अरबी महिलांची गाडी निघाली सुसाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



 

राना अल् मिमोनी रियाधमध्येच मोटार चालवतेय आणि साधं ड्रायव्हिंग लायसन्स नव्हे, तर रेसिंग कार ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

दि. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी आपला ३३ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सौदी अरेबियन युवराज मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी जून २०१८ मध्येच सौदी महिलांना वाढदिवसाची भेट देऊन टाकली आहे. त्यांनी महिलांना मोटार चालवण्याचा अधिकृत परवाना दिला आहे.

 

सौदी हा अरब जगतातला सर्वात मोठा देश. कुवेत आणि इराक यांच्यापाठोपाठ तेल उत्पादनातला तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. शिवाय सौदी ही मुहम्मद पैगंबरांची जन्मभूमी आहे. त्यामुळे आपण अरब जगताचे नेते आहोत, असा सौदी सत्ताधिशांचा समज. जेमतेम पावणेतीन कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाचे दरडोई उत्पन्न ३०,४७७ डॉलर्स (१ डॉलर : ७०.७८ रुपये) एवढं आहे. म्हणजेच देशात संपत्तीचा पूर वाहतोय. साहजिकच म्हणाल, ती आधुनिक सुखसोय तेथे उपलब्ध आहे. युरोप, अमेरिका, जपान इथल्या मोटारींचं प्रत्येक नवं मॉडेल त्यांच्या त्यांच्या देशात एकवेळ उशिरा बाजारात येईल, पण सौदीमध्ये पहिल्यांदा मिळणार.

 

अशा संपन्न देशात महिलांवर मात्र नाना तऱ्हेची बंधनं आहेत. बाप-भाऊ किंवा कुटुंबातील अन्य पुरुष व्यक्तीच्या संमतीशिवाय मुली विवाह करू शकत नाहीत. बाप-भाऊ-नवरा किंवा तत्सम नातेवाईक पुरुष बरोबर असल्याखेरीज महिला प्रवास करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे महिला स्वतःच्या घरातील मोटार स्वतः चालवू शकत नाहीत. सौदीमध्ये स्त्रियांना शिक्षणाला बंदी नाही, फक्त स्त्री-पुरुष एकत्र शिक्षणाला कडक बंदी आहे. परिणामी, जगभर सर्वत्र जे चित्र दिसतं, तेच इथेही दिसतं. देशातल्या सर्व विद्यापीठांमध्ये दरवर्षी किमान ५२ टक्के स्त्रिया पदवी मिळवतात. अनेक स्त्रिया उच्च शिक्षणासाठी परदेशीसुद्धा जातात. तिथे त्या मोठमोठ्या पदव्या मिळवतात. म्हणजेच बुद्धिमत्तेत अरब स्त्रिया अरब पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाहीत, पण तरीही साधी एक मोटार चालविण्याचा परवाना काही त्यांना मिळू शकत नव्हता.

 

जून २०१८ मध्ये सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी ही बंदी उठवली. महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं. सौदी विनोदी वक्ता यासर बक्र यांनी मोठी गमतीदार प्रतिक्रिया दिली, “अरे, माझं अभिनंदन करा. अखेर मी या डोळ्यांनी एका अरब महिलेला गाडी चालवताना पाहिलं, बरं का! भले ती महिला सौदी नव्हती. बहरिनी नागरिक होती. पण, ती सौदी भूमीवर गाडी चालवत होती, हे काही कमी नाही. नव्हे का?”

 

आता तो पाहा, राजधानी रियाधमधला ‘दिराब मोटार पार्क’ नावाचा ड्रायव्हिंग क्लब. जणू चांदीची मासोळी असावी तशी, चमचमत्या चंदेरी रंगाची, अटकर बांध्याची ‘किया स्ट्रिंगर’ ही गाडी क्लबच्या विस्तीर्ण पटांगणात सुसाट फिरते आहे. अ अॅक्सिलेटर आणि बे्रक यांच्यावर पाय ठरत नाहीयेत. गाडी तुफान वेगात पळतेय, कर्रकर्र करीत खतरनाक वळणं घेत्येय, घसरतेय, कचकचतेय, व्हाँ-व्हाँ-बूम असे फुत्कार टाकत पुन्हा वेग घेतेय. चक्रावर बसतेय राना अल् मिमोनी ही तीस वर्षीय अरब महिला. “वेग... वेग आणखी तुफान वेग आणि धुळीचे ढग सोडीत धावणाऱ्या रांगड्या, रानदांडग्या मोटारी ही काही फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हे,” ती म्हणते, “आम्ही महिला पण अशा मोटारी हाताळू शकतो.”

 

महिलांनी चालवायच्या मोटारी म्हणजे छोटुल्या, चिटूंकल्या, गोडुल्या, गोंडस्, गुलाबी मोटारी असंच काही नाही. माजलेल्या रेड्यासारख्या किंवा बैल्यासारख्या अजस्र, दांडग्या मोटारी हाताळायचं ‘मॅनली’ काम आम्हीही करू शकतो,” राना पुढे म्हणते.

 

आणि यात अजिबात अतिशयोक्ती नाही. राना अल् मिमोनी रियाधमध्येच मोटार चालवतेय आणि साधं ड्रायव्हिंग लायसन्स नव्हे, तर रेसिंग कार ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. पण, असील अल् हमाद ही तर केव्हाच रेसिंग कार ड्रायव्हर बनली आहे. उच्चशिक्षित आणि गर्भश्रीमंत असीलने परदेशी जाऊन प्रथम साधा ड्रायव्हिंग परवाना, मग काररेसिंग परवानाही मिळवला आहे. सध्या ती दक्षिण फ्रान्समध्ये ल कॅसले या ठिकाणी ‘फॉर्म्युला वन ग्रां प्री डि फ्रान्स’ या जगप्रसिद्ध मोटार शर्यतीत उतरण्यासाठी कसून सराव करत आहे.

 

राजधानी रियाधमध्ये महिलांचा एक ‘मोटर बाईक क्लब’सुद्धा निघाला आहे. ‘हार्ले-डेव्हिडसन’ या खरोखरच माजलेल्या रेड्यासारख्या दिसणाऱ्या फटफटीवरून महिला फटफटी उर्फ बाईक चालवायला शिकत आहेतया ‘मॅनली’ कामावरून आपल्याकडचा एक धमाल किस्सा आठवला. १९७० चं दशक. मुंबईच्या फिल्मी वर्तुळात कबीर बेदी आणि त्याची तत्कालीन बायको प्रोतिमा (पक्षी : प्रतिमा) बेदी हे जोडपं बरंच गाजत होतं. दोघंही उच्चशिक्षित, श्रीमंत. कबीरचा अभिनय बेताचाच असला तरी दिसायला तो खरोखरच ‘मॅनली’ होता. एकदा एका फिल्मी पार्टीत प्रोतिमा बेदी दारू पीत- पीत लोकांना सांगत होती, ‘‘मॅनली असणं ही काही कबीरची मक्तेदारी नाही. कबीर घोडेस्वारी करतो, तशी मी पण करते. कबीर शिडाची होडी (यॉटिंग) चालवतो तशी मी पण चालवते. कबीर तुफान वेगाने ‘बुलेट’ चालवतो, तशी मी पण चालवते.” इथपर्यंत ठीक होतं. यानंतर बहुधा पोटात गेलेल्या दारूने डोक्यात लाथा मारायला सुरुवात केली. त्यामुळे बाईंची जीभ बुलेटप्रमाणेच बेफाम उधळू लागली. “कबीर सिगारेटींचे डबेच्या डबे फस्त करतो, तसे मी ही करते. कबीर दारूची पिंपच्या पिंप फस्त करतो, मी ही करते, कबीर शर्ट-पँट घालतो, मी ही घालते. कबीर शर्टाची पुढची चार बटणं उघडी ठेवतो, मी ही ठेवते.” एका खोडसाळ पत्रकाराने (पत्रकार आणि खोडसाळ ही द्विरुक्ती नव्हे!) तेवढ्यात विचारलं, “कबीरला सुंदरशी दाढी आणि मिशी आहे!” यावर भडकलेल्या ‘मॅनली’ प्रोतिमाबाईंनी जे काही थयथयाटयुक्त उद्गार काढले ते सभ्यतेच्या मर्यादेमुळे इथे देता येणार नाहीत. त्यासाठी महान पत्रकार खुशवंतसिंगच हवेत.

 

असो. तर सौदीमधली महिलांनी मोटार चालवण्यावरची बंदी उठल्यामुळे एकंदरीत महिलावर्ग खुशीत आहे. याचा अर्थ लगेच महिला गल्लोगल्ली मोटारी चालवताना दिसू लागतील असा नव्हे, पण तरीही रियाधमधल्या मुख्य रस्त्यांवर बऱ्यापैकी महिला मोटार चालवताना दिसत आहेत. रियाध विद्यापीठातले प्रो.नागवा मूसा म्हणतात, “आम्ही सौदीत, रियाधमध्ये आहोत, यावर खरंच विश्वास बसत नाही.” मी परदेश प्रवास केलेला आहे. महिलांना टॅक्सी, ट्रकसुद्धा चालवताना पाहिलेलं आहे, पण ते दृश्य इथे माझ्या देशातही पाहायला मिळेल, असं कधी वाटलंच नव्हतं. काळ बदलला, बदलतोय हेच खरं.”

 

प्राध्यापक महाशयांची प्रतिक्रिया ही एकप्रकारे सगळ्याच पुरुषांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. त्यांचं नाव मात्र लईच भारी आहे. नशीब ते आपल्याकडे आले नाहीत. या सगळ्या क्रिया-प्रतिक्रिया आपल्याला मजेदार, गमतीदार किंवा क्वचित बावळटपणाच्याही वाटू शकतील. सौदीने महिलांना ड्रायव्हिंग परवाना दिला ना अखेर? ठीकच झालं. त्यात एवढी कसली बातमी असंही आपल्याला वाटू शकेल. याचं कारण या सुधारणा आपल्या समाजाने प्रारंभी जरा कुरकुरत का होईना, पण केव्हाच स्वीकारल्या आहेत, पचवल्याही आहेत. आपल्याकडच्या महिलांनी प्रथम सायकल चालवून सुरुवात केली.आज त्या नुसती प्रवासी विमानंच नव्हे, तर लढाऊ विमानंही चालवत आहेत. थोडक्यात, सर्व प्रकारची हलकी आणि अवजड वाहनंसुद्धा आपल्या महिला लीलया चालवत आहेत. आज सौदी पुरुषांना किंवा वाहतूक अधिकार्‍यांना थोडी भीती वाटतेय की, नव्यानेच मोटार चालवू लागलेल्या या महिलांना रस्त्यावरचे पुरुष वाहनचालक साईड न देणे, कट मारणे, ओव्हरटेक करणे, ओव्हरटेक करताना शेलक्या शिव्या हासडणे इत्यादी जगभरच्या सर्व पुरुष ड्रायव्हरांचे लाडके उद्योग करून सतावतील की काय? असे घडू नये म्हणून अधिकार्‍यांनी सौदी वाहतूक पोलिसांना कठोरपणे वागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

आपल्याकडे याही बाबतीत महिला मागे नाहीत, असं बरेचदा दिसतं. वर दिलेले सर्व उद्योग तर त्या लीलया करताच, पण राँग साईडने गाडी घुसवण्यात तर त्या पुरुष चालकांच्याही पुढे गेल्यातअसो, यानिमित्ताने पु.लं.च्या खट्याळपणाची आठवण झाली. पु.लं.ची स्वतःची मोटार नेहमीच सुनीताबाई चालवत असत. सफाईने गाडी चालविणाऱ्या सुनीताबाई आणि त्यांच्या बाजूला रुबाबात बसलेले पु.लं. असं दृश्य पुण्याच्या रस्त्यांत दिसत असे. त्यावर पु.लं.ची मल्लिनाथी असे,”माझी मोटारगाडी आणि संसारगाडी दोन्हीचं चक्र सुनीता सांभाळते.” तर आता पाहूया असील अल् हमाद, राना अल् मिमोनी आणि त्यांच्या अरब भगिनी फॉर्म्युला वन शर्यतीत काय-काय पराक्रम करतात ते!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@