ते पंधरा दिवस : ३ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018   
Total Views |
 

 
 
 
आजचा दिवस हा महाराजा हरीसिंह यांना भेटण्याचा होता. या संबंधीचे औपचारिक पत्र, काश्मीर संस्थानाचे दिवाण, रामचंद्र काक यांनी गांधीजींच्या श्रीनगर मध्ये आगमन झाल्याच्या दिवशीच दिलेले होते. आज ३ ऑगस्टची सकाळ गांधीजींसाठी नेहमीसारखीच होती. ऑगस्ट महिना असला तरी किशोरीलाल सेठी यांच्या घरी तशी बऱ्यापैकी थंडी होती. आपल्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणे गांधीजी अगदी काळोख्या पहाटेच उठले होते. त्यांची नात ‘मनु’ ही तर त्यांची जणू सावलीच होती. त्यामुळे गांधीजींना जाग आल्यावर ती देखील उठली.
 
  
मनु गांधीजीं बरोबर झोपायची. साधारण एक वर्षापूर्वी, आपल्या नौखालीच्या दौऱ्यात, गांधीजी मनुला कुशीत घेऊन झोपायला लागले. हा त्यांचा एक ‘सत्याचा’ प्रयोग होता. अत्यंत पारदर्शी अन् नितळ मन असलेल्या गांधीजींना यात काही चुकीचे आहे, असे वाटलेच नाही. मात्र या बातमीचा खूप गवगवा झाला. कॉंग्रेसची नेते मंडळी कानकोंडी झाली. देशात गांधीजींच्या विरोधात जनमत प्रकट होऊ लागले. शेवटी बंगालचा दौरा संपवून गांधीजी जेव्हा बिहारच्या दौऱ्यावर निघाले, तेव्हा मनु त्यांच्यापासून वेगळी झाली.
  
 
इथे श्रीनगरला मात्र असं नव्हतं. ती बातमी खूप मागे पडली होती आणि आपल्या नातीबरोबर गांधीजींचं राहणं ही काही कुतूहल चाळवणारी गोष्ट आता उरली नव्हती. सूर्योदयापूर्वी गांधीजींची प्रातःप्रार्थना संपलेली होती, आणि ते आपल्या राहायच्या जागेला स्वच्छ करण्याच्या मागे लागले होते.
 
 
सर्व आवरून साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास गांधीजी काश्मीरचे महाराजा हरीसिंह यांच्या ‘गुलाब भवन’ या राजप्रासादात प्रवेशते झाले. जरी गांधीजींची ही भेट महाराजांच्या इच्छेविरुद्ध होती, तरीही महाराजांनी गांधीजींच्या स्वागतासाठी कुठलीही कसर सोडलेली नव्हती. स्वतः महाराज, महाराणी तारा देवींसह राजप्रासादाच्या आवारात गांधीजींच्या स्वागताला उभे होते. युवराज करण सिंह देखील तेथे शाही इतमामाने स्वागताला हजर होते. महाराणी तारा देवींनी गांधीजींचे टिळा लाऊन, पंचारती ओवाळून परंपरागत स्वागत केले. (त्या ‘गुलाब भवन’ या राजप्रासादात ज्या वृक्षाखाली गांधीजींची अन महाराजांची भेट झाली, त्या झाडावर, या भेटीची आठवण म्हणून एक ताम्र पट्टिका लावली आहे. मात्र त्यावर या दोघांच्या भेटीचा महिना चुकीचा टाकला आहे. गांधीजी ऑगस्ट मधे महाराजांना भेटले. पट्टीवर मात्र जून, १९४७ लिहिले आहे.)
 
 
 
 
 
त्या राजप्रासादात गांधीजींच्या वर कसलेही दडपण जाणवत नव्हते. अत्यंत सहजतेने ते तिथे वावरत होते. महाराजांच्या अन् गांधीजींच्या भरपूर गप्पा झाल्या. मात्र यात कुठेही गांधीजींनी महाराजांना ‘भारतात सामिल व्हा’ असं म्हटलं नाही. तसं म्हटलं असतं तर, गांधीजींच्या मते, ते बरोबर ठरलं नसतं. त्यांच्या प्रतिमेला तो धक्का बसला असता. गांधीजींच्या अनुसार, ते भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पितृपुरुष होते. मात्र त्यांच्या दुर्दैवाने त्यांना हे ठाऊक नव्हते की पाकिस्तान मागणारे मुस्लिम नेते त्यांना ‘हिंदूच’ मानतात. त्यांचा द्वेष करतात. आणि म्हणूनच, पाकिस्तानमध्ये गांधीजींना काहीच स्थान नव्हते...!
 
