त्यांच्यासाठी ‘एसटी’ पोहचली पाड्यावर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |


 


जागतिकीकरणाच्या काळात शहरांचा विकास साधला जातो. मात्र, ग्रामीण भागाला अजूनही झुकते माप मिळत नाही. ग्रामीण भागात आजही पायाभूत समस्यांसाठी झगडावं लागत, मोठा संघर्ष करावा लागतो. ग्रामीण भागाचा म्हणजे खास करून वनवासी भागाचा विकास साधून आधुनिकीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. अशावेळी आपलं सामाजिक दायित्व निभावण्यासाठी अनेक हात समोर येत असतात, तर अनेकजण वंचितांच्या उद्धारासाठी स्वतःला समर्पित करतात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. यात 'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरचादेखील समावेश होतो. 'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर' ही संस्था गेल्या ७ वर्षांपासून शिक्षण, प्रशिक्षण व रोजगार या क्षेत्रात अविरतपणे काम करीत आहे. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता ही संस्था वनवासी पाड्यांमधील गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी ९ वी व १० वीचे वर्ग अभ्यासिका म्हणून चालवीत आहे.

 

 
 

पालघर जिल्ह्यातील भालिवली येथील वनवासी पाड्यांत सुरू असलेल्या 'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर'च्या कामाची दखल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतली असून, राष्ट्र सेवा समिती ते ढेकाळे अशी एसटी सेवा चालू केली आहे. आदिवासी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये, म्हणून या शालेय बस फेऱ्या सूरू करण्यात आल्याचे अर्नाळा आगाराकडून सांगण्यात आले. ही बससेवा सुरू होण्यासाठी 'विवेक संचलित राष्ट्र सेवा समिती'ने अनेक दिवसांपासून पाठपुरवठा केला होता. या पाठपुरवठ्याला यश आले असून आगाराच्या या निर्णयाचे विद्यार्थी व संस्थेकडून स्वागत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बस थांब्याला राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 'RSS' नाव असे नावही देण्यात आले. या बस थांब्याचे उद्घाटन राज्य मार्ग परिवहन महामंडळचे विभाग नियंत्रक अजित गायकवाड ह्यांचा हस्ते करण्यात आले.

 

 
 

सद्यस्थितीत संस्थेमध्ये जवळपास १०० विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासासाठी कला, क्रीडा व संस्कार हे विषयदेखील शिकवले जातात. संस्थेतर्फे चालवली जाणारी ही शाळा फक्त आदिवासी मुलांकरिता असून ती त्यांच्यासाठी पूर्णपणे विनामूल्य चालवले जाते. विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच नाही, तर या भागातील वनवासी महिला आणि तरुणांना बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंचे प्रशिक्षण दिले जाते. एवढेच नाही तर हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थींना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कामदेखील दिले जाते. संस्थेचे हे कार्य अविरत चालू असून पुढेदेखील असे नानाविध उपक्रम राबविले जातील, असे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, बस थांब्याच्या उदघाटनप्रसंगी संस्थेच्यावतीने आगार व महामंडळाच्या अधिकारी वर्गाला आभारपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळेस संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी व अर्नाळा आगारचे व्यवस्थापक संदीप बेलदार, विलास नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@