लर्निंग डिफरंटली...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2018
Total Views |



मुलांच्या वाचन, लेखन, आकडेमोड तसेच इतर शैक्षणिक कौशल्यांचे जाणीवपूर्वक निरीक्षण करणे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे खूप आवश्यक आहे. त्यातून मुलांना त्यांच्या वेगळ्या क्षमतांशी जुळवून घेत प्रगती करणे शक्य होते.

 

आठ वर्षांच्या निखिलच्या (नाव बदलले आहे) सगळ्या विषयांच्या वह्यांनी माझे टेबल भरले होते. “आता बघा हा काय गोंधळ घातलाय गणिताच्या वहीत! वरच्या ओळीत लिहिलेला आकडा खाली उतरवताना चुकवलाय. अशा बेजबाबदार चुका करत राहिला तर कसे मिळणार मार्क? हे इंग्रजीचं अक्षर पाहिलंत ना? त्याचं त्याला तरी वाचता येतंय का नाही कुणास ठाऊक? लिहिण्याचा अत्यंत कंटाळा आहे. उत्तरं विचारली तर तोंडानी सगळं सांगेल बरं. पण तेच लिही म्हटलं की आधी टाळंटाळ करेल आणि मी अगदीच मागे लागले तर असलं अर्धवट काहीतरी लिहील. शाळेत त्याच्या शिक्षकांनीही हात टेकले आता. त्याच्या मुख्याध्यापकांनी सुचवलं तुमच्याकडे आणायला. तुम्हीच सांगा आता आम्ही काय करायचं? ही तशी सुरुवात आहे अभ्यासाची. नववी-दहावीत कसा निभाव लागणार? मला तर फार काळजी वाटते याची.” निखिलच्या आईने एका दमात तिचा त्रागा, हताशपणा व काळजी व्यक्त केली. सुदैवाने निखिल बाहेर स्वागत कक्षात बसला होता. त्यामुळे ही सारी नकारात्मकता त्याच्यापुढे व्यक्त झाली नाही; हे एक समाधान. अर्थात आई-वडिलांचे हतबल होणेही समजण्यासारखे होते. निखिलच्या वडिलांच्याच भाषेत सांगायचे झाले तर, “बुद्धीनीच कमी असता तर ते कसंतरी स्वीकारलंही असतं. पण, चांगली समज असणारा एवढा चुणचुणीत मुलगा या अशा कारणानं अभ्यासात मागे पडतो म्हटल्यावर आम्हीही अगदी हताश होऊन जातो कधीकधी.”

 

निखिलशी स्वतंत्रपणे बोलतानादेखील मला प्रकर्षाने जाणवली ती त्याच्या डोळ्यांमधली हुशारीची चमक. “निखिलच्या काही मानसशास्त्रीय चाचण्या करून घ्याव्या लागतील आणि मग आपण यातून मार्ग काढू,” असे मी त्याच्या पालकांना सुचवले. निखिलच्या एकूण लक्षणांवरुन आलेल्या अंदाजाला त्याच्या चाचण्यांच्या निष्कर्षातून पुष्टी मिळाली. निखिलला अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसॅबिलिटी) असल्याचे निदान झाले. लर्निंग डिसॅबिलिटी (एल. डी.) असणाऱ्या मुलांची बुद्धिमत्ता सर्वसाधारणपणे सामान्य अथवा त्यापेक्षा वरच्या दर्जाची असते. वाचन, लेखन व आकडेमोड यापैकी एक, दोन किंवा तीनही कौशल्यांमध्ये त्यांना अडचणी येत असतात. परिणामत: त्यांची बुद्धिमत्ता आपल्या शिक्षणप्रक्रियेतील परीक्षापद्धतीत व तपासणीमध्ये प्रतीत होत नाही. निखिलच्या पालकांना मी हे सारे सविस्तर समजावून सांगितले. त्यांना हेही आवर्जून सांगितले की, “जमेची बाजू म्हणजे निखिल आठच वर्षांचा आहे. उपचारात्मक (रेमेडीयल) शिक्षण, शिक्षकांची मदत, शैक्षणिक तपासणीसाठी वापरलेल्या वैविध्यपूर्ण पद्धती आणि पालकांचा पाठिंबा याच्या आधाराने निखिल या त्याच्या वेगळ्या क्षमतेशी जुळवून घेण्यात जरूर यशस्वी होईल.” स्वत:च्या अध्ययन अक्षमतेवर मात करून यशस्वी झालेल्या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची उदाहरणे दिली. गेली दोन वर्षे नियमित मेहनत, उपचारात्मक शिक्षण, शाळेची मदत व पालकांची साथ या पुंजीच्या साहाय्याने निखिलच्या अध्ययन क्षमतेत दिवसेंदिवस खूपच सकारात्मक बदल होत आहेत. “मॅम, एल. डी. म्हणजे काय?” या त्याने मला दोन वर्षांपूर्वी अतिशय चौकसपणे विचारलेल्या प्रश्नाचे मी त्याला उत्तर दिले होते, ‘एल.डी.’ म्हणजे लर्निंग डिफरंटली,” हे उत्तर त्या पठ्ठ्याने चांगलेच मनावर घेतले आहे.

 

अध्ययन अक्षमता ही वाटते त्यापेक्षा जास्त सामान्यपणे अस्तित्वात असलेली अवस्था आहे. नॅशनल सेंटर फॉर लर्निंग डिसॅबिलिटीज, न्यूयॉर्क या संस्थेने २०१६ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार, सर्वसाधारणपणे प्रत्येक पाच विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्यामध्ये कमी-अधिक पातळीची अध्ययन अक्षमता आढळून येते. अर्थात, त्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने निदान होणे व त्यावर उपचारात्मक उपाय अंमलात आणणे हे आपल्याकडे तितकेसे सहजपणे होताना दिसत नाही. याबाबत पालकांनी व शाळांनी जागरूक असणे गरजेचे आहे. मुलांच्या वाचन, लेखन, आकडेमोड तसेच इतर शैक्षणिक कौशल्यांचे जाणीवपूर्वक निरीक्षण करणे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे खूप आवश्यक आहे. त्यातून मुलांना त्यांच्या वेगळ्या क्षमतांशी जुळवून घेत प्रगती करणे शक्य होते. अध्ययनाची प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता व पद्धत वेगळी असते. आपल्या संस्कृतीला लाभलेल्या गुरुकुल परंपरेतही गुरूंची अध्यापनप्रक्रिया प्रत्येक शिष्यासाठी वेगळी असण्यामागे हेच तर तत्व आहे.

 

- गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

7775092277

[email protected]

@@AUTHORINFO_V1@@