विवेकानंद प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी घडविली नृत्यगीतमय ‘रंग बावरा श्रावण’ची सफर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |
 
जळगाव :
येथील केशवस्मृती सेवा संस्था समूह संचालित विवेकानंद प्रतिष्ठानच्या ३०० वर विद्यार्थी विद्यार्थिनींनी मंगळवारची सायंकाळ सुरेल स्वरांनी संस्मरणीय केली. निमित्त होते ‘रंग बावरा श्रावण’ या स्वरमय गीतगायन संध्येचे.
 
 
जळगाव पीपल्स् बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील प्रमुख पाहुणे होते. केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, सचिव राजेंद्र नन्नवरे, पूनमताई मानुधने, विनोद पाटील आदींची विशेष उपस्थिती होती. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचीही उपस्थिती होती.
 
 
कांताई सभागृहात सुमारे अडीच तास श्रावण गीतांचा बहारदार नजराणा प्रतिष्ठानच्या सर्व शाळांच्या सुमारे ३०० कलावंत विद्यार्थ्यांनी सादर केला. विशेष म्हणजे काही गीते गाणे शिक्षकांनी स्वरचित व संगीतबद्ध केलेली होती. त्यात सौ. स्वाती बेंद्रे रचित ‘पावसाची गंमत’ या गीतास विजय पाटील यांनी संगीत साज चढविला होता.
 
 
मिलिंद देशमुख रचित ‘नभाचा गडगडाटी इशारा’ या गीतास सौ. स्वाती देशमुख यांनी संगीतबद्ध केले होते. सौ. शुभदा नेवे यांनी ‘पाऊस धारा’, ‘गाणे गाती झिंमड’ यास त्यांनी संगीतबद्ध केले. रवींद्र भोयटे रचित ‘सप्तरंगाच्या नभी आकाशी’ हे स्वाती देशमुख यांनी संगीतबद्ध केले होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ. मंजूषा भिडे, वेणू मोराणकर, अभिजित जाधव यांनी केले. सांस्कृतिक समन्वयक किरण सोहळे, विभागप्रमुख दिनेश ठाकरे, हेमराज पाटील, डी.वाय.पाटील, जयंत टेंभरे, शशिकांत पाटील, सौ. योगिता शिंपी आणि सहकार्‍यांनी कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन केले.
 
 
सभागृहाबाहेर दर्शनीजागी रेखाटलेली सुंदर रांगोळी लक्ष वेधून घेत होती. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे काही शिक्षकांनी स्वरचित आणि संगीतबद्ध केलेली गाणीही सादर झाली. सारा परिसर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि रसिकांनी फुलून गेला होता.
हसरा-नाचरा जरासा साजिरा श्रावण आला, श्रावण मासी हर्ष मानसी, पाऊस धारा गाणे गाती, झिमझिम पाऊस ताडाचा, नभाचा गडगडाटी इशारा इ. विविध श्रावण गीतांनी वाहवा मिळाली.
 
 
पार्श्‍वभूमीला पडद्यावर श्रावणातील निसर्गाची, पावसाची सप्तरंगी चित्रे दाखविण्यात येत होती. त्यामुळे कार्यक्रम अधिकच देखणा व मनभावन झाला. याच वेळी गीत संगीतावर विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटन केले. कांताई सभागृह, गॅलरी आणि मोकळी जागा श्रोत्यांनी तुडुंब भरली होती. परिसरातही सुमारे ५०० च्या वर विद्यार्थी पालकांची उपस्थिती होती.
@@AUTHORINFO_V1@@