कोपरी पूलाचे काम सेनादलाकडे सोपवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |



नगरसेवक मनोहर डुंबरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे: नियोजित कोपरी पूलाचे काम वेगाने होण्यासाठी पुलाचे काम सेनादलाकडे सोपवावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर मुलूंड टोल नाक्यावरुन सकाळी व सायंकाळी हलक्या वाहनांना सूट द्यावी, शहरातील वाहतूककोंडी दूर होण्यासाठी साकेत-गायमुख बायपास रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणीही डुंबरे यांनी केली. ठाणे शहराबरोबरच घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीमुळे नागरीक त्रस्त आहेत. तर काही संघटना व फेडरेशनने आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी काल गुरुवारी भेट घेतली. तसेच त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

 

पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी येथे नवा पूल बांधण्यात येणार आहे. मात्र, त्याला दीर्घ कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील एल्फिन्स्टन रोड येथील पुलाच्या धर्तीवर कोपरी पूलाचे कामही लष्कराकडे सोपवावे, या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण झाल्यास कोपरी पूलावरील वाहतूककोंडी टळू शकेल, असे मनोहर डुंबरे यांनी निवेदनात म्हटले आहे. राज्य सरकारने तूर्त २३ सप्टेंबरपर्यंत मुलूंड व ऐरोली टोल नाक्यावरुन जाणाऱ्या हलक्या वाहनांना सूट दिली आहे. परंतु, २३ सप्टेंबरनंतर पुन्हा वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे कोपरी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत दररोज सकाळी ६ ते १० पर्यंत आणि सायंकाळी ६ ते १० पर्यंत लहान वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी मागणीही डुंबरे यांनी केली आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी लक्षात घेऊन, ठाणे महापालिकेने साकेत ते गायमुख हा बायपास रस्ता मंजूर केला. त्यासंदर्भात सर्व परवानगी मिळालेली आहे. मात्र, त्याबाबत अजूनही निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. या रस्त्याचे काम तत्काळ सुरू केल्यास वाहनचालकांना दिलासा मिळू शकेल. शहरातील वाहतूककोंडीतून कमी होण्यासाठी तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी नाक्यावरील सिग्नलवर ग्रीड सेपरेटर टाकावेत. मेट्रोच्या कामामुळे होणारी घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी सर्व्हीस रस्ता मोकळा करावा, ठाणे शहरात दिवसा जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करावी, आदी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक डुंबरे यांनी केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@