 
‘इंग्रज निघून गेल्यानंतर काश्मीर संस्थानाने कोणती भूमिका घेतली पाहिजे’ यावर गांधीजींना काहीच बोलायचे नसल्याने राजकीय चर्चा फारशी झाली नाही. मात्र गांधीजींच्या या भेटीचा परिणाम, नेहरुंचा काश्मीर अजेंडा राबविण्यात झाला. ३ ऑगस्टला ही भेट झाली आणि १० ऑगस्टला, महाराजांचे विश्वासपात्र आणि नेहरूंना कैदेत टाकणारे, काश्मीरचे दिवाण रामचंद्र काक यांना महाराजांनी सेवेतून मुक्त केलं. दुसरा परिणाम म्हणजे नेहरूंचे खास मित्र, शेख अब्दुल्ला यांची काश्मीरच्या तुरुंगातून दिनांक २९ सप्टेंबरला सुटका झाली.
 
 
वरवर बघता तरी गांधीजींच्या या भेटीचे फलित इतकेच दिसते. गांधीजींनी या दोन मागण्यांच्या ऐवजी किंवा या मागण्यांच्या जोडीने महाराजांना भारतात सामिल होण्याची विनंती केली असती, तर कदाचित अक्टोबर १९४७ ची वाट न बघता, ऑगस्ट १९४७ मध्येच काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले असते. आणि आज उद्भवलेला काश्मीरचा प्रश्न समोर आलाच नसता... पण हे व्हायचे नव्हते..!
 
मंडी. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं लहानसं शहर. मनु ऋषींच्या नावावर याचे नाव मंडी झाले. व्यास (बियास) नदीच्या किनाऱ्यावर असलेलं नयनरम्य स्थळ. १९४७ मध्ये हे एक देखणं, टुमदार संस्थान होतं. मात्र या संस्थानाच्या राजाच्या मनात, इंग्रजांच्या जोखडातून सुटल्यानंतर आपले स्वतंत्र राज्य हवे हा विचार घोळत होता. देशात, या संस्थानिकांच्या ‘नरेंद्र मंडळ’ या संस्थेत प्रचंड अस्वस्थता होती. तशातच शेजारच्या ‘सिरमौर’ संस्थानाच्या राजानेही, भारतात विलीन न होता, आपले संस्थान वेगळे ठेवण्याचे ठरविले. आता इतकी लहान लहानशी संस्थानं स्वतंत्र राहणे शक्य नाही, हे त्यांनाही कळत होतंच. काश्मीरचे महाराजासुद्धा आपलं संस्थान स्वतंत्र ठेवण्याच्या विचारात आहेत, हे या राजांना कळलं.
 
 
 
 
 
तेव्हा, महाराजा हरीसिहांबरोबर, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि शिमल्याच्या पहाडी राज्यांचा एक ‘बृहद संघ’ बनविण्याची या दोन्ही राजांनी योजना आखली. गेल्या आठवड्यातच हे दोघं, लॉर्ड माउंटबेटन यांना भेटले होते. या योजनेवर विचार करण्यासाठी त्यांना थोडा अवधी हवा होता. त्यामुळे भारतात सामिलीकरणाच्या पत्रावर इतक्यात स्वाक्षरी करता येणार नाही, तेव्हा ती करण्यासाठी जरा जास्त वेळेची मागणी त्यांनी केली.
 
 
दिल्लीतील आपल्या भव्य आणि भपकेबाज व्होईसरॉय कार्यालयात बसून या क्षणी लॉर्ड लुई माउंटबेटन, त्या राजांचेच पत्र परत वाचत होते. जितके राजे स्वतंत्र राहण्याचा आग्रह करतील, तितकी देश सोडताना इंग्रजांच्या मागची कटकट वाढणार होती. आणि म्हणूनच, अशा लहान-लहान राज्यांनी स्वतंत्र राहणं, माउंटबेटनला आवडणारं नव्हतं. तरीही लोकशाहीची आणि आपल्या पदाची चाड राखत माउंटबेटननी सरदार पटेलांना या संदर्भात पत्र लिहिण्यास घेतलं. ३ ऑगस्टच्या दुपारी सरदार पटेलांना पत्र लिहिताना, या पत्रावर अनुकूल निर्णय होणार नाही हे माहीत असूनही, माउंटबेटन यांनी सिरमौर आणि मंडीच्या राजांना सामिलीकरणाच्या पत्रावर (विलय पत्रावर) स्वाक्षरी करण्यास थोडा अधिक वेळ देण्याची पटेलांना विनंती केली.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज दिल्लीतच होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मागे कामांची जंत्रीच लागलेली होती. त्यांच्या ‘शेड्युल कास्ट फेडरेशन’ या पक्षाचे कार्यकर्ते देशभरातून त्यांना विविध कामांसाठी भेटायला येत होते. पत्रव्यवहार बराच करायचा होता. या सर्वांत बाबासाहेबांच्या आवडत्या वाचनासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नव्हता. पण ही अशी परिस्थिती बाबासाहेबांना आवडत होती. किंबहुना काम जास्त असेल आणि त्या कामात बुडून जायला होत असेल, तर बाबासाहेबांसाठी ती पर्वणी असायची.
 
