आर्या फाउंडेशनतर्फे केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |

८ टन जीवनावश्यक साहित्य रवाना, डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या प्रयत्नांना यश

जळगावः
आर्या फाउंडेशनच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून तब्बल ८ टन जीवनावश्यक साहित्य सोमवारी रवाना करण्यात आले. आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्रपरिवाराला केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी धनादेशाद्वारे मदत पाठविली तर काहींनी जीवनावश्यक साहित्य दिले. आर्या फाउंडेशनच्या या उपक्रमात सैन्यातील काही अधिकारी, जवान मदतीसाठी धावून आले असून त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर वैयक्तिक मदत सोपविली आहे. फाउंडेशनचे आजपर्यंतचे शहीद जवानांच्या कुटुंबासाठी केलेले कार्य तसेच डॉ. धर्मेंद्र पाटील आणि चमूची जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेवर सैन्याच्या खांद्याला खांदा लावून सुरू असलेली आरोग्य सेवा होय. यासोबतच प्रशासकीय अधिकारी यांनी या संस्थेवर विश्वास दाखवत मदतीचा हात दिला आहे. देणगीदार हे मुख्यतः जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील असून आर्या फाउंडेशनच्या आजवरच्या कार्यावर विश्वास ठेवून सर्वांनी डॉ. धर्मेंद्र पाटील यांना या सद्कर्मासाठी मदतीचा हात पुढे करत केरळवासीयांना संस्थेद्वारे आपली मदत पोहोचवली.
 
 
मदतीचे हे साहित्य नाशिक रेल्वेस्थानकावरून पाठविण्यात आले. फाउंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक ऋषिकेश परमार यांनी बरेच साहित्य नाशिक येथून डॉ.पाटील यांचे सूचनेनुसार खरेदी केले. त्यासाठी जळगावहून संस्थेने संबंधितांना धनादेश दिलेत. सर्व जीवनावश्यक साहित्याचे संकलन करणे आणि रेल्वेस्थानकावरील कार्यालयीन औपचारिकता पूर्ण करण्याकामी ऋषिकेश परमार यांनी परिश्रम घेतले. नाशिक रेल्वेस्थानकावर साहित्य उतरविणे आणि रेल्वेत चढविण्यासाठी भारतीय सैन्याच्या उपस्थित जवानांनी साहाय्य केले. जीवनावश्यक साहित्यमध्ये तांदूळ, बिस्कीट, मुलामुलींचे, महिलांसाठीचे नवीन कपडे, लुंगी, चादर, सॅनिटरी नॅपकिन, मिनरल वॉटर बॉटल, औषधी इत्यादींचा समावेश आहे.
 
 
मदत ही जिल्हाधिकारी, कोची यांच्या नावे पाठविण्यात आली.त्यासाठीचे विनंती पत्र संस्थेकडून पाठविण्यात आले आहे.
गेल्या आठवडाभरापासून आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांच्यासह सचिव डॉ.राहुल महाले, खजिनदार शलाका पाटील, डॉ.राहुल महाजन, डॉ.जितेंद्र मोरे, रवींद्र पाटील नाशिकचे समन्वयक ऋषिकेश परमार, अक्षय भावसार यांनी मदतनिधी, जीवनावश्यक साहित्य जमा करणेसाठी प्रयत्न केलेत.
 
कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या अखंड भारतवासीयांच्या सुख, दुःखात उभे राहणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश असून केरळवासीयांसाठी ही मदत म्हणजे संस्थेचा खारीचा वाटा आहे
- डॉ.धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, आर्या फाउंडेशन, जळगाव
@@AUTHORINFO_V1@@