समाजप्रिय नेतृत्व - आ. प्रशांत ठाकूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2018
Total Views |

 

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा लोकसेवेचा वसा समर्थपणे चालवित असलेले भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेलचे तरुण तडफदार, अभ्यासू आमदार प्रशांत ठाकूर यांचा ५ ऑगस्ट रोजी ४४वा वाढदिवस आहे. अवघ्या कोकणचे समर्थ नेतृत्व असलेल्या आ. प्रशांत ठाकूर यांनी कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलला ‘विकासाचे मॉडेल’ बनविण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. हेच त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. विरोधाचे राजकारण न करता सत्तेत राहून विकास साधण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीला सलाम करावा लागेल.
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासयात्रेतील या सच्च्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचे अभीष्टचिंतन करताना त्यांच्या गौरवपूर्ण कार्याचा आढावा घ्यावाच लागेल. बदलत्या आणि बहरत्या पनवेल महानगराच्या स्वप्नपूर्तीसाठी आ. प्रशांत ठाकूर यांच्या सहकाऱ्यांनाही अग्निदिव्यातून जावे लागले आहे. नि:स्वार्थ सेवेसाठी पदत्यागसुद्धा करावा लागला. पनवेलकरांच्या या नेत्याची ‘टोलमुक्तीचे शिल्पकार’ म्हणून इतिहासाने नोंद घेतली आहे. या लढ्यात त्यांची भूमिका आणि तळमळ अनेकांनी पाहिली आहे. शांत स्वभावाच्या माणसाला आलेला राग त्याला आवरताना किती मानसिक त्रास होत असेल, या कल्पनेने हादरून जायला होते. इतका मानसिक कल्लोळ होत असतानाही संयमाने पाठपुरावा करून न्याय मिळवून घेणे, ही शिकवण आ. प्रशांत ठाकूर यांनी नवोदित राजकीय कार्यकर्त्यांसमोर ठेवली आहे. राजकीय कार्यकर्त्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी हवी असे अपेक्षित असते. याचे मूर्तिमंत उदाहरण आ. प्रशांत ठाकूर हे आहेत. त्यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, “युवकांच्या हातात देश द्यायचा आहे.” त्यासाठी सक्षम युवा नेतृत्व कसे असावे याचे उदाहरण द्यायचे असेल, तर ते आ. प्रशांत ठाकूर हे आहेत. आरोग्य शिबिरे, रोजगार मेळावे अशा उपक्रमांमधून लोकसंग्रह करीत सामान्य कार्यकर्ता ते नगराध्यक्ष ते पुढे आमदार असा प्रवास करणारे कोकणातील युवकांचे आदर्श असणारे म्हणून त्यांची ख्याती असून, कोकणातील भाजपचे एकमेव आमदार असले तरी संपूर्ण जिल्ह्याला सांभाळण्याचे काम ते त्यांच्या कर्तृत्वशैलीने पार पाडतात. पनवेलला अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आणि शिकवण लाभल्यामुळे ते नेहमी जोशामध्ये घाईघाईने कोणताही निर्णय न घेता जे काम करायचे ते उत्कृष्ट करायचे, असा त्यांचा ध्यास सदैव त्यांच्यात दिसतो. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत राबविले जाणारे अनेक उपक्रम आणि त्यांचे नियोजन पाहिले असता, त्या उपक्रमांमागील असणारी त्यांची तळमळ दिसून येते. सकाळी लवकर उठून घरी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढणे, त्यानंतर दिवसभर पायाला भिंगरी लावून सतत वेगवेगळे विषय हाताळणे हे त्यांच्या अंगवळणीच पडले आहे, असे म्हणावे लागेल. रायगड किल्ला चढून जाणारे आणि मंत्रालयातील लिफ्ट न वापरता चढून जाणारे आ. प्रशांत ठाकूर हे एकमेव आमदार असतील. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, राजकीय, अशा क्षेत्रात आ. प्रशांत ठाकूर यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. आजपर्यंत त्यांनी केलेली कार्ये समाजात आदर्श निर्माण करणारी आहेत. लोकांना सुदृढतेचा मार्ग दाखवण्यासाठी नेहमी ते प्रयत्नशील असतात, त्यामुळे या तरुण नेतृत्वाकडून अभ्यासू असण्याची सर्वांनाच अपेक्षा असते. या अपेक्षेला आ. प्रशांत ठाकूर पूरक आहेत. त्यांच्या सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील भाषणांतून याची प्रचिती येते. विषयांच्या मुळाशी जाण्याची त्यांची वृत्ती सर्वांना मोहात टाकणारी ठरते.

 

राजकीय नेते शक्यतो कला, साहित्य, क्रीडा या प्रांतांपासून चार हात लांब असतात; मात्र, पनवेलचे आमदार याला अपवाद आहेत. केवळ राजकीय स्वार्थासाठी विविध स्पर्धा न भरवता प्रत्यक्ष बारीकसारीक गोष्टीत लक्ष घालून उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण करत ते पनवेल आणि रायगडमधील कलावंत आणि खेळाडू, तसेच साहित्यिकांना प्रोत्साहन देत असतात. स्वत: नवनवीन पुस्तकांचे वाचन करताना ते नेहमी आढळतात. कलेला राजाश्रय मिळाल्यामुळेच रायगडमधील कलावंत उच्च यश संपादन करताना दिसत आहेत. दरवर्षी ते भरवत असलेला 'मल्हार महोत्सव' ही पनवेलकरांसाठी पर्वणीच असते. आपल्या धावपळीच्या जीवनात असे कार्यक्रम त्यांना आत्मिक आनंद देत असल्याची कबुली ते नेहमीच देतात. पनवेलला विकासात बदलण्याचे काम आ. प्रशांत ठाकूर यांनी केले हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही, कारण आमदार प्रशांत ठाकूर म्हटले की, समाजाचा विकास ही व्याख्या नजरेसमोर येते. ते नेहमी सर्वांना निरोगी राहण्याचा सल्ला देतात, कारण ते स्वत:सह दुसऱ्याच्या आरोग्याला जपतात. त्यामुळेच ते दरवर्षी आरोग्य महाशिबिरे आयोजित करून रुग्णांची सेवा करतात. ते एवढ्यावर थांबत नाहीत, तर मुख्यमंत्री साहाय्यता निधीतूनही ते रुग्णांना आर्थिक मदत करत असतात. जानेवारी २०१५ ते जुलै २०१८ पर्यंत १४४ रुग्णांना जवळपास ९५ लाखांहून अधिक रुपयांची मदत केली असून, ते आरोग्यदूताची भूमिका योग्यरीत्या पार पाडत आहेत. त्यांच्याकडून समाजाची अखंडपणे सेवा होत आहे. त्यामुळे समाजप्रिय असलेले नेतृत्व आ. प्रशांत ठाकूर खऱ्या अर्थाने आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे या समाजप्रिय नेतृत्वास आणि आरोग्यदूतास वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा!

- हरेश साठे

९७६९४०९१७८

@@AUTHORINFO_V1@@