देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगणार ‘प्रो-गोविंदा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |


 

ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून दहिहंडीचा उत्सव वादाच्या भोव-यात सापडला होता. दरवर्षी तो सापडण्यामागचं कारणंही तसंच आहे. दहिहंडीला आलेलं कॉर्पोरेट लूक आणि वाढत्या थरांमुळे होणारे अपघात यामुळे न्यायालयानेही त्यावर काही बंधनं घातली होती. साहसी खेळ, पारंपारिक उत्सव याच्या कचाट्यात सापडलेल्या दहिहंडीने अखेर साहसी खेळाचा दर्जा मिळवला. त्यानंतर असे खेळ भरवले जाण्याची मागणी केली जाऊ लागली आणि देशाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच ठाण्यात प्रो गोविंदाचा थरार गोपाळांना अनुभवता येणार आहे. वाढते थर आणि होणारे अपघात यामुळे न्यायालयाने त्यावर निर्बंध लादले होते. त्यानंतर अनेक स्तरातून याला साहसी खेळाचा दर्जा देण्याची मागणी होऊ लागली. याचीच दखल घेत २०१६ मध्ये राज्य सरकारने दहिहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. ठाण्यात आपण आयोजित करत असलेल्या दहिहंडी या उत्सवामध्ये प्रो गोविंदा ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रो गोविंदाचे आयोजक आ. प्रताप सरनाईक यांनी दै. मुंबई तरूण भारतशी बोलताना दिली. २०१६ मध्ये दहिहंडीच्या उत्सवाचा साहसी क्रीडा प्रकारामध्ये राज्य सरकारने समावेश केला होता. परंतु त्यासाठी आवश्यक अशी नियमावली तयार करण्यात आली नव्हती. जशा प्रकारे प्रो कबड्डी स्पर्धा भरवली जाते त्याच धर्तीवर प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या दिवशी संध्याकाळी ही स्पर्धा भरवली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
 

दहिहंडी समन्वय समितीकडून पथकांची नावे

मुंबईत जवळपास ८-९ थर असे उंच थर लावणारी २३ दहिहंडी पथके आहेत. त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता दहिहंडी समन्वय समितीकडून आम्हाला पथकांची नावे देण्यात आली. त्यातील काही पथके ही प्रो गोविंदामध्ये सहभागी होणार असल्याचे सरनाईक म्हणाले. सर्वात कमी वेळेमध्ये जास्त थर लावणा-या गोविंदा पथकाला विजयी घोषित करण्यात येणार असून सरकारने जारी केलेल्या नियमावलीप्रमाणेच ही स्पर्धा पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

क्रीडा मंत्री उपस्थित राहणार

दरम्यान, या स्पर्धेला क्रीडा मंत्री विनोद तावडे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. तसेच सरकारच्या नियमावली प्रमाणे ते या ठिकाणी माहिती आणि मार्गदर्शनदेखील करतील, असे सरनाईक म्हणाले. तसेच क्रीडा विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकारीदेखील या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.

 

कशी असेल नियमावली

प्रो गोविंदा स्पर्धेत ८ आणि ९ थर लावले जाणार आहेत. ८ थरांच्या स्पर्धेत सहभागी होणा-या खालून सात तर ९ थरांच्या स्पर्धेत सहभगी होणा-या पथकांना खालून आठ थर लावावे लागणार आहेत. यामध्ये सहभागी गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच सर्वप्रथम कमीतकमी वेळात थर लावावे लागणार आहेत. तसेच खालचा थर लागल्याचे सांगितल्यानंतरच वेळ सुरू करण्यात येणार आहे. थर लावल्याप्रमाणे पथकांना योग्यरितीने खाली उतरावे लागणार आहे. अशा प्रकारे त्यातील मंडळे पुढील फेरीत पोहोचणार असून त्यापैकी एकाला विजेता घोषित करण्यात येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@