हनुमंत आमुचे दैवत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |



भगवंताची भक्ती करायची, तर दीनवाणे होण्याची गरज नाही. भक्ती करायची, तर ती हनुमानाने केली तशी करावी. अफाट पराक्रम करीत असूनही विनम्र राहणे आणि स्वामीकार्यात हात जोडून तत्पर असणे, हे हनुमंताकडून शिकायचे आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

संत तुलसीदासांनी हिंदीत ‘हनुमान चालिसा’ लिहिली. ती उत्तर हिंदुस्तानात अतिशय लोकप्रिय आहे. तेथील बहुतेकांना ती मुखोद्गत असते. तीच गत महाराष्ट्रात समर्थरचित मारूती स्तोत्राची आहे. या स्तोत्रात त्यांनी हनुमानाचे व त्याच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे. हे ‘भीमरूपी स्तोत्र’ लिहिताना त्यांच्या मनात असावे की, हनुमंताच्या कृपेने सत्याचा असत्यावर विजय निश्चित होईल. तत्कालीन राजकीय परिस्थितीत हताश झालेल्या जनतेत त्यांना जागृती घडवायची होती. चैतन्य उभारायचे होते. हनुमानाच्या भीम पराक्रमाचा आदर्श डोळ्यांसमोर उभा करायचा होता. म्हणून स्वामींनी या स्तोत्राला ‘भीमरूपी स्तोत्र’ असे संबोधले आहे. भगवंताची भक्ती करायची, तर दीनवाणे होण्याची गरज नाही. भक्ती करायची, तर ती हनुमानाने केली तशी करावी. अफाट पराक्रम करीत असूनही विनम्र राहणे आणि स्वामीकार्यात हात जोडून तत्पर असणे, हे हनुमंताकडून शिकायचे आहे. रामदासांनी एका काव्यात ‘हनुमंत आमुची कुळवल्ली’ असा त्याचा यथार्थ गौरव केला आहे. त्याच काव्यात ते पुढे म्हणतात, या हनुमंत वेलीवरून राममंडपावर चढून जाता येते. तेथे चढून गेल्यावर मला आत्मज्ञानाचे फळ प्राप्त झाले, असे त्यांनी सांगितले आहे. हनुमानाचे साहाय्य घेऊन रामाच्या भक्तीवर प्रचंड विश्वास असणारे ते रामदासच! ते काय म्हणतात पाहा

म्हणोनि आम्ही रामदास । रामचरणी आमुचा विश्वास ।

कोसळोन पडो आकाश । आणिकाची वास न पाहूं ॥

स्वामींना विश्वास होता की, रामरायाकडे आम्हाला घेऊन जाणारा हा हनुमंत आहे. हे त्यांनी वारंवार सांगितले आहे. ‘हनुमंत आमुचे दैवत’ ही स्वामींची परमार्थातील भूमिका आहे. आपल्या कार्यासाठी कृष्णेच्या खोऱ्यात आल्यावर रामदासांनी पहिला सार्वजनिक रामजन्मोत्सव इ.स. १९६५ साली मसुरला केला. त्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी मारूती मंदिरांची स्थापना करण्याचा धडाका लावला. तीर्थाटनाला निघण्यापूर्वी नाशिकजवळील टाकळी येथे त्यांचा शिष्य उद्धव याच्यासाठी त्यांनी पहिला मारूती स्थापन केला, असे सांगितले जाते. तीर्थाटनातही रामदासांनी अनेक ठिकाणी मारूती स्थापन केल्याचे त्यांचे चरित्रकार सांगतात. त्यावेळी रामदास काशी मुक्कामी असता ते गंगेच्या हनुमान घाटावर गेले. त्यांनी तेथील स्थानिकांना विचारले, “या हनुमान घाटावरील हनुमान कोठे आहे?” कोणाला काही सांगता येई ना. तेव्हा स्वामींनी स्वत: त्या घाटावर हनुमानाची स्थापना केली. हनुमान या देवतेवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. रामचरित्रामध्ये सांगितले आहे की, श्रीरामाने हनुमानाला चिरंजीवित्व दिले आहे. हनुमान ही एक प्रचंड ताकद आहे. ती अशी शक्ती आहे की, जी दुष्टांचा नाश करते. तथापि हनुमानाच्या ठिकाणी श्रेष्ठ बुद्धिमत्ता आहे, विवेक आहे, सारासाराची जाण आहे. हनुमानाला ‘बुद्धिमतां वरिष्ठं’ असे म्हटले आहे. या देवतेची भक्ती करून आपल्याला रामरायापर्यंत पोहोचता येते. असा भक्तिमार्गातील महत्त्वाचा सिद्धांत स्वामींनी सांगितला आहे. हनुमानाच्या उपासनेत शक्ती, युक्ती (बुद्धी) आणि भक्ती असा त्रिवेणी संगम आहे. म्हणून स्वामी आत्मविश्वासाने सांगतात

