सलोखा आणि सत्य प्रगतीचा मार्ग दाखविणार, अशी अपेक्षा आहे. कसेही असलात तरी छत्रपतींचे वंशज आहात. बेकीचे राजकारण नाही तर एकीचे समाजकारण करा.
 
  
ये देश है वीर जवानों का
 

इथे महाराष्ट्रात हे हवे, ते द्या म्हणत वेगवेगळ्या पद्धतीने आत्महत्या करणाऱ्यांचे पेव फुटले असताना तिथे काश्मीरमध्ये खूप काही आशावादी घडले आहे. जे एक भारतीय म्हणून आणि त्यातही माणूस म्हणून खूप महत्त्वाचे आहे. तो लष्कराचा जवान होता, देशाचे, समाजाचे रक्षण करत होता, त्या आपल्या यार-दोस्ताला अतिरेक्यांनी क्रूरपणे ठार मारले. त्याचा दोष काय तर तो खुदाच्या नेक मार्गावर चालत होता. तो देशासाठी आणि समाजासाठी जगत होता. औरंगजेब हे त्या शहीद जवानाचे नाव. शहीद औरगंजेब हे मरणोत्तरही समाजभूषण आणि राष्ट्रभूषणच आहेत. मुस्लीम असूनही भारतीय लष्करात सामील आहे म्हणून अतिरेक्यांनी ‘औरंगजेबया युवा जवानाचे अपहरण केले आणि त्यांचा निर्घृण खून केला. संताप, दुःख आणि शब्दातीत भावनांचे मोहोळ उठले होते, पण औरंगजेब या जवानाच्या मृत्यूनंतर सगळे संपले नाही. आपल्या मुलाच्या मृत्यूचा सूड घेईन, असे औरंगजेब यांच्या पित्याने जाहीर केले होते. त्यातच शहीद औरंगजेबच्या ५० मित्रांनी ठरवले आहे की, ते सैन्यात आणि पोलीसदलात भरती होतील आणि शहीद औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेतील. हे ५० मित्र, हे ५० तरुण सुशिक्षित आणि संपन्न आहेत, काही तर सौदी अरेबियात चांगली नोकरी करत आहेत. आपापली नोकरी आणि जीवनात निवडलेले चांगले पर्याय सोडून हे ५० तरुण शहीद औरंगजेबच्या मृत्यूला न्याय देण्यासाठी भारतीय लष्करात भरती होणार आहेत. या ५० दोस्तांच्या दोस्तीला, धैर्याला आणि संवेदनशीलतेलाही सलाम! या ५० युवकांचे कौतुक यासाठीही की, त्यांनी आमचा मित्र मेला, असे रडगाणे गात त्याला न्याय द्या, त्याचे मारेकरी शोधा म्हणत रस्त्यावर उतरत सरकारच्या विरोधात जाळपोळ, सार्वजनिक खासगी मालमत्तेचे नुकसान, निष्पापांवर भ्याड हल्ले केले नाहीत किंवा मारेकरी सापडत नाहीत याच्या निषेधार्थ कुणीही भ्याडपणे आत्महत्या केली नाही, तर या वीर मित्रांनी आपल्या शहीद मित्रासाठी मरणे नव्हे तर लढणे पसंत केले. मैत्री हे दोनच शब्द.. पण मैत्रीच्या बंधाला माणसाच्या जगण्याचे परिमाण देऊन, ध्येय देऊन या ५० जणांनी समाजासमोर, देशासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांनी सिद्ध केले आहे, ये देश है वीर जवानों का अलबेलों का..

@@AUTHORINFO_V1@@