पर्यटकांचे आकर्षण वेलोशी धबधबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2018
Total Views |



शहापूर : तानसा अभयारण्य, माहूली किल्ला, मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा, भातसा, मध्यवैतरणा ही धरणे, वीज निर्मीती करणारे घाटघर जलविद्युत प्रकल्प अशी वैशिष्ट्ये शहापुर तालुक्याला लाभली आहेत. सुपरिचीत असलेल्या शहापूर तालुक्याचे पौराणिक व अध्यात्मिक महत्व अधोरेखित करणारा अनमोल ठेवा म्हणजेच सहयाद्रीच्या डोंगररांगतील आजोबा पर्वत देवस्थान. त्याचबरोबर पावसाळयात पर्यटकांना भूरळ घालणारा, १०० फुटावरून कोसळणारा, फेसाळणारा पांढरा शुभ्र वेलोशी धबधबा.

 

शहापुर तालुक्यात पावसाळ्यात याच डोंगररांगा कात टाकून आपल्या अंगावर हिरवाईचा शालू नेसून, विविध रंगीबेरंग फुलांचा ताटवा खोचून अधिकच आकर्षक व नयनरम्य साज परिधान करते. पर्यटकांना भूरळ घालत आजोबा पर्वतावरील डोंगररांगा धुक्याची दुलई पांघरत पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असल्याचा अनुभव डोळखांब जवळील १०० फुटावरून कोसळणाऱ्या वेलोशी धबधब्यावर अनुभवायला मिळतो. सहयाद्रीच्या वेड्यावाकड्या डोंगररांगातून उसळी घेणारा धबधबा सुमारे १०० फुटावरून जेव्हा कोसळत असतो तेव्हा सुर्याची किरणे विखुरणाऱ्या तुषारकणांवर पडून इथे सप्तरंगी इंद्रधनुचाही श्रुंगार दृष्टोत्पत्तीस पडतो. त्यामुळेच वेलाशी धबधबा पर्यटकांसाठी आता आकर्षण ठरत आहे. या ठिकाणी शनिवार व रविवारी तर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या ठिकाणी संपूर्ण देखरेख वनविभागा मार्फत केली जात असून यात प्रामुख्याने वन व्यवस्थापन समिती या ठिकाणच्या पर्यटकांची काळजी घेत असते. पर्यटकांना मार्गदर्शन करणे, आलेल्या पर्यटकांच्या गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था पाहणे आदी कामे वनव्यवस्थापन समिती पाहते. तसेच या ठिकाणी घरगुती जेवणाचा आस्वाददेखील घेता येऊ शकतो. येथील घरांमध्ये आपण जेवणाची ऑर्डर दिल्यास चुलीवरील शहाकारी व मांसाहरी जेवण मिळते.

 

त्याचबरोबर इथे असलेलया विविधरंगी वनस्पती, निसर्गाची किमया झालेली वेगवेगळया आकाराची पाने, फुले विविध रंगी फुलपाखरे, पक्ष्यांच्या विविध प्रजाती, दुर्मिळ वनस्पतींचा ठेवाही इथे आपल्यास अनुभवयास मिळतो. शहापूरहून ३५ किमीचा प्रवास बस वा खाजगी वाहनाने करण्याची सोय असून या प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा हिरवाईने नटलेली धरणीमाता, हिरवीगार भातशेती, मध्येच खळखळणारे ओहोळ या अप्रतिम सौदर्याने मन हेलावून जाते. डोळखांब वन विभागानेही मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे संरक्षण केल्याने वृक्षराजीची विविधता इथे पहावयास मिळते. तर नजिकच असलेल्या संधन हिल या डोंगरकड्यावर साहसी गिर्यारोहण पाहण्याची संधीही सहज उपलब्ध होते. अगदी थोडा अधिक वेळ दिल्यास नजिक असलेल्या घाटघर प्रकल्पाचे अवलोकन करता येऊन इथे सहयाद्रीतील उंच कड्यांचे सौदर्य न्याहाळण्याची संधी मिळते. मुंबई, नाशिक, कल्याण ठाणे व उपनगरातील गिर्यारोहक इथे नित्यनियमाने येत असतात.

 

कसे याल

 

शहापूर पासून एसटीमहामंडळाची चोंढा बस असून खाजगी जीपनेदेखील या ठिकाणी पोहोचता येऊ शकते. वेलोशी धबधबा, वेलोशी या रस्त्यालगतच्या आदिवासी वस्तीजवळ असून इथे स्थानिक तरूण, ग्रामस्थ, मदतीसाठी सदैव सज्ज असतात.

- शिवाजी पाटील

@@AUTHORINFO_V1@@