सांगलीचा निकाल काय सांगतो?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |


 


मराठाबहुल सांगलीने भाजपला स्वीकारणे, हे आजच्या महाराष्ट्राच्या स्थितीत बरेचसे बोलके आहे. मुख्यमंत्र्यांच्या जातीवरून राजकारण करणार्‍यांना ही चपराक आहेच, पण त्याचबरोबर स्वबळाची भाषा करणार्‍या शिवसेनेलाही यातून धडा घ्यायला वाव आहे.

 

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व जळगाव महानगरपालिका यांच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. राज्यात सध्या ज्या प्रकारचे वातावरण आहे, ते पाहाता हे निकाल अनेकांना आश्‍चर्याचा धक्का देणारे ठरले आहेत. जळगावचा निकाल रोचक आहे, त्याचे मुख्य कारण ही लढाई ‘एकटा भाजप विरोधात सगळे’ अशी होती. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएम अशी मंडळी भाजपच्या विरोधात उभी होती. वरवर पाहाता, यापैकी कुणीही एकमेकांशी युती-आघाडी केलेली नव्हती. मात्र, परस्परांच्या विरोधात उमेदवार उभा न करण्यापासून ते मतदार उभा न करण्यापर्यंत जे काही करता येईल ते केले होते. स्वत:च्या ‘कोअर’ मतदाराला फसवून या मंडळींनी जे काही केले त्याचेच परिणाम त्यांना इथे पाहायला मिळाले. लोकांनी आपला कौल स्पष्टपणे दिला. जळगाव म्हणजे सुरेशदादा जैन, असा एक समज गेली अनेक वर्ष होता. तो आता मोडीत निघाला आणि गिरीश महाजन हा नवा चेहरा ‘जिल्ह्याचा नेता’ म्हणून आता उदयाला आला आहे. जळगावमध्ये जे झाले ते एका अर्थी नैसर्गिक होते. सुरेशदादा जैन यांचा जो काही एककलमी कारभार होता, त्याला नवी पिढी कंटाळलेली होती. पक्षबदलाची त्यांची ही थेरं यावेळी जळगावकरांनी खपवून घेतली नाहीत. ज्या बहुमजली इमारतीचे उदाहरण ते द्यायचे, त्या इमारतीतूनच त्यांना आता हद्दपार व्हावे लागले.

 

सांगलीच्या निकालाकडे मात्र वेगळ्याप्रकारे पाहावे लागले. मराठाबहुल असलेल्या सांगलीकरांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या भाजपची निवड केली, हा अनेकांसाठी मोठा धक्का होता. कारण, सांगली हा परंपरागतरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. अनेक मोठे राजकारणी सांगलीने महाराष्ट्राला दिले. महाराष्ट्राच्या राजकारणावर, सहकारावर या मंडळींनी आपली पकड कायम ठेवली होती. आता हा झाला इतिहास, असे म्हणायची वेळ आली, त्याचे कारण काल भाजपला मिळालेला हा विजय. राज्यात मराठा मोर्च्याचे लोण आजही ओसरलेले नाही. देवेंद्र फडणवीस जातीने ब्राह्मण आहेत, त्यामुळेच ही स्थिती आली आहे, असा गैरसमज परसवून देण्यात जातीयवादी मंडळींना बर्‍यापैकी यश आले आहे. त्यामुळे तशाच आशयाच्या प्रतिक्रिया दोन्ही प्रकारच्या गटांतून येताना आजही सोशल मीडियात दिसतात. महाराष्ट्राचा मूळ बाज आजही खर्‍या पुरोगामित्वाचाच आहे. शीर्षस्थ नेतृत्वाची जात तपासण्याचे उद्योग महाराष्ट्राच्या जनतेने कधीच केलेले नाहीत. निरनिराळ्या जातीचे मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले आहेत. अंतुलेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते अमक्या जातीचे आहेत म्हणून त्यांना हटवावे असे राजकारण झालेले नाही. जातीयवादी शक्तींनी निरनिराळे बुरखे पांघरून कितीही प्रयत्न केले तरीही सद्सद्विवेकबुद्धीने काम करणार्‍या मागे महाराष्ट्रातील जनता उभी राहाते, हेच या निकालाने दाखवून दिले आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या संधीचे सोने केले. काळजीपूर्वक स्वत:ची प्रतिमा जपली. राजकीय साठमारीपेक्षा विधायक कामाला त्यांनी प्राधान्य दिले आणि त्याचेच परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यांना घेरण्याचा प्रयत्न कमी झालेला नाही. शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्याने आता त्यांना हरवायला उतरावे, यासारखा नियतीचा काव्यगत न्याय नाही. मराठा आंदोलनासारखा विषय चालू असताना स्वत:ला ‘मराठा नेता’ म्हणून दिल्लीत वावरलेल्या पवारांनी सामंजस्य घडवून आणण्यापेक्षा मुख्यमंत्री व चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप करण्यात धन्यता मानली. यामागचा उद्देश देवेंद्र फडणवीसांची सत्ता डळमळीत करणे, हाच होता. मात्र, लोकांचा फडणवीस सरकारला किती पाठिंबा आहे, हेच यातून लक्षात आले.

 

‘दिल्लीत नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र’ ही घोषणा पुन्हा नव्याने देण्याची आजची वेळ आहे. सांगलीत चमत्कार घडला, असेही काही लोकांना वाटू शकते. कारण, गेल्या खेपेला याच महानगरपालिकेत भाजपचा फक्त एक नगरसेवक निवडून आला होता. हा विजय एका अर्थाने राष्ट्रीय संघटन कौशल्याचासुद्धा आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातले ३८ विस्तारक या सांगलीत गेले काही महिने अतोनात कष्ट करीत होते. प्रभागरचना स्तरापर्यंत ही योजना केली गेली होती. त्याच्याखाली बूथ स्तरापर्यंत पंधरा ते सोळा सक्रिय कार्यकर्ते उभे करण्यापर्यंत संघटनेने इथे मजल मारली होती. त्यामुळे एका स्तरापर्यंत अभूतपूर्व अशा प्रकारचे संघटन या ठिकाणी उभे राहिले होते. जातीला वरण्याचा भारतीय मतदाराचा स्वभाव इथे नव्हता, असे नाही; पण मराठाबहुल असलेल्या इथल्या मतदारांसमोर एक वेगळे चित्र उभे करण्यात कार्यकर्त्यांना यश आले. हे चित्र सुशासनाचे होते. मोठी रेषा मारल्याने अर्थात जातीची रेषा लहान झाली. माध्यमांमध्ये आणि मुक्त माध्यमांमध्ये काय प्रकाशित होते, यापेक्षा मतदार काय वागतो याला अधिक महत्त्व असते. मोदींची लाट ओसरली आहे. मराठा मोर्चामुळे फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद जाणार आहे, अशा गमजा पसरविणार्‍यांना या निकालाने थोबाडीत लगावली आहे. आता राहिला प्रश्‍न शिवसेनेचा तर स्वबळावर सगळे काही करण्याच्या गप्पा मारून शेवटी सत्तेचे वाटेकरी राहणार्‍या शिवसेनेचे सगळेच डाव सातत्याने उलटेच पडले आहेत. पालघर असो, भंडारा, गोंदिया असो एकटी निघालेली शिवसेना सगळीकडेच तोंडावर पडलेली दिसते, पण हा सुंभ २०१९ ला सगळे पडल्याशिवाय जाणार नाही, यात शंका असायचे कारण नाही.

@@AUTHORINFO_V1@@