मातीचा देव त्याला पाण्याचं भेव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
 
 
‘दगडाचा देव त्याला वडराचं भेव।
लाकडाचा देव त्याला अग्निचं भेव।
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव।
सोन्याचांदीचा देव त्याला चोराचं भेव।’
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हे अतिशय प्रसिद्ध आणि अर्थगर्भ भजन आहे. आपण ते बरेचदा त्यांच्या आवाजात ऐकलेही असेल. हे भजन आठवण्याचे आणि त्या भजनाचा एक नवा अर्थ आकळण्याला एक कारण घडले.
 
 
नवी दिल्लीच्या अलिशान वस्तीत नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय (द नेहरू मेमोरिअल म्युझियम अॅण्ड लायब्ररी) नावाची एक वास्तू आहे. सध्या ती चर्चेत आहे. कॉंग्रेस आणि सेक्युलर लोकांनी तिला वादग्रस्त करून टाकली आहे. हे संग्रहालय पूर्वी तीन मूर्ती भवन म्हणून ओळखले जायचे. पहिल्या महायुद्धात भारतातील जोधपूर, हैदराबाद आणि म्हैसूर या तीन संस्थानांनी ब्रिटिश सरकारला जी मदत केली, त्याचे प्रतीक म्हणून इथे तीन मूर्ती स्थापित केल्या आहेत. त्यावरून या इमारतीला तीन मूर्ती भवन हे नाव पडले. 1930 साली तयार झालेल्या या इमारतीचा उपयोग ब्रिटिश अधिकारी निवासासाठी करत असत. स्वातंत्र्यानंतर ही इमारत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान राहिले. त्यांच्या मृत्युपश्चात ही इमारत संग्रहालयात व ग्रंथालयात परिवर्तित करण्यात आली. उद्देश हा की, आधुनिक भारताच्या इतिहासावर, विशेषत: नेहरूंच्या संदर्भात इथे संशोधन व्हावे. आजही या संग्रहालयाला दरवर्षी लाखो लोक भेट देत असतात. वामपंथी कथित इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या बहुतेक संशोधन प्रकल्पांना नेहरू संग्रहालयाने उदार अंत:करणाने आर्थिक मदत केली आहे.
 
 
 
 
45 एकराच्या या भव्य भूखंडात, भारताच्या सर्व पंतप्रधानांचेही स्मृती संग्रहालय असावे, अशी एक कल्पना विद्यमान मोदी सरकारच्या मनात आली आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रत्येक पंतप्रधानाचे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो वा विचारांचा, उल्लेखनीय योगदान आहे. त्या सर्वांची स्मृती आणि माहिती यानिमित्त संरक्षित करण्याचा अतिशय स्तुत्य उद्देश मोदी सरकारचा होता. त्या दृष्टीने आरेखन वगैरेही तयार झाले आहे. नरेंद्र मोदी यांची प्रत्येक कृती निषेधार्हच असते, या गंडाने पछाडलेल्या कॉंग्रेस व सेक्युलर बुद्धिवंतांना अर्थातच हे आवडणारे नव्हते. त्यांनी हाकाटी सुरू केली की, मोदी सरकार पं. नेहरूंचे नाव इतिहासातून काढून टाकण्याच्या मागे लागले आहे. खरेतर तसे काहीही नव्हते. परंतु, गेल्या आठवड्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवून, सरकारच्या या पुढाकाराला विरोध केला. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले, परंतु अर्थातच ते या मंडळींना मान्य नाही.
 
 
45 एकराच्या या विशाल भूखंडावर आज जी ब्रिटिशकालीन इमारत आहे, तिला नव्या योजनेत धक्काही लागणार नव्हता. या इमारतीच्या मागे दुसरी एक नवी इमारत उभी करून त्यात इतर सर्व पंतप्रधानांच्या स्मृती आणि त्यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. कॉंग्रेसला तेही नको आहे. कॉंग्रेस म्हणजे फक्त महात्मा गांधी आणि नेहरू परिवारातील एकूणएक व्यक्ती, अशीच या लोकांची व्याख्या आहे. ही व्याख्या देशातील सर्वसामान्य लोकांना मान्य असलेच असे नाही. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात केवळ आणि केवळ कॉंग्रेस पक्षाचेच योगदान आहे, अशी एक आग्रही आणि एककल्ली भूमिका आतापर्यंत घेण्यात आली, तसेच स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत केवळ कॉंग्रेसच्या आणि त्यातही नेहरू परिवारातीलच पंतप्रधानांनाचे योगदान होते, हादेखील हट्टाग्रह धरण्यात आलेला आपल्याला दिसेल. ही मनोभूमिका खरेतर लोकशाही तत्त्वाच्या विरुद्ध आहे. परंतु, सतत लोकशाहीचा आठव करणार्या कॉंग्रेसला हे मान्य नाही, हे आश्चर्यच आहे. कॉंग्रेसमुळे सरकारी पैशावर पोसलेल्या पत्रकार, बुद्धिवंत, इतिहासकार व कलावंत यांच्यातही हीच वृत्ती भिनली आहे की, भारतीय स्वातंत्र आणि स्वातंत्र्योत्तर भारत ही केवळ आणि केवळ नेहरू परिवाराची जहागीर आहे. त्यात दुसर्या कुणालाही प्रवेश नाही. आतापर्यंत कॉंग्रेसचेच सरकार दिल्लीत राहिले आहे. गैरकॉंग्रेसी सरकारेही बनलीत, पण ती एकतर कॉंग्रेसच्या कृपेवर होती किंवा कॉंग्रेस विचारसरणीचीच होती. त्यामुळे त्यांनीही या अशा इतिहासावरील बलात्काराकडे लक्ष दिले नाही. नको ती भानगड म्हणून ते चूप राहिले असावेत.
 
