विमान भारी व्हतं भौ, पन प्रवासले मजा नई!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
महाराष्ट्रातील जळगावात आयुष्य काढलेले तात्या व मुंबईत राहून नवी स्वप्न पाहणाऱ्या विलास या दोन आजोबा नातू ची कथा म्हणजे पुष्पक विमान. या चित्रपटाचा ट्रेलर कथेचा बराचसा भाग आपल्याला सांगून जातो. चकचकीत ट्रेलर, 'व्हीएफएफ्स'चा वापर सुबोध, मोहन जोशी आणि झी स्टुडिओ यांसारखी मोठी नावं या चित्रपटाशी जोडली गेल्याने हे विमान मनोरंजनात्मक दृष्ट्या आपल्याला थेट ढगात नेवून पोहचवणार अशी आशा वाटली होती खरी पण सलग दुसऱ्यांदा (तुला कळणार नाही) सुबोधने आपली निराशा केली आहे (अर्थात तुला कळणार नाही पेक्षा हा चित्रपट कैक पटीने चांगला आहे, पण तो सुबोधच्या नेहमीच्या स्टाईलने आपले मनोरंजन करू शकत नाही.) अगदी अस्सल जळगावच्या भाषेत सांगायचं झालं तर ''विमान भारी व्हतं भौ, पन प्रवासले मजा नई!''
 

Watch Video Review 
 
अगदी साधी गोष्ट आहे या चित्रपटाची. तात्यांनी आपलं उभं आयुष्य जळगावात व्यतीत केलं आहे. तुकाराम महाराजांचे ते निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या अभंगांचे ते अनेकदा निरूपणही करत असतात. पण त्यांची खंत एकच असते की त्यांचा नातू विलास त्यांच्या सोबत न राहता मुंबईला स्वतःचा गॅरेजचा व्यवसाय करत असतो. मग कसं तरी विलास तात्यांना पटवतो आणि मुंबईला त्याच्या घरी घेऊन येतो. कालांतराने तात्यांना एकदा विमान खूपच जवळून पाहण्याचा योग्य येतो व विलासच्या सांगण्यानुसार ते त्याला 'पुष्पक विमान'च समजून बसतात. इथपर्यंतचा भाग हा चित्रपटाचा पूर्वार्ध आहे. आता या पूर्वार्धात असं झालय की मुख्य व्यक्तिरेखांचे इंट्रोडक्शन व जळगाव आणि मुंबईची खासियत या पलीकडे चित्रपट सरकतच नाही. त्यातही तीन गाणी आणि असे काही प्रसंग आहेत की जे आपण याआधी कोणत्या ना कोणत्या चित्रपटात बघितले होते.
 
खरा चित्रपट सुरु होतो तो उत्तरार्धात. तात्यांचा पुष्पक विमानात बसण्याचा अट्टाहास, त्यांना तुकोबांनी दिलेला दृष्टांत आणि विलास व त्याच्या बायकोची विमान प्रवास घडवून आणण्यासाठी उडालेली तारांबळ किंवा तयारी या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. पण इथेही गडबड अशी झाली आहे की कथेला पुढे नेण्याचे काम बऱ्यापैकी गाण्यांच्या माध्यमातूनच करण्यात आले आहे. त्यातल्या दोन गाण्यांमध्येतर उगाच आजूबाजूच्या लोकांना नाचविण्याचे काम केले असल्याचे दिसून येते. यापेक्षा पथकथा आणखी थोडी साचेबद्ध लिहून गाणी कमी केली असती तर मजा आली असती. मुळात या कथेचा जीव तसा छोटाच होता. १३३ मिनिटं एवढी त्याची 'स्ट्रेंथ' नव्हती. ९० ते १०० मिनिटांमध्ये हा चित्रपट बसवला असता तर तो अधिक प्रभावी झाला असता.
 
असो, पण जे साकारलाय ते देखील खूप काही वाईट आहे अशातली गोष्ट नाही. नातू आणि आजोबा यांच्या नात्यावर चांगल्या प्रकारे भाष्य करण्याचा व त्याला धार्मिक जोड देण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. मोहन जोशी यांचा अभिनय ही या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू. मला तर त्यांचा प्रत्येक सीन खूपच भावून गेला. त्यांचा सहज वावर आणि हावभावाचे कौशल्य खूपच कमालीचे जमून आले आहे. सुबोधनी देखील चांगला अभिनय केलाय. पण त्याच्याकडून खूप काही 'आउटस्टँडिंग' वैगेरे प्रकारचं काहीतरी यातून बघायला मिळेल या आशेनी गेलात तर थोडी निराशा होऊ शकते. गौरी किरणने पदार्पणात चांगली बॅटिंग केली आहे पण तिला अभिनय सुधारणेस आणखी बराच वाव आहे. बाकी सोबतीला भरपूर जंत्री आहे, ज्यानी त्यानी आपल्यापरीने योग्य काम केलं आहे.
 
वैभव चिंचाळकरचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच अटेम्प्ट. त्याची मालिकांवर अधिक कमांड असल्याने हा चित्रपट बघताना काही वेळा मालिका पहिल्याच 'फिल' येतो. दिग्दर्शक म्हणून वैभवने हा पहिला प्रयत्न चांगला निभावलाय व त्यात अजूनही उत्तम दिग्दर्शकाची कौशल्य दिसायला हवी होती. उदाहरण देऊनच बोलायचं झाल्यास चित्रपटातील काही प्रसंग, गाणी प्रकर्षाने टाळायला पाहिजे होती. तात्या शौचालयाला जातात तेव्हा लाला लोकांना दुबईची गोष्ट सांगत बसतो हा प्रसंग किंवा मुंबईवरील गाणं अशी काही प्रातिनिधिक उदाहरणं देता येतील. त्याचबरोबर सुबोध खरंच एक गॅरेज चालवतो हे त्याच्या देहबोलीवरून जाणवायला हवं होत, नुसता गॅरेजमधला एक जॅकेट घालून ते दाखवण्यापेक्षा त्याचे हात एकदातरी काळे झाल्याचे दाखवले असते तर ते अधिक रिअल वाटले असते.
 
एकूणच काय तर तुकोबांचे पुष्पक विमान बघणे आपल्या नशिबी नव्हते पण सुबोध, वैभव आणि जोशींनी साकारलेले पुष्पक विमान पाहणे आपल्या अखत्यारीत आहे. आणि हे विमान एवढही वाईट नाहीये की त्यातून खाली उडी मारावीशी वाटेल पण ते इतकंही मनोरंजक नाहीये की त्यातला दोन तास दहा मिनिटांचा संपूर्ण प्रवास आनंददायी होईल. आता अखेरीस निर्णय तुमचा आहे! 
शेवटी कसंय ना तुकोबाच म्हणून गेलेत, ''जे जे होईल ते ते पहावे चित्ती असू द्यावे समाधान!'' 
आनंदाचे डोही आनंद तरंग...
 
 
@@AUTHORINFO_V1@@