एक स्वागतार्ह पाऊल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2018   
Total Views |


 

दक्षिण गंगाम्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे प्रदूषण हा थेट न्यायालयात पोहोचलेला विषय. जलतज्ज्ञ राजेंद्र पचौरी यांनी याबाबत अनेकदा विविध व्याख्याने आणि बैठका घेऊन मार्गदर्शनही केले आहे. नुकत्याच झालेल्या अशाच एका बैठकीत गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी पुरोहितांनी पुढाकार घ्यावा, असा सूर उमटला. यासाठी पुरोहित संघाने रामकुंड परिसरातील निर्माल्य विल्हेवाटीची जबाबदारी स्वीकारावी, अशा सूचनाही करण्यात आल्या. तसेच, शहरातून वाहणाऱ्या गोदावरीसह उपनद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी चाललेल्या विविध प्रयत्नांतर्गत रामकुंड परिसरात निर्माल्य, पिंडदानाच्या साहित्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाने स्वीकारावी, असेही मत यावेळी मांडण्यात आले. याप्रकारे गोदा प्रदूषणमुक्तीसाठी आजवर अनेक बैठका झाल्या आहेत. तसेच ‘निरी’नेही अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. मात्र, फलनिष्पत्तीसाठी प्रत्यक्ष कार्य करण्याची गरज असते. ज्यांच्या हाती गोदामाईची पूजाअर्चना सोपविली आहे, जो पुरोहित वर्ग नित्यनेमाने विविध धार्मिक विधी गोदातिरी करतो, त्यांची ही जबाबदारी या बैठकीत ठरविण्यात आली. निश्चितच, हे एक स्वागतार्ह पाऊल म्हणावे लागेल. नाशिक शहराचे अर्थकारण आणि शाश्वत विकास हा गोदावरी नदीवर आधारित आहे. यामुळे गोदावरीसह तिच्या उपनद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि तिचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे आयुक्त मुंढे यांनी यापूर्वीही नमूद केले आहेतसेच, गोदा प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील नाल्यांमधून वाहणारे मलजल बंद करण्याच्या सूचनेवर वरील कार्यवाही प्रगतिपथावर असल्याने गोदा लवकरच शुद्ध पाण्यासह खळाळून वाहील, असे म्हणावयास हरकत नाही. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील गोदापात्रात मूलभूत फरक आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी वाहती नाही. ती कुशावर्त कुंडामध्ये सामावली आहे. याउलट नाशिकमध्ये गोदावरी नदी प्रवाही आहे. निर्माल्य, पिंडदानाचे साहित्य यांची विल्हेवाट लावण्याच्या विषयावर संबंधित यंत्रणांनी आमच्याशी चर्चा केल्यास पुरोहित संघ निश्चितच काहीतरी तोडगा काढेल आणि अजूनही काही उपाययोजना सुचवेल, अशी भूमिका पुरोहित संघाने तूर्तास तरी घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नाने गोदावरी मोकळा श्वास घेईल, अशा आशा करायला हरकत नाही.
 

आता पुन्हा ‘लँडिंग’

 

या शहराला नेमके काय झाले आहे? असा सवाल सध्या नाशिककरांना सतावतो आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेस अनुसरून नाशिकचा समावेश ‘उडान’ योजनेत करण्यात आला. त्यात नाशिक ते मुंबई, पुणे-हैद्राबाद, अहमदाबाद अशा भारताच्या विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली. मोठ्या उत्साहाने सुरू केलेल्या या विमानसेवेला आता पुन्हा ग्रहण लागले आहे. कारण, नाशिक-मुंबई विमानसेवा आता पुन्हा बंद करण्यात आली आहे. नाशिक ते मुंबई या दोन्ही शहरांमधील हवाई अंतर १५० किमी पेक्षा कमी असल्याने ‘उडान’ योजनेचा लाभ या सेवेसाठी देता येणार नसल्याचे ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोन शहरांदरम्यान हवाई प्रवासासाठी प्रवाशांना दोन ते अडीच हजार रुपये इतके भाडे मोजावे लागेल. या धोरणामुळे आणि केवळ तीन ते चार तास अंतरावरील रस्ता प्रवासासाठी इतके मूल्य का अदा करायचे? या व्यावहारिक विचारामुळे या सेवेला प्रतिसाद मिळणार नाही, या जाणीवेतून ही सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. मुळात नाशिक जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा, औद्योगिक प्रगतीकडे आता कुठे वाटचाल होत आहे. साहाजिकच आहे की, या शहरात रोजगारासाठी येणाऱ्यांमध्ये मजूरवर्गाचा वाटा हा मोठा असणार. पण, त्याला विमानसेवा परवडणारी आहे का? याचा विचार करावयास हवा. आधी म्हटल्याप्रमाणे कृषिप्रधान जिल्हा असल्याने प्रवासी वाहतुकीऐवजी मालवाहतुकीला प्राधान्य देणारी विमानसेवा सुरू केल्यास आणि तिला चालना मिळेल, असे धोरण आखल्यास नाशिक भारताच्या हवाई नकाशावर पुन्हा झळकेल. नाशिकनगरीत विदर्भवासीयांचा रहिवास मोठा आहे. तसेच विदर्भातील नागपूर येथे जाण्यासाठी रस्तेमार्गे १८ ते २२ तास लागतात आणि लोहमार्गाने सेवाग्राम, विदर्भ, गीतांजली अशा काही मोजक्याच रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. त्यांनाही १२ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. तेव्हा हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मुंबई आणि पुण्यापेक्षा विदर्भासाठी विमानसेवा सुरू केल्यास त्याला नक्कीच प्रतिसाद मिळेल. तसेच, नाशिकनगरी ते अलाहाबादनगरी अशी दोन तीर्थस्थळे, गंगा ते दक्षिण गंगा अशी धार्मिक परिक्रमा करणारी विमानसेवा सुरू केल्यास त्यालाही प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. नगरीतील लोकप्रतिनिधींनी केवळ धावत्याच्या मागे न धावता चौकटीबाहेरचा विचार करून नाशिक विमानसेवेचे लँडिंग होणार नाही, यासाठी प्रयत्न करावयास हवे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@