 
म्हणूनच गेल्या आठवड्यात जेव्हा नेहरूंनी त्यांना पुढील मंत्रिमंडळात सामील होण्यासंबंधी विचारले, तेव्हा बाबासाहेबांनी सकारात्मक प्रतिसाद तर दिला, पण ते म्हणाले, ‘कायदे मंत्रालयात फारसे काम नाही. तेव्हा मला जरा जास्त कामाची जबाबदारी द्या. नेहरू हसत म्हणाले होते, नक्कीच. एक बरेच मोठे काम तुमच्याकडे येऊ घातलंय..’ आणि आज दुपारी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचं ते पत्र बाबासाहेबांच्या हाती पडलं. या पत्राद्वारे त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं.
 
 
बाबासाहेबांसाठी आणि त्यांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षासाठी हा फार महत्वाचा आणि आनंदाचा प्रसंग होता..!
दिल्ली मधल्या त्या ऑगस्टच्या भयानक गर्मीत सिरील रेडक्लिफ साहेबांचे फार हाल होत होते. ब्रिटनचा हा निर्भिक आणि निष्पक्ष न्यायाधीश भारतात येऊन विभाजनाच्या योजनेवर काम करायला तयार झाला, कारण पंतप्रधान अॅटलींनी त्यांच्या न्यायबुद्धीला साद घालत तशी गळच घातली होती. भारताबद्दल विशेष माहिती नसलेली व्यक्तीच माउंटबेटन यांना विभाजनाची रेषा ठरवायला हवी होती. न्यायमूर्ती रेडक्लिफ यांना भारताबद्दल काहीच माहिती नव्हती.
 
 
मात्र ‘माहीत नसणं’ हे किती मोठं ओझं आहे ते या रेडक्लिफ साहेबांना छानसंच समजलं होतं. विशाल पसरलेला भूप्रदेश, नद्या, नाले, कालव्यांचे प्रचंड असे जाळे. आणि या अशा विस्तीर्ण भूप्रदेशावर एक रेघ ओढायची, की अनेकांचं होत्याचं नव्हतं होईल. पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन क्षणार्धात परकी होईल. ती एक रेघ अनेकांना देशोधडीला लावेल...
 
 
रेडक्लिफ साहेबांना याची पूर्ण जाणीव होती आणि ते आपल्या परीनं, निष्पक्षतेनं विभाजन करण्याचा प्रयत्न ही करत होते. त्यांच्या बंगल्यातल्या तीन खोल्या तर कागदपत्रे आणि वेगवेगळ्या नकाशांनी ओसंडून वाहत होत्या. आज ३ ऑगस्टला त्यांचं बरचसं काम संपलं होतं. पंजाबच्या काही विवादीत जागा शिल्लक होत्या, जिथे ते शेवटचा हात फिरवत होते. आणि तशातच त्यांना मेजर शॉर्टने लिहिलेले पत्र मिळाले. हा माणूस पूर्णपणे सैनिकी खाक्याचा, अगदी खास ब्रिटीश. जनसामान्यांच्या प्रतिक्रिया रेडक्लिफ साहेबांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याने हे पत्र लिहिले होते. त्यातले त्याचे शब्द होते, “काम करताना लोकांची समजूत ही आहे की माउंटबेटन जसे सांगतील तसे रेडक्लिफ निर्णय देणार...”, रेडक्लिफ विचार करू लागले. पत्राचा हा भाग काहीसा खरा होता. माउंटबेटन यांचा प्रभाव रेडक्लिफवर निश्चितच होता...!
 
तीन ऑगस्ट. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास १७, यॉर्क हाऊस या जवाहरलाल नेहरूंच्या राहत्या घरातून एक प्रेसनोट बाहेर पडली. धामधुमीचे दिवस असल्याने तशा रोजच प्रेसनोट निघायच्या किंवा प्रेसवार्ता व्हायच्या. पण आजची ही प्रेसनोट विशेष होती. या प्रेसनोटला प्रचंड ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होणार होतं.
 
