डोळ्यात काड्या खोचल्याने विद्यार्थी गंभीर जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |

डांभुर्णीतील अघोरी प्रकार; संशयित ताब्यात, गूढ कायम

डांभुर्णी ता.यावल :
येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत तिसरीच्या वर्गातील रुपेश जयराम कोळी याच्या दोन्ही डोळ्यात काड्या खोचण्याचा भयावह व संतापजनक प्रकार घडला आहे. याबाबत संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला यावलला हलवत असताना संतप्त जमावाने त्याच्या वाहनाची तोडफोड केली. यामुळे परिसरात खळबळ माजली असून तर्कवितर्क होत आहेत. गूढ उकलत संबंधित नराधमांना अटक करण्यात यावी, अशी संतप्त जनतेची मागणी आहे. दरम्यान, गावात पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
 
 
रुपेश आज सकाळी शाळेत आला होता. परीक्षा सुरू असल्याने तो सकाळपासून दुपारी दीडपर्यंत पेपर लिहित होता. नंतर मधल्या सुटीत रुपेश बाहेर गेला खरा, पण नंतर तो शाळेत परतलाच नाही. पण दुपारी शाळेत येणार्‍या काही विद्यार्थ्यांना शाळेसमोर असलेल्या जीर्ण व निकामी शौचालयाच्या मागे रडण्याचा आवाज आला, त्यांनी शोध घेतला असता रुपेशच्या डोळ्यात मोठ्या काड्या खोचलेल्या व तो जखमी अवस्थेत व रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांनी आरडाओरड करत शिक्षकांंपर्यंत ही बाब कळविली. घटनेचे माहिती वायुवेगाने पसरली, अनेक गावकर्‍यांनी शाळेकडे धाव घेतली. रुपेशचे डोळे पूर्णपणे बंद सुजलेल्या अवस्थेत आहेत, त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. त्याचे आई-वडील शेतात मोलमजुरी करून संसाराचा रहाटगाडा चालवतात.
 
 
घटनेची माहिती कळताच पो.नि.परदेशी यांनी घटनास्थळी हे.कॉं.सुनील तायडे व सहकारी विकास सोनवणे यांना पाठवले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून काठ्या, दारूच्या बाटल्या, पेन, ठिबक नळी घटना स्थळावरून ताब्यात घेतल्या. रुपेश यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कळते.
 
 
डॉ. अभिषेक ठाकूर यांनी जिल्हा रुग्णालयात रुपेशची सर्वस्वी जबाबदारी घेत वैद्यकीय अधिकारी किरण पाटील यांच्या करवी रुपेशवर प्राथमिक उपचार सुरू केले आहे. माहितीनुसार यावल पोलीस ठाण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका ऊर्मिला ठाकूर यांच्यासह शिक्षक बसून होते व संशयितास ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेमागचे गूढ उकलायचे आहे. रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.
 
 
क्रौर्याचा कळस, नागरिक संतप्त
ही भीषण व क्रौर्याचा कळस असलेली घटना दुपारी रहदारी सुरू असताना व शाळेच्या परिसरात भरदिवसा घडल्याने तर्क- वितर्क लढवले जात आहेत. संशयावरून गावातील १७ वर्षीय मुलास ताब्यात घेण्यात आले असून सरपंच यांनी त्यास यावल पोलिसांच्या ताब्यात दिले आले आहे. संशयितास सरपंचांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आणि स्वत:च्या वाहनाने त्यास यावलला नेले. जनतेने गाडीभोवती जमत गाडी अडवण्याचा प्रयत्न करीत तीव्र संताप व्यक्त केला व वाहनाच्या काचाही फोडल्या.
 
@@AUTHORINFO_V1@@