विधानसभेचा मार्ग भाजपसाठी सुकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |

महापालिकेतील विजयाने बदलली राजकीय समीकरणे


 
 
जळगाव : महापालिकेत भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर आता विधानसभेचे गणित लावले जात आहे. जळगाव महापालिकेत भाजपाला जनतेने एकहाती सत्ता दिल्याने आता विधानसभेच्या निवडणुकीचे बेरीज-वजाबाकीचे गणित सुरू झाले आहे. महापालिका निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी विधानसभा निवडणुकीकडे आता लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचा महापालिकेतील विजयानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मात्र, विधानसभेचा मार्ग भाजपासाठी निश्‍चितच सुकर झाला आहे. परंतु, इतर पक्षांचा मार्ग खडतर असणार आहे. 
 
 
शहरातील भाजपाची ताकद या निमित्ताने समोर आल्याने विधानसभेची रणनीती मिळालेल्या जनमताच्या आधारे लोकांचा कल ठरवणे सोपे होणार आहे. शहरातील भाजपाला मिळालेल्या जनाधारांचा फायदा विधानसभेला होणार असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीत महापालिकेत भाजपाला जनमत मिळाल्याने आता विधानसभेची गणिते आखली जात आहेत. आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देईल, याबाबतचे समीकरण मांडण्याचे काम राजकीय अभ्यासकांकडून केले जात आहे.
 
महापालिका निवडणुकीचा प्रभाव पडणार


आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महापालिका निवडणुकीचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे भाजपाची विधानसभेच्या दृष्टीने जिल्ह्यात वाट सुकर झाली आहे. परिणामी भाजपाला या निवडणुकीत जिल्ह्यात निश्‍चितच लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत भाजपाची ताकद मागील महापालिका निवडणुकीशी तुलना केल्यास नक्कीच वाढली आहे. मतदारांचा तगडा जनाधार भाजपाला महापालिका निवडणुकीत मिळाला आहे.
 
 
महापालिकेच्या निवडणूक रणांगणात ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत सेना, भाजपाच्या उमेदवारांमध्ये खरी लढत झाली. या लढाईत भाजपाला ५७ जागा देऊन जळगावकरांनी बहुमतांचा स्पष्ट जादुई आकडा दिला, तर शिवसेनेला १५ जागांवर समाधान मानावे लागले. एमआयएमने शहरात ३ जागांवर वर्चस्व सिद्ध करीत खाते उघडले आहे. गेल्या १८ वर्षात कॉंग्रेसला शहरात खातेही उघडता आले नाही, त्याची पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीची पिछाडी कायम राहिली. अपक्ष म्हणून रणांगणात निवडणूक लढविणार्‍या बहुतांश उमेदवारांची डिपॉझिट जप्त होण्याची नामुश्की ओढविली आहे. 
 
 
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि सेनेच्या युतीबाबत चर्चा सुरू होती. मात्र युतीचं गणित बसत नसल्याने भाजपा, सेनेने स्वतंत्र निवडणूक लढविली. निवडणुकीत भाजपाला जळगावकरांनी साद दिली आहे. त्यामुळे तब्बल तीन दशकांनंतर शहरात सत्ता परिवर्तन झाले आहे. महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून खान्देश विकास आघाडीची सत्ता होती. खान्देश विकास आघाडी म्हणजे शिवसेनेने सर्व जागांवर भाजपाच्या विरोधात उमेदवार दिले होते. परिणामी भाजपा व सेनेच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत झाली. त्यात भाजपाच्या बाजूने शहरातील जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. भाजपाच्या बाजूने लोकांनी कल नोंदविला आहे. मात्र, भाजपाकडून जनतेच्या अपेक्षाही तेवढ्याच आहेत. आगामी काळात भाजपाच्या महापालिकेतील कामगिरीवर पुढच्या सत्तेची समीकरणे ठरवणार आहे. महापालिकेत भाजपाला जनतेने स्वीकारले असून सत्ताधार्‍यांना जळगावकरांनी नाकारले आहे. भाजपाला महापालिकेत जनतेने दिलेला कौल विधानसभेला पोषक असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निवडणुकीतील भाजपाचा विजय बर्‍याच काही गोष्टी सांगून जाणारा आहे. 
 
रामदास माळी
@@AUTHORINFO_V1@@