या प्रेसनोट द्वारे नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची नावे घोषित केली होती. स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ. आणि म्हणूनच या प्रेसनोटचे एक आगळेवेगळे महत्त्व होते. त्यात नेहरूंनी आपल्या सहकाऱ्यांची क्रमानुसार दिलेली नावं होती -

⦁ सरदार वल्लभभाई पटेल
⦁ मौलाना अबुल कलाम आझाद
⦁ डॉ. राजेंद्र प्रसाद
⦁ डॉ. जॉन मथाई
⦁ जगजीवन राम
⦁ सरदार बलदेव सिंह
⦁ सी. एच. भाभा
⦁ राजकुमारी अमृत कौर
⦁ डॉ. बी. आर. आंबेडकर
⦁ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी
⦁ षण्मुखम चेट्टी
⦁ नरहर विष्णु गाडगीळ
 
 
 
 
 
या १२ सदस्यांमध्ये राजकुमारी अमृत कौर या एकच महिला होत्या. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेड्युल कास्ट फेडरेशन या पार्टीचे, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी हे हिंदू महासभेचे तर सरदार बलदेव सिंह हे पंथिक पार्टीचे प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात घेतले होते.
तिकडे दूर राम मनोहर लोहियांची एक प्रेसनोट वर्तमानपत्रांच्या कार्यालयात पोहोचली होती, जी अनेक गोवेकरांचा अपेक्षाभंग करून गेली. लोहियांनी या प्रेसनोटद्वारे गोवेकरांना कळविले की ‘गोव्याचे स्वातंत्र्य हे काही भारताच्या स्वातंत्र्याबरोबर होणं शक्य नाही. त्यामुळे गोवेकरांनी त्यांचा स्वातंत्र्य लढा असाच पुढे चालू ठेवावा....!”
 
 
या सर्व घटनांपासून आणि विभाजनाच्या वणव्यापासून फार दूर, तिकडे महाराष्ट्रात देवाच्या आळंदीला कॉंग्रेसमध्ये काम करणाऱ्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या बैठकीचा आज समारोपाचा दिवस होता. कालपासून कार्यकर्त्यांचं मंथन चाललेलं होतं. शेवटी कॉंग्रेस अंतर्गतच साम्यवादी विचारांचा, शेतकरी कामकरी लोकांच्या हिताचा विचार करणारा गट हवा असा निर्णय झाला. शंकरराव मोरे, केशवराव जेधे, भाऊसाहेब राऊत, तुळशीदास जाधव इत्यादी मंडळींनी या गटाचं नेतृत्व सामुहिकपणे करावं असं ठरलं.  महाराष्ट्रात एका नवीन साम्यवादी पक्षाचा उदय होत होता....
 
श्रीनगरमधील मुक्कामाचा गांधीजींचा आज शेवटचा दिवस. उद्या सकाळी ते जम्मूसाठी कूच करणार होते. त्यामुळे आज संध्याकाळच्या मेजवानीचा मान बेगम अकबर जहाँ यांचा होता. त्यांनी गांधीजींना रीतसर संध्याकाळच्या मेजवानीचे निमंत्रण दिले होते. शेख अब्दुल्लांवर, गांधीजींच्या असलेल्या स्नेहामुळे, त्यांनी नाही म्हणण्याचे काही कारणच नव्हते.
 
शेख अब्दुल्ला तुरुंगात होते. तरी त्यांच्या अनुपस्थितितही बेगम साहेबांनी मेजवानीचा घाट उडवून दिलेला होता. नेशनल कॉन्फ्रेसचे कार्यकर्ते सर्व व्यवस्था बघत होते. खुद्द बेगम साहिबा आणि त्यांची मुलगी खालिदा, या दोघी गांधीजींच्या स्वागताला दारावर उभ्या होत्या.
 
 
 
 
गांधीजींनी तो राजेशाही थाट बघितला अन् ते अस्वस्थ झाले. त्यांच्या कल्पनेतली मेजवानी इतक्या शाही इतमामाची असूच शकत नव्हती. तरीही, बेगम साहिबांजवळ आपली माफक नाराजी व्यक्त करत, गांधीजी पूर्ण वेळ त्या मेजवानीत थांबले...!
 
 
तीन ऑगस्टची अस्वस्थ रात्र पुढे पुढे सरकत होती. लाहोरच्या मार्गाने, पठाणकोटच्या मार्गाने, तिकडे बंगालमध्ये लाखो संपन्न कुटुंब, शरणार्थी म्हणून विभाजित होणाऱ्या भारताकडे मजल दर मजल करत सरकत होते. जीवाची भीती, आयुष्यभराची मिळकत सोडून शरणार्थी बनण्याचे वैफल्य, भूक, तहान यांनी थकलेलं शरीर, पोरांचे न बघवणारे हाल.... अधिकृतरित्या भारताला विभाजित व्हायला आता फक्त १२ रात्रीच उरलेल्या होत्या..!
 
 
 
 
प्रशांत पोळ
‘मैत्र’, ११२६, समाधान हॉस्पिटल च्या बाजूला,
राईट टाऊन,
जबलपुर – ४८२ ००२
भ्रमणध्वनी : ०९४२५१ ५५५५१ ई-मेल : [email protected]
 
 
 
 मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : २ ऑगस्ट १९४७
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@