आत्मानंदात रमणारा श्रावण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |


 

शेतकऱ्याचा मित्र होऊन राहणं पसंत करतो. सगळा निसर्ग पूजनातून मनात उतरत जातो. रंगीबेरंगी फुलांनी रानं नटतात. सगळीकडे हिरवाई दृष्टीस पडते. रंगांचा अनोखा मेळ बघताना श्रावण अधिकच सुंदर होऊन जातो.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 

सगळी सृष्टी हिरव्या रंगात रंगून गेलेली असते. सरिता संतुष्ट होऊन वेगानं खळाळत असतात. उंच डोंगरावरून जल अवनीवर झेपावत असतं. त्यावेळी सर्वत्र तुषारांचा खेळ गतिमान होतो. फेसाळणाऱ्या जलधारांखाली चिंब भिजण्यात आगळा आनंद असतो. श्रावणात आभाळ भरून येतं. घननिळा बरसत असतो.श्रावण चैतन्याचं रसरशीत, ठसठशीत लेणं लेऊन नटतो. शिव आणि शक्तीच्या पूजनात रममाण होतो. भोळा शंभू जलाभिषेकानं प्रसन्न होतो. त्रीदल असणारं बिल्वपत्र अर्पण केलं की तो खूष होऊन जातो. पंचमहाभूतांच्या तत्त्वांसवे क्रीडा करतो. त्याचप्रमाणे पृथ्वीतत्त्वामधील बेल आणि शुभ्रधवल फुलांनी तो खुलतो. मूठभर तांदूळ मन:पूर्वक अर्पण केले की, भक्तांवर कृपा करतो. श्रावणात महादेव निसर्गासवे सर्वत्र संचार करतो. डोईवर शुभ्र गंगा धारण करून शांत होतो. गिरीकंदात तप करणारी पार्वती-शक्ती मंगळागौरीच्या रूपात सख्यांसह खेळते. फुगडी, झिम्मा पावसासोबत अधिकच रंगतो. शक्तिरूपिणी पार्वती कधी मंगळागौरी होऊन फुलांसवे, गाण्यांसवे, खेळांसवे घराघरात अवतीर्ण होते, तर कधी जिवतीचं रूप घेऊन बालकांचं अनिष्ट गोष्टींपासून रक्षण करण्यास पुढे येते. पुरणाच्या आरतीने, आघाडा, दूर्वा, केनांच्या माळा परिधान करते. श्रावण सोमवार आणि शुक्रवार म्हणजे शिव आणि शक्तीचं स्मरण, पूजन, अर्चनाचे खास दिवस. पार्वतीमाता आणि सकल सृष्टीचं रसरशीत, सृजनात्मक चैतन्य, तर देवांचा देव महादेव ॐकारातून ध्यानावस्थेत जातो.

 

एकीकडे योग, तर दुसरीकडे भोग असा संमिश्र स्वरूपाचा श्रावण! एकीकडे निसर्गाचं पाऊसगान चालू असतं, तर दुसरीकडे मंत्रांचा नाद घुमत असतो. शंकराच्या गळ्यात नागरूपात राहून त्याच्या स्पर्शाने, सहवासाने तो डोलू लागतो. दूध-लाह्याने खूष होतो. शेतकऱ्याचा मित्र होऊन राहणं पसंत करतो. सगळा निसर्ग पूजनातून मनात उतरत जातो. रंगीबेरंगी फुलांनी रानं नटतात. सगळीकडे हिरवाई दृष्टीस पडते. रंगांचा अनोखा मेळ बघताना श्रावण अधिकच सुंदर होऊन जातो. नारळी पौर्णिमेला सागराला साद घालणारा श्रावण! नारळ, फूलं, आरती करून सागराचं पूजन हा एक उत्कट सोहळा असतो. सागरामध्ये सगळ्या सरितांनी साधलेलं ऐक्य मानवाला खूप काही शिकवणारं आहे! जलतत्त्व आणि पृथ्वीतत्त्व एकोप्यानं नांदून पूजनास पात्र ठरतात. देव आणि देह एकमेकांसवे राहून आनंद उपभोगतात. सृष्टीची पृष्टता व भगवंताची भक्ती पुष्ट करण्यास साहाय्य करणारा श्रावण! श्रावण कृष्ण आणि द्रौपदीच्या बंधू-भगिनीच्या नात्याला उंचीवर घेऊन जातो. रेशमी धाग्याची राखी भगिनीच्या रक्षणाची ग्वाही देते. भगवान श्रीकृष्ण पूर्णावतारी असून कोणत्याही युगात बहिणीचं सर्वांगांनी संरक्षण करण्यास तत्पर असतो. श्रावण मोठा भाग्यवान! विविध सणांची रेलचेल आणि पूजा-पोथीसह पंचपकान्नांचा नैवेद्य ग्रहण करणारा! विविध पदार्थांचा ‘गोपाळकाला’ मनापासून ग्रहण करणारा! विषमतेला दूर सारणारा! भेदाभेद मावळून टाकणारा! पंचमहाभूतांशी सहजपणानं एकरूप होणारा श्रावण! इंद्रधनूच्या सप्तरंगी कमानीसह साताचा मेळ घालून रंगामध्ये रंगणार! क्षणात ऊन तर क्षणात पाऊस याचा अनोखा खेळ खेळण्यात रमणारा मोठा लोभसवाणा श्रावण! श्रीकृष्णाच्या बासरीचा नाद श्रवण करण्यात नादावून गेलेला श्रावण! डोंगर कपारीमधून वारा आणि पाऊस यांचं आगळवेगळं संगीत श्रवण करणारा रसिक श्रावण! महादेव, मंगळागौर, जिवंतिका पूजनात तल्लीन झालेला श्रावण! मनामनात आठवणींचा फेर धरून नृत्य करणारा श्रावण! सृष्टीच्या चैतन्याची ओढ त्याच्या तनामनातून प्रतित होते. अवघं विश्व विविध भाव-पूजन-रंग- नादांसह भारून टाकणारा श्रावण! श्रावण मोठा अजब जादूगार! त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांचं कौतुक मनात दाटून येतं. ज्ञानेश्वर माऊली आणि श्रावणाचं आगळं नातं आहे. निसर्गाला भगवंताचं, माऊलीचं भजन करावंसं वाटतं. कृष्णमेघांमधून बरसणाऱ्या जलधारा माऊलींवर मन:पूर्वक जलाभिषेक करतात. श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊली यांचं अंतस्थ असणारं ऐक्य भक्तांना उमगलं की, ते भक्तीमध्ये अधिकच रममाण होतो. राधा आणि कृष्ण, शंकर आणि पार्वती, शिव आणि शक्ती यांचं पूजन करणारा श्रावण! अंतर्बाह्य उमलून येणारी भक्ती भक्तांना उन्नतीच्या मार्गावर घेऊन जाते. पंचमहाभूतांचं सृष्टीमधून प्रतित होणारं, तर भक्तांच्या भक्तीमधून व्यक्त होणारं रूप अलौकिक होऊन जातं.

 

संत-महंतदेखील श्रावणाला जवळ करतात. त्याच्या सहवासाचा सुगंध लुटतात. नरदेहाचं आणि निसर्गाचं नातं दृढ करतात. रासक्रीडा करणारा मेघश्याम आणि श्रावण यांच्या नात्याचा नाजूक पोत समजून घेतला की, भगवंतांच्या लीला लक्षात यायला वेळ लागत नाही. चैतन्याची सळसळ मनामनाला जागवणारी! श्रावणाची आणि भगवंताची घट्ट मैत्री हातात हात घालून वावरते. पानं,फूलं,पाऊस,वारा यांच्यासह मैत्री फुलत व उमलत जाते. उदात्त, उत्तुंग, उत्कट या ‘उ’मधून ॐकाराचा नाद घुमतो आणि भक्तीला गहिरा रंग लाभतो. सगुणाचा आधार घेत थेट निर्गुणापर्यंत घेऊन जाणाऱ्या श्रावणाची किमया अचंबित करणारी आहे. भक्तांना नवविधा भक्तीच्या पायऱ्या मोठ्या कौशल्यानं चढायला लावून मुक्तीपर्यंत, मुख्य मुक्कामापर्यंत घेऊन जाणारा श्रावण कौतुकाचा राजमुकूट परिधान करून एखाद्या आध्यामिक सम्राटासारखा शोभून दिसतो. भोगाकडून योगाकडे घेऊन जातो. विवेकाचा अलंकार आणि वैराग्याची झळाळी यामुळे श्रावण अधिकच सुंदर दिसतो. केव्हा गहन, गंभीर परमार्थ साध्या सोप्या गोष्टींमधून कथन करणारा श्रावण! व्रत-वैकल्याच्या आधारे तपसाधनेत रममाण होणारा श्रावण! निसर्गामधून खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करून देणारा श्रावण!  ‘श्रावण गुरू’ समस्त जीवांचा सांभाळ करून भगवंताच्या मैत्रीमधील निर्मळता प्रदान करतो. देहामधील आत्माला जागृत करतो. देहभावापासून प्रारंभ करून देवभावापर्यंत घेऊन जातो. मग आनंदाचं परमानंदात आणि परमानंदाचं आत्मानंदात रुपांतर होतं. या क्षमता अंगी असूनही अत्यंत विनम्र असणारा श्रावण सगळ्यांना प्रिय असणं, स्वाभाविक आहे.

कौमुदी गोडबोले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@