 
 
 
पण, आता मोदी सरकारने इतरही व्यक्तींचे, पक्षांचे भारताच्या इतिहासात स्थान आहे, असे मांडणे सुरू केल्यापासून, ही मंडळी बिथरली आहे. पं. नेहरूंची स्मृती आणि इतिहासातील त्यांचे स्थान संपविण्याचा कट मोदी सरकार करीत असल्याचा त्यांचा कांगावा आहे. उलट, मोदी सरकार भारताच्या जडणघडणीत योगदान देणार्या इतरही लोकांच्या, विचारांच्या योगदानाला इतिहासात समाविष्ट करू इच्छित आहे. त्याला विरोध म्हणून ही सर्व धडपड सुरू आहे. कळसूत्री बाहुली असल्याचे सिद्ध केलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांचे मोदींना हे पत्र, याच धडपडीचा एक भाग आहे.
यातून काही प्रश्न उपस्थित होतात. पं. जवाहरलाल नेहरू यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यात जे योगदान होते, हे खरेच महत्त्वाचे होते, यात शंका नाही. हा इतिहासच आहे आणि जो इतिहास आहे, तो कुणालाही खोडून टाकता आलेला नाही. जे सत्य आहे, ते कधीही फार काळ लपविले जात नाही. त्यामुळे हजारो मोदी आले, तरी जो खरा इतिहास आहे, तो लपविणे तर सोडाच, पण खोडताही येणार नाही. असे असताना मग ही ओरड का?
 
 
 
 
एकतर, पं. नेहरूंचा म्हणून जो इतिहास भारतीयांच्या गळी उतरविण्याचा सातत्याने प्रयत्न होत राहिला, त्यात तितकेसे तथ्य नसले पाहिजे. भारताच्या अर्वाचीन इतिहासाचा एक सोयिस्कर फुगा फुगविण्यात आला आहे आणि त्यात ते म्हणतील अशाच लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या कामी रामचंद्र गुहा, रोमिला थापर यासारख्यांनी हातभार लावला आहे, असे जर कुणी म्हणत असेल तर त्याला चूक म्हणता येईल का? या लोकांना भीती कशाची आहे? इतिहासाचे काम निवडक लोकांचा समावेश करणे आणि नको असलेल्यांना वगळणे हे असते काय? जे आहे ते राष्ट्रीय आयामाच्या चौकटीत वस्तुनिष्ठपणे मांडणे, हेच तर इतिहासाचे काम आहे. पुढच्या पिढ्यांसाठी हा एक ठेवा असतो. प्रेरणेचा स्रोत असतो. झालेल्या चुका टाळण्यासाठी एक मार्गदर्शक असतो. त्यातच खोडसाळपणा करायचा? कम्युनिस्टांनी जगभरात हेच केले आहे. हा अक्षम्य गुन्हा आहे. तुमच्या परिवारातील नाही, तुमच्या विचारांचा नाही म्हणून त्याचे योगदान, त्याचे समर्पण नाकारायचे? ही कुठली लोकशाही वृत्ती आहे? पं. नेहरूंनी भारतात लोकशाही स्थिरपद केली, असे सांगितले जाते. नेहरूंना हीच लोकशाहीवृत्ती अभिप्रेत होती का?
 
 
 
 
 
45 एकराच्या भूखंडात एका ठिकाणी भारताच्या सर्व पंतप्रधानांची अधिकृत व विश्वासार्ह माहिती लोकांना मिळत असेल, तर काय वाईट आहे? एखाद्या व्यक्तीचा तुम्ही अगदी द्वेषही करत असाल; पण ती व्यक्ती जर पंतप्रधान झाली असेल, देशाच्या सव्वाशे कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करीत असेल, तर ते मान्य करावेच लागेल. ही उदार वृत्ती कधी काळी कॉंग्रेसमध्ये होती. ती कुठे लुप्त झाली, कुणामुळे झाली, याचाही जनतेने विचार केला पाहिजे. नेहरूंच्या बाजूला इतरही पंतप्रधानांची माहिती देणारे कक्ष स्थापन झाले, तर नेहरूंचे नाव इतिहासातूनच नष्ट होईल, अशी भीती या लोकांना वाटत आहे. म्हणूनच मला वर उल्लेखलेले राष्ट्रसंतांचे भजन आठवले. मातीचा देव असेल तरच त्याला पाण्याची भीती वाटणार ना? पाण्यात टाकले आणि विरघळून गेलो तर? नेहरूभक्तांना अशी भीती वाटत आहे याचा अर्थ, नेहरूंचे माहात्म्य, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, आधुनिक भारताच्या जडणघडणीत असलेली त्यांची भूमिका सर्वच्या सर्व मातीतेच आहे का, याचे उत्तर कॉंग्रेसींनी दिले पाहिजे...
@@AUTHORINFO_V1@@