कोसळोनि पडो आकाश । आणिकाची वास न पाहूं ॥

रामदासांचा हनुमानाशी कसा संबंध आला, हे पाहणे मोठे औचित्यपूर्ण आहे. स्वामींच्या चरित्रकारांनी याबाबत अनेक मजेशीर घटना सांगितल्या आहेत. त्यातील चमत्काराचा भाग सोडून दिला तरी हनुमान रामदासांना सांभाळणारा होता, हे अनेक प्रसंगांतून सिद्ध झाले आहे. रामदासस्वामींचे लहानपणचे नाव नारायण. नारायण लहान असताना त्याला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले, असे स्वामींचे चरित्रकार सांगतात. त्याप्रसंगी श्रीरामांनी नारायणास उपदेश देऊन त्याला हनुमंताकडे सोपवले. नारायणाच्या रक्षणाची जबाबदारी रामाने हनुमंताकडे सोपवली. या घटनेला काहीतरी अर्थ आहे. त्यामुळे पुढील आयुष्यात रामदासांना हनुमंताने वाचवले असे त्यांच्या चरित्रात दिसून येते. स्वामींच्या चरित्रकारांनी एक चमत्कृतीपूर्ण प्रसंग वर्णन केला आहे. त्याला चमत्कार म्हणता येणार नाही. पण कठीण प्रसंगी त्यांना एक अज्ञात शक्ती सांभाळत होती.

तीर्थाटनात रामदास हिमालयात गेले असतानाचा हा प्रसंग त्यांच्या चरित्रकारांनी सांगितला आहे. डोंगर, दऱ्या , निसर्ग यांची आवड असलेल्या रामदासांना हिमालय परिसरातील वातावरण आवडले असणार. सभोवार उंचंच उंच वृक्ष, घनदाट झाडी, भरदिवसासुद्धा सूर्याचे किरण जमिनीवर पोहोचणार नाहीत अशी अवस्था. त्या निबीड अरण्यातून स्वामींचा प्रवास सुरू होता. हिमालयात काही वेळा बर्फाची वादळे होतात. अशा बर्फवृष्टीत रामदास एकदा सापडले. रात्रीची वेळ होती. त्या प्रचंड गारठ्यात स्वामी कसेतरी निवाऱ्या साठी आश्रय शोधत होते. जवळ ना काही खाण्यापिण्याचे साहित्य, ना गरम लोकरीचे कपडे. स्वामी कसेतरी पावले टाकीत होते. अखेरीस थंडी असह्य झाली. ते तिथल्या वाळलेल्या पानांवर पडले. मनात अखंड रामनाम व मारूतीचा धावा चालला होता. त्यांची शुद्ध हरपण्याची वेळ आली होती. त्यावेळी उंच झाडावर बसलेला एक केसाळ हिमवानर झाडावरून खाली आला. खाली पडलेल्या स्वामींना त्या बलवान हिमवानराने सहज उचलले आणि त्यांना घेऊन तो झाडावर पानांच्या आडोशाला जाऊन बसला. त्याने स्वामींना कवटाळून ठेवले. बाहेरील थंड हवा लागू नये म्हणून आपल्या केसाळ हातांचे जणू पांघरुण घातले. रात्रभर स्वामी त्या हिमवानराच्या मिठीत राहिले. त्यांना झोप लागली. सकाळी वादळ संपल्यावर त्याने स्वामींना खाली आणून सोडले व उड्या मारत तो हिमवानर निघून गेला. याचा अर्थ स्वामींचे रक्षण करणारी एक अज्ञात शक्ती सतत त्यांच्याभोवती वावरत होती. रामदास अभिमानाने सांगतात की,

हनुमंत आमचे दैवत । तयावीण आमुचा परमार्थ ।

सिद्धीते न पवे की ॥

- सुरेश जाखडी

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

.

@@AUTHORINFO_V1@@