उत्सवांच्या तोंडावर सेनेची कार्यवाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2018
Total Views |



 


डोंबिवली : खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, पावसाने उघडीप घेताच शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर रात्रीच्या रात्री सुरु करण्यात आले. पण गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेने उत्सवांच्या तोंडावर या कामाला सुरुवात केली आहे. या कामासाठी दस्तुरखुद्द खा. श्रीकांत शिंदे तथा अन्य शिवसेना पदाधिकारी आणि महापालिका अधिकार्यांनी बुधवारी रात्री उभे राहून हे खड्डे बुजवून घेतले. ठाण्यापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवलीतही उत्सवांच्या तोंडावर ही कार्यवाही करण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे.

 

पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्वच रस्त्यांतील खड्डे भरण्याचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते, पण यंदा झालेल्या जोरदार पावसात हे काम पुरते फोल ठरले आणि मग पालिकेच्यावतीने पावसाळ्यातही रस्त्यातील खड्ड्यात खडी टाकणे पावसाने उसंत घेताच काही ठिकाणी खड्डे भरण्याची कामे सुरूच होती. पण याउपर मात्र एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची परिस्थिती पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात पावसाळ्यानंतरही जैसे थे अशीच होती. दरम्यान, नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पूर्वेतील टिळक चौक ते मंजुनाथ शाळा, कल्याण शीळ रोड, सोनारपाडा, गोळवली, दावडी या ठिकाणचे रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यात आले. यावेळी खासदारांसमवेत शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे उपस्थित होते.

 

मागील वर्षीही शहरातील रस्त्यांची पुरती दुर्दशा झाल्याने खा. शिंदे तथा तत्कालीन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी नवरात्रोत्सवाच्या धर्तीवर रात्रौ उशिरा ही कामे करून घेतली होती. गुरुवारी सकाळीही शिळफाटा चौक, काटई नाका तसेच कल्याण-बदलापूर रोड जंक्शन येथील काम केले. मात्र तहान लागल्यावर विहीर खणणे या प्रचलित म्हणीप्रमाणे शिवसेनेचा कारभार सुरू असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, एमआयडीसी भागात मात्र खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने येथील नागरिकांच्या वतीने रोष व्यक्त